मोडी लिपीचा उगम हा यादव कालात म्हणजेच ज्ञानदेवाच्या समकालीन १२ व्या शतकात झाला. या मोडी लिपीचे जनक होते यादवांचे प्रतिभावंत अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले हेमाद्रीपंत ! मोडी लिपी लिहिण्याची पद्धत म्हणजे न मोडता , न थांबता अत्यंत जलद गतीने झरझर लिहिणे. यामध्ये सर्व शब्द दीर्घच लिहिले जातात. प्रथम मोडी लिहिण्यापूर्वी कागदावर एक सरळ रेघ मारली जाते. आणि बोरू शाईच्या दौतीमध्ये बुडवून रेघेच्या सुरुवातीपासून ते रेघ संपेपर्यंत मजकूर लिहिला जातो. ही लिपी म्हणजे आजच्या लघुलिपिकाची जशी सांकेतिक लिपी आहे तशाच प्रकारचे स्वरूप या लिपीचे आहे. या मोडी लिपीचा प्रवास १२ व्या शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत अत्यंत दिमाखदार पद्धतीने झाला. मात्र पुढे मुद्रणकला विकसित झाल्यावर छपाईच्या दृष्टीने मोडी लिपीची मर्यादा सीमित झाल्याने कालौघात ही लिपी हळूहळू मागे पडली.
मोडी लिपीचा उगम आणि तिची झालेली वाटचाल १९६० नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करतांना भारतातील प्राचीन भाषा आणि त्यांच्या लिपी यांचा या ठिकाणी थोडा धावता आढावा घेऊ. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा यांचा अभ्यास करतांना या लिपीचे योगदान किती महत्त्वाचे होते, हे ही त्यामुळे आपल्या लक्षात येईल. भारतीय इतिहासाचे लिखित अभिलेख हे सम्राट अशोकाच्या ज्या धर्माज्ञा शिलालेखातून कोरलेल्या आहेत त्यातूनच आपणांस समजतात. तत्कालीन समाजामध्ये पाली ही लोकांची बोली भाषा होती. मात्र या पाली भाषेला स्वत:ची लिपी नसल्याने ती ब्राम्ही लिपीतून लिहिली गेली. १२ व्या शतकात बौद्धधर्माला उतरती कळा लागली. त्यावेळचे जगप्रसिद्ध असलेले नालंदा विद्यापीठ नामशेष झाले. साहजिकच समाजजीवनात प्रचलित असलेली पाली भाषा आणि ब्राम्ही लिपी लोकांच्या विस्मरणात गेली.
भारतीयांचा विकास सर्वप्रथम शास्त्रशुद्ध पद्धतीने परकीय इतिहासकाराने लिहिला, ही वस्तुस्थिती आहे. उदा. विजयनगरच्या देदीप्यमान राजवटीचा इतिहास प्रो. रार्बट यांनी सांगण्यासाठी अ फॉरगॉटन एम्पायर हा ग्रंथ लिहिला. मार्कविल्स यांनी हिस्ट्री ऑफ म्हैसूर हा ग्रंथ लिहिला. कॅनिंगहॅमने शिखांचा इतिहास लिहिला. टॉड यांनी राजपुतांचा इतिहास लिहिला तर मराठ्यांचा इतिहास ३ खंडामध्ये १८२६ साली स्वत:च्या पदरचे १७७० पौंड खर्च करुन ग्रँट डफ यांनी प्रकाशित केला. याच पार्श्वभूमीवर भारताच्या कानाकोपऱ्यातून मिळालेल्या स्तंभावर `देवानामपिय पियदस्सी राजा` असे सतत आढळून येत होते. तेव्हा हा पराक्रमी सम्राट कोण हा प्रश्न इतिहासकारांना पडत होता. काहींनी तर हा प्रराक्रमी सम्राट कोणी ग्रीक, रोमन, यहुदी असा समज करून घेतला होता मात्र १८३७ साली जेम्स प्रीन्सेपने ७ वर्षाच्या अथक प्रयत्नाने ब्राम्ही लिपीचा अभ्यास केला त्याच वेळी श्रीलंकेतील चार्लसटर्नवोवरने बौद्धभिक्षुच्या मदतीने `महावंस` हा पाली ग्रंथ अनुवादित केल्यानंतर हा पराक्रमी सम्राट भारतातीलच असून त्याचे नांव अशोक आहे, हे जगाला ज्ञात झाले. म्हणजेच आपण जेव्हा प्राचीन लिपीचा अभ्यास करतो तेव्हाच आपणांस अज्ञात इतिहासावर प्रकाश टाकता येतो.
आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरात ज्या ज्या ठिकाणी मराठ्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली, त्या ठिकाणचा राज्यकारभार पाहिला, लष्करी मोहिमा राबविल्या, त्याची माहिती पुणे दरबारी पाठविली. त्यांच्या दरबाराची भाषा मराठी असली तरी ते अभिलेख मोडीलिपीमधूनच लिहिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुणे पुरालेखागारामध्ये एका लिपीतील, एका भाषेतील, एका राजवटीतील व एका राज्याचा इतिहास सांगणारे १५९० पासून ते देश स्वतंत्र होईपर्यंतच्या या काळातील मोडीलिपीतील ४ कोटी अभिलेख इतिहासाची साक्ष देण्यास उत्सुक आहेत. ते इतिहास अभ्यासकांची, संशोधकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर व मुंबई अभिलेखागारात लाखोच्या संख्येने ही कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्हाधिकारी, तहसिल, भूमिअभिलेख कार्यालये व इतर शासकीय कार्यालयातून हे ऐतिहासिक दस्ताऐवज पडून आहेत या सर्वांचे वाचन व्हावे, लोकांना त्यांच्या हक्काची कागदपत्रे, त्यांचे हक्क शाबीत करण्यासाठी या मोडी कागदपत्रांचे वाचन होणे, अत्यंत गरजेचे आहे.
मोडी लिपी शिकणे ही काही अवघड गोष्ट नक्कीच नाही. यासाठी पुराभिलेख विभागाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गासाठी प्रथम साधा सुटसुटीत सोप्या पद्धतीचा अभ्यासक्रम ठरविण्यात आला. त्यासाठी मोडी लिपी तज्ज्ञांशी चर्चाही केली आणि अभ्यासक्रमाची पुस्तके छापून घेतली. ही मोडी लिपी पारंपरिक बाराखडी पद्धतीने न शिकविता देवनागरी लिपीतील आणि मोडी लिपीतील साम्य असलेले शब्द प्रथम निवडण्यात आले. मग त्यांचा आकार, ऊकार, ईकार या पद्धतीने मांडणी करून त्यांनाच मग काना, मात्रा, वेलांटी देऊन पहिला धडा तयार केला. अशा १० धडयातून या अभ्यासक्रमाची विभागणी करून मग शेवटी बाराखडी शिकविण्यात आली. मोडी लिपी लिहिताना र हा शब्द व्यवस्थित समजून घ्यावा लागतो तो चुकीच्या पद्धतीने वाचला तर काय घोटाळे होतात याची गमतीदार उदाहरणे देण्यात आली. मोडीलिपी वाचतांना `येथे नाच तमाशे चालतात` या शब्दाऐवजी `येथे नाचत माशे चालतात` असाही होऊ शकतो. या मोडी लिपीचे प्रशिक्षण १५ दिवसांमध्ये ३० व्याख्यानाद्वारे दिले जाते.
मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची गरज आहे. आणि त्याचबरोबर विस्मरणात गेलेल्या मोडी लिपीचे पुनर्जीवन करणे, इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. मराठी भाषेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेच, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास ज्या मोडीलिपीतून लिहिला आहे तो वाचण्यासाठी, अभ्यासण्यासाठी, या मोडी लिपीतील अप्रकाशित राहिलेला, दडलेला इतिहास उजेडात आणण्यासाठी अशा प्रकारचे मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग आयोजित करुन ज्यांना ही लिपी शिकण्याची आवड आहे त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध करुन देणे हे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment