गावपातळीवरील ग्रामसेवकांना युनिकोडच्या वापरा संबधीचे प्रशिक्षण हे शासन आणि ग्रामस्थांच्या सुसंवादाचा महत्वाचा टप्पा आहे. या प्रशिक्षणामुळे शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे प्रतिपादन यशदाचे महासंचालक डॉ. संजय चहांदे यांनी केले. राज्यातील पहिल्या व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
शासकीय कामकाजात अधिक गतिमानता यावी, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. संजय चहांदे यांच्या हस्ते शनिवारी झाला. राज्यात प्रथमच हा उपक्रम महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान संचालनालय, ‘यशदा’ व ‘सी डॅक’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. पुण्यातील यशदामध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. चहांदे यांनी १२ जिल्ह्यातील १३४ पंचायत समित्यांमधील प्रशिक्षणार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ‘युनिकोडचा वापर’ यासंबंधी माहिती देण्यात आली. यावेळी यशदाचे उपमहासंचालक डॉ. कृष्णा लव्हेकर, ‘सी – डॅक’चे व्याख्याते योगेश कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी डॉ. चहांदे यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधून त्यांच्याकडून प्रशिक्षणाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि माहिती तंत्रज्ञानाद्वारे प्रशिक्षण आपल्यापर्यंत कसे प्रभावीपणे पोहचू शकते या बाबतचे मार्गदर्शन केले.
यावेळी 'युनिकोड'चे प्रशिक्षण 'सी – डॅक' तर्फे सुर्य पचौरी यांनी दिले. यात युनिकोड म्हणजे काय? 'युनिकोडचा वापर कसा करावा', युनिकोडचे फायदे व युनिकोड संगणकावर कसे सुरु करायचे, ज्यामुळे मराठीत काम करणे सोपे जाईल या संबधी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी यशदातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रल्हाद कचरे, रघुनाथ राव, संशोधन अधिकारी पांडूरंग गाडेकर हे उपस्थित होते.
या प्रशिक्षणासाठी स्वॅन (SWAN) या नेटवर्कचा वापर करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment