थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे दहा महिला एकत्र आल्या. या सर्वजणी बी.पी.एल. अर्थात दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या कुटुंबातल्या होत्या. गटाच्या माध्यमातून एकतेची शक्ती त्यांनी दाखवून दिली आणि मेहनतीनंतर ७ वर्षात सर्वच्या सर्व महिला आता आपल्या कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर पोहोचविण्यापर्यंत आल्या. ही कहाणी आहे वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातल्या जय गोंडवाना स्वयंसहायता बचतगटाची.
आम्ही जय गोंडवाणा महिला बचत गटाच्या महिला आहोत. दिनांक ३० डिसेंबर २००५ रोजी आमच्या बचत गटाची स्थापना झाली. या अगोदर आमच्या गावात एकही बचत गट नव्हता. आमच्या गावातील अंगणवाडी सेविकेने आम्हाला बचत गटाची माहिती दिली. नंतर आम्ही १० महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन करण्याचे ठरविले. एक दिवस बैठक घेऊन त्यामध्ये आम्ही बचतगटाची कार्यकारिणी ठरविली. बचत जमा करुन गटाची रीतसर स्थापना केली, बचतगटाच्या महिला अभिमानाने आपल्या कार्याची माहिती सांगतात.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कारंजा (घा.) येथे गटाचे खाते उघडण्यात आले. नंतर आम्हाला पंचायत समिती मध्ये तीन दिवसांचे मुलभूत प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला व गटाचे कार्य करण्याचा उत्साह द्विगुणीत झाला. नंतर किमान एक वर्षाने आमच्या गटाची प्रतवारी झाली व ६ हजार ३०० रुपये फिरते भांडवल मिळाले. त्यात आम्ही आमच्या गटातील सदस्यांच्या छोट्या छोट्या गरजा भागविणे सुरु केले.
या अगोदर आमची परिस्थिती फार वाईट होती, पण हळूहळू आमच्या समस्या सुटू लागल्या. कालांतराने बचतही वाढू लागली. मग आम्ही सभासदांच्या अधिक गरजा भागवू लागलो. आमच्या गटातील सदस्यांना शेती, घरबांधणी, मुलांचे लग्न, विहीर अशा विविध कारणांसाठी कर्ज दिले. दर महिन्याला आमची बैठक न चुकता होते व गटाचा संपूर्ण रेकॉर्ड आमच्या गटाच्या सचिव भरतात. आमच्यामध्ये असे अंतर्गत व्यवहार सुरु असतानाच आम्ही सर्वांनी विचार करून शेळी पालन व्यवसाय करण्याचे ठरविले.
याबाबतचा प्रस्ताव तयार करुन आम्ही बँकेला सादर केला आणि त्यासाठी आम्हाला दोन लाख सात हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. यामध्ये ८० हजार रुपये अनुदान होते. त्यापैकी १ लाख ६० हजार रुपयांची उचल करुन आम्ही शेळ्या घेतल्या आणि आमचा व्यवसाय सुरु झाला. त्यानंतर आम्हाला शालेय पोषण आहाराचे सुद्धा काम मिळाले. सर्व सभासदांनी एकजुटीने व्यवसाय सुरु केल्याने उत्पन्नही चांगले मिळू लागले.
आम्ही सामाजिक व ग्राम विकासाच्या कार्यात सुद्धा सहभाग घेऊ लागलो. आता गावात आमचे सन्मानाचे स्थान आहे. प्रत्येक महिलेकडे आपले उपजिविकेचे साधन आहे. प्रत्येकाचे कौटुंबिक जीवन समाधानाचे आहे. आमच्या गटाची बँकेची परतफेड सुद्धा नियमित सुरु आहे. आतापर्यंत आम्ही ४५ हजार रुपये परतफेड केली आहे आणि लवकरात लवकर संपूर्ण परतफेड करुन कर्जमुक्त होण्याचा आमचा निर्धार आहे.
या बचतगटामुळे आम्हाला विकासाची संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या आम्ही विकासाच्या मार्गावर आहोत आणि लवकरच आम्ही बी.पी.एल. मधून मुक्त होऊन दारिद्र्याच्या काळोखातून बाहेर निघणार आहोत. आम्हाला विकासाच्या प्रवाहात आणून आमचे काळोखरुपी जीवन प्रकाशमय करण्यासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे आम्ही आभार मानतो.
No comments:
Post a Comment