Wednesday, January 11, 2012

ज्ञानसागरातील मोती

स्थळ- अमरावती शहरातील नेहरू मैदानावर आयोजित ग्रंथप्रदर्शन. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेले अनेक शाळकरी विद्यार्थी त्यापैकी एक विद्यार्थीनी, काका मी माझ्या खाऊचे पैसे वाचवले आहेत. मला श्यामची आई’ पुस्तक खरेदी करायचं आहे. त्याची किंमत सांगा. विक्रेत्यानेही तिचा हा उत्साह पाहून तिच्याकडे असलेल्या रूपयांमध्येच पुस्तक विकत दिलं. मला हे पुस्तक हवं आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत, असं एका मुलाने विक्रेत्याला सांगितलं. त्याची वाचनाची कळकळ लक्षात घेवून आयोजकांनी त्याला हव असलेलं पुस्तक भेट दिलं.असे अनेक अनुभव या ग्रंथप्रदर्शनात येत होते. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगातही वाचनवेडे आहेत अन् ते आर्वजून पुस्तक खरेदी करतात हे वाचनसंस्कृती प्रभावीपणे टिकून आहे याची साक्षच देतात.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व अमरावतीच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ते १० जानेवारी दरम्यान अमरावती येथे ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला होता. नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच ग्रंथप्रेमींना मराठी साहित्यातील उत्तमोत्तम ग्रंथसंपदा उपलब्ध व्हावी हा जिल्हा स्तरावर हे ग्रंथोत्सव आयोजन करण्याचा खरा हेतू होता. तो ग्रंथोत्सवाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे यशस्वी ठरला.

ग्रंथोत्सवाचे उद्‌घाटन सुप्रसिध्द साहित्यिक व पक्षी तज्ज्ञ मारूती चितमपल्ली यांच्या हस्ते झाले. एकाच छताखाली राज्यातील नामवंत पुस्तक वितरकांची दालने व त्यासोबतच सांस्कृतिक मेजवानी यामुळे हे जणू एक मिनी साहित्य संमेलनच अशी प्रतिक्रिया सर्वच साहित्यिक व ग्रंथप्रेमींनी व्यक्त केली.

चितमपल्ली यांनी वाचनासारखा आनंद नाही असे सांगतानाच वनविभागात मोठे घबाड मिळते, या समजामुळे माझ्या वडिलबंधूनी वनखात्यात नोकरीचा सल्ला दिला. वनखात्यात नोकरी लागल्यावर मला घबाड मिळाले ते पुस्तकांचे. मी रोज पाच तास वाचन करायचो. तुम्ही म्हणाल, पुस्‍तक वाचले आणि लिहिले, मग नोकरी काय केली? मात्र पुस्तक वाचण्याचा छंद जोपासताना मी शासकीय कर्तव्यात कसूर केली नाही. मी पहाटे ३ वाजल्यापासून सकाळी ८ वाजेपर्यत पुस्‍तक वाचायचो. त्यानंतर कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचाऱ्यांसोबत जंगलात जायचो, साडेदहा ते साडेपाच यावेळेत ऑफिस आणि त्यानंतर घर व पुस्‍तके. अद्याप मी घर बांधले नाही, मात्र ६ हजार पुस्तकांचा संग्रह असणारे माझे ग्रंथालयचं माझे घर आहे, असे मी मानतो. लिहायचं असेल तर भरपूर वाचा असा त्यांनी सल्लाही दिला.

ग्रंथमहोत्सवानिमित्त सायंकाळी झालेल्या गीतकार ज्ञानेश वाकूडकर यांच्या ‘सखे साजणी’ काव्य मैफिलीला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ जिल्हा शाखेने निर्मिती केलेल्या ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या विशेष कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

शासकीय प्रकाशनाची विविध उपयुक्त पुस्तके सुध्दा या ग्रंथोत्सवामध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. जवळपास ५० हजारावर शासकीय प्रकाशनांच्या पुस्तकांची ३ दिवसात विक्री झाली. ही या प्रदर्शनाची एक मोठी उपलब्धीच म्हणावी लागेल. एकूणच वाचकांची भूक भागविण्याची किमया या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून साधली गेली.


  • अनिल गडेकर

  • No comments:

    Post a Comment