रस्ता सुरक्षा संदर्भात अधिक जनजागृती व्हावी यासाठी राज्य शासनाने १ ते १५ जानेवारी पर्यंत `रस्ता सुरक्षा पंधरवडा` पाळण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानंतरही सातत्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे. लातूर येथील प्रादेशिक परिवहन, शहर वाहतुक नियंत्रण शाखा आणि महामार्ग पोलिस यांच्या वतीने १ जानेवारी पासून महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानास प्रारंभ झाला आहे. त्या निमित्ताने रस्त्यावरुन जातांना कोणते नियम पाळावेत, यावर आधारित लेख . .
देशात दरवर्षी सुमारे एक लाख लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात. यात प्रामुख्याने १५ ते ४४ या वयोगटातील तरूणांची संख्या ६० टक्के पेक्षा अधिक आहे. नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू रस्त्यावरील अपघातामुळे होतात. आपला दोष नसताना अनेक वेळा इतरांच्या चुकीमुळे अपघात होऊन जिवितहानी होते. प्रामुख्याने अपघात होण्यास वाहनचालकाचा ८३ टक्के तर पादचाऱ्याचा ६ टक्के निष्काळजीपणा कारणीभूत आहे. रस्ता सुरक्षा ही अत्यंत महत्वाची गरज असून अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे.
पादचाऱ्यांसाठी
• पादचाऱ्याने रस्त्यावरुन जातांना फुटपाथचा वापर करावा. फुटपाथ नसेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे.
• रस्ता ओलांडतांना झेब्राक्रॉसिंग वरुनच रस्ता ओलांडावा.
• रस्ता ओलांडायाचा असेल तर प्रथम उजवीकडे आणि नंतर डावीकडे पाहून, रस्त्यावर वाहन येत नाही याची खात्रीकरुनच रस्ता ओलांडावा. रस्ता ओलांडतांना अचानक वाहन आल्यास जागेवरच थांबावे.
• वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून रस्त्याच्याकडेने चालावे.
• अंध, अपंग, वृध्द, लहान मुले यांना रस्ता ओलांडण्यास मदत करावी. दुर्देवाने अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी.
सायकलस्वारांसाठी
• सायकल सरळ रेषेत व डाव्या कडेने चालवावी. रस्ता वळण्यापूर्वी योग्य इशारा करावा.
• मोठ्या वाहनाच्या साखळीला धरुन सायकल चालवू नये.
• सायकलचे मागील मडगार्ड अर्धे पांढरे व अर्धे लाल रंगाने रंगवावे. तसेच मागील बाजूस तांबडा परावर्तक (रिफ्लेक्टर) बसवावा.
• रात्री सायकलला दिवा लावावा.
• दोन्ही ब्रेक चांगले आहेत याची खात्री करावी.
• आपल्या उंचीला योग्य अशीच सायकल वापरावी.
मोटारसायकल चालकांसाठी
• मोटार सायकल ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय चालवू नये. लायसन्स व इतर कागदपत्रे सोबत ठेवावीत.
• वाहनाचे हेडलाईट, ब्रेकलाईट, टेललॅम्प, साईड इंडीकेटर, आरसे सुस्थितीत असल्याची खात्री करावी.
• मोटार सायकल भरधाव वेगाने चालवू नये. वाळू, पालापाचोळा, पाणी, चिखल, ऑईल यावरुन वाहन सावधपणे चालवावे
• दोन मोठ्या वाहनांच्या मधून ओव्हरटेक करु नये. मोटार सायकल थांबवितांना दोन्ही ब्रेकचा वापर करावा.
• हेलमेटचा वापर करावा.
• दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी प्रवास करुन नये. तो कायद्याने गुन्हा आहे.
रिक्षाचालकांसाठी
• रिक्षाचालकाने प्रवाशांशी सौजन्याने वागावे.
• अधिकृत रिक्षा स्टँडवरच वाहने उभी करावीत. रहदारीला अडथळा होईल असे पार्किंग करु नये.
• प्रवाशांचे सामान अथवा मौल्यवान वस्तु वाहनात विसरल्यास परत करावे किंवा पोलीस स्टेशनमध्ये जमा करावे.
• प्रवाशांना जवळच्या मार्गाने त्यांच्या इच्छीतस्थळी न्यावे.
• संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळून आल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवावे.
• पाचपेक्षा जास्त शालेय मुलांची वाहतूक करु नये. वेगावर नियंत्रण ठेवावे.
• वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावीत. अधिकृत टेरीफ प्रमाणेच भाडे आकारावे.
• आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेऊ नयेत. वृध्द व स्त्रियांना मदत करावी.
मोटारकार चालकांसाठी
• कार चालवतांना सिटबेल्टचा वापर करावा.
• ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवू नये. लायसन्स, विमा, नोंदणी प्रमाणपत्र, पीयुसी दाखला, कर पुस्तिका नेहमी सोबत ठेवावी.
• वाहन सुस्थितीत असल्याची खात्री करावी.
• झीजून गुळगुळीत झालेले टायर त्वरीत बदलावेत. हेडलाईट, ब्रेकलाईट, टेललॅम्प, इंडीकेटर, वायपर्स व आरसे सुस्थित असावेत.
शिस्त पाळणे
वाहन चालवतांना मोबाईल फोनवर बोलणे. गाणे ऐकणे त्यातील संदेश वाचणे. मोबाईलवरुन संदेश पाठवणे. त्यावर गेम खेळणे कायद्याने गुन्हा आहे. वाहन सिग्नलजवळ किंवा ट्रॅफिकमध्ये थांबले तरीही मोबाईलचा वापर करण्यास मनाई आहे. वाहन चालवितांना मोबाईचा वापर केल्यास दंड भरुन सुटका होणार नाही, तर ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकते. लेनची शिस्त पाळावी. ओव्हरटेक नेहमी पुढील वाहनाच्या उजव्या बाजूनेच करावी.
मादक पदार्थाचे सेवन करुन वाहन चालवू नये. इतरांना अडचण होईल अशा ठिकाणी वाहन पार्किंग करु नये. नंबर प्लेटमध्ये दादा नाना अशा स्वरुपाची अक्षरे लिहू नयेत. मुलांची नावे व नक्षी काढू नयेत. वाहनाची नंबर प्लेट नियमाप्रमाणे रगवावी. रात्री गॉगल किंवा नाईट ड्रायव्हिंग ग्लासेस वापरु नये. वाहन चालवतांना काच आतून बाहेरुन स्वच्छ पुसून घ्यावी.
उतारावरून खाली उतरतांना इंजन बंद करुन वाहन चालवू नये किंवा न्यूट्रल गिअरचा वापर करू नये. चढावर पुढे जाणाऱ्या वाहनांना अगोदर जाऊ द्यावे. अवघड किंवा न दिसणाऱ्या वळणावर दिवसा हॉर्नचा तर रात्री लाईटचा वापर करुन समोरुन येणाऱ्या वाहनचालकाला सावध करावे. हॉर्नचा आवाज कर्कश असू नये. वाहनाच्या समोरच्या बाजूस पांढऱ्या रंगाचे आणि मागच्याबाजूस लाल रंगाचे रिफ्लेक्टिव टेप लावावे
जेंव्हा वळणावर रस्ता दृष्टीक्षेपात नसतो. तेथे दुहेरी अखंड पांढरा/पिवळा पट्टा रंगवलेला असतो. या ठिकाणी कोणत्याही दिशेच्या वाहनाने आपल्या बाजूचा पट्टा ओलांडू नये किंवा ओव्हरटेक करु नये. आपण ज्या गिअरमध्ये घाट चढतो. त्याच गिअरमध्ये घाट उतरावा. रात्री अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे रात्री, शक्यतो पहाटे २ ते ४ या वेळेत वाहन चालवू नये. रस्त्यात बंद पडलेली तसेच संथगतीने चालणाऱ्या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवून वाहन चालवावे.
पावसात वाहन चालविणे धोकादायक असते. गार्डस्टोन पाण्यात बुडाले असल्यास वाहन पाण्यातून नेऊ नये. आपल्या वाहनामुळे पायी चालणाऱ्या लोकांच्या अंगावर चिखल उडणार नाही याची काळजी घ्यावी.
व्यावसायिक वाहनाच्या बाबतीत योग्यता प्रमाणपत्र व परवाना असावा. वेगावर नियंत्रण ठेवावे. ड्रायव्हिंग लायसन्स आणि बॅच असल्याशिवाय वाहन चालवू नये.
आदेश देणाऱ्या चिन्हांचे पालन करावे. रस्त्यावरील चिन्हे संभाव्य धोक्याची पूर्ण कल्पना देऊन सावध करतात या चिन्हांकडे लक्ष द्यावे. माहिती देणा-या चिन्हांमुळे रस्त्यावरील सोयी-सुविधांची कळते.
या नियमांच्या आणि शिस्त पालनामुळे स्वत:च्या जिवितासह, इतरांचे जिवितहानी टाळता येते. मालमत्ता आणि इतर नुकसान टळून वाहतूक सुविधेचा सर्वांनाच पूरेपूर लाभ घेता येईल. एकमेकांच्या विकासाला, राष्ट्र विकासाला हातभार लावता येईल.
No comments:
Post a Comment