बचतगटाने विकास केल्याच्या अनेक नोंदी आहेत. त्यात विविध व्यवसाय करणारेही गट आहेत. परंतु वर्धा जिल्ह्यात बचतगटाने, तेही महिला बचतगटाने सामूहिक शेतीचा केलेला प्रयोग निश्चितपणे सर्वांना प्रेरणा देणारा असाच आहे.
जिल्ह्यातील देवळीपासून १७ किलोमीटर अंतरावर अंदोरी गाव आहे. या गावाची लोकसंख्या २ हजार ७३५ इतकी असून, गावात ५६५ घरे आहेत. या गावातील १० महिलांनी एकत्र येऊन दुर्गामाता महिला बचत गट स्थापन केला. संघटक शालिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बचतगटातील प्रत्येक महिलेने आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही दरमहा २५ रु. प्रमाणे बचत करण्यास सुरुवात केली.
या बचतीमधून अंतर्गत कर्ज वाटप करुन व्याजासहित रकमेमध्ये हळूहळू वाढ होत गेली. त्यातून त्यांनी आपआपल्या आर्थिक गरजा आळीपाळीने भागविणे सुरु केले. सर्वांनी सहकार्य केल्याने कर्ज घेण्याकरिता त्यांना कोणत्याही सावकाराकडे जावे लागले नाही आणि आपल्या आर्थिक अडचणींवरही मात करता आली.
या गटाला अंदोरी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेने २० हजार रुपयांचे खेळते भांडवल दिले. याचा उपयोग त्यांनी सामूहिक शेतीकरीता केला आणि त्याची पूर्ण परतफेड करुन बँकेकडे मोठ्या कर्जाकरीता प्रस्ताव दाखल केला. त्यानुसार बँकेने त्यांना २ लाख ७ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून त्याचे दोन टप्प्यात वाटप केले.
कर्जाचा उपयोग महिलांनी सामूहिक शेतीसाठी केला. सर्व १० महिला मिळून शेती करू लागल्या. स्वतः मेहनत केल्याने उत्पन्नही चांगले आले आणि खर्चही कमी झाला. याद्वारे त्यांनी बँकेची परतफेड पूर्ण केली. अशा प्रकारे दहाही महिलांना रोजगार मिळाला आणि उत्पन्नातही वाढ झाली.
गटातील दहाही महिला दरवर्षी किरायाने शेती करतात. सर्व महिला खेड्यातील असल्यामुळे सर्वांनाच शेतीचे ज्ञान आहे. आपल्या किरायाच्या शेतीमध्ये जेव्हा काम असते त्यावेळेला त्या दहाही महिला काम करतात आणि काम नसेल तेव्हा दुसऱ्यांच्या मजूरीकरितासुद्धा जातात. अशा प्रकारे या महिलांचा व्यवसाय दरवर्षी सुरळीतपणे सुरू आहे. सदर गटाने दुसऱ्या टप्प्याकरिता बँकेकडे मागणी केली आहे. यावर्षीचा उत्पन्नाचा पैसा तसेच बँकेचे मिळणारे कर्ज मिळून जास्त शेती करण्याचा त्यांचा मानस आहे.
सदर गटाची मासिक सभाही नियमित होते. सभेला दहाही महिला उपस्थित राहतात. शिवाय दर महिन्याच्या मासिक सभेला संघटक शालिनी पाटील यादेखील उपस्थित राहतात. बचतीमध्ये आता वाढ करून ही जानेवारी २०१२ पासून दरमहा २५ रुपयांवरुन ५० रुपये करण्यात आली आहे. सर्व महिला दरमहा नियमित बचत भरतात आणि अंतर्गत कर्ज व्यवहार, परतफेड करून गटाची बचत वाढविण्यास एकमेकांना प्रोत्साहन देतात.
या गटामध्ये केवळ आर्थिक व्यवहार होत नसून, एकमेकींच्या सुखदुःखामध्ये ह्या महिला सामील होतात, एकमेकींना सहाय्य करतात हे या गटाचे वैशिष्ट्य आहे. हा गट संजीवनी ग्राम सेवा संघ, अंदोरी मध्ये सामील झाला आहे. गटातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांच्यामध्ये बोलण्याची वृत्ती तसेच धाडस निर्माण झाले आहे. त्या स्वतः बँकेचे व्यवहार करायला शिकल्या आहेत. कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये आता त्यांचाही मोठा वाटा आहे. त्यांची बचत असल्यामुळे त्या कधीही अंतर्गत कर्जाच्या माध्यमातून आपल्या आर्थिक अडीअडचणी सोडविण्यासाठी सक्षम बनल्या आहेत.
या गटातील महिला दारुबंदीच्या महिला मंडळामध्ये सामील झाल्या आहेत. तसेच तंटामुक्त ग्राम मंडळ, ग्राम स्वच्छता अभियान यामध्ये सुद्धा गटातील महिलांची मोलाची कामगिरी आहे. दुर्गामाता महिला बचत गटाला प्रगतीचा मार्ग सापडला असून अंदोरी या गावामध्ये १५ गटांपैकी हा गट आदर्श गट म्हणून ओळखला जात आहे.
No comments:
Post a Comment