प्रसार माध्यमांचा गजबजाट असलेल्या आजच्या जगात सगळ्या बाजूंनी माहिती आणि मनोरंजनाचा भडिमार आपल्यावर होत असतो. त्यातही टीव्हीसारखं दृश्य माध्यम आणि इंटरनेटवरल्या सोशल नेटवर्किंग साईट्ससारखं परस्परसंवादी माध्यम यांना लोकांची पसंती असते. आजच्या जगात या सगळ्यांचं महत्त्व आहेच, ते नाकारताही येणार नाही. या पसाऱ्यात आकाशवाणी किंवा रेडिओचा विसर आपल्याला पडतोय का? कदाचित पडतोय. तशी हल्ली एफ. एम. वाहिन्यांची लोकप्रियता अगदी तरुण वर्गातही थोडी रुजू पाहते आहे. तरीही आकाशवाणीला जे पूर्वी लोकांच्या मनात खास स्थान होतं, ते आज उरलेलं नाही. अर्थातच आकाशवाणी यापुढेही असणार आहे आणि आपलं काम ती करत राहणार आहे. एके काळी आकाशवाणीचा दबदबा केवढा होता, तिथे मोठमोठे कलाकार, लेखक, गायक, संगीतकार, नट इ. कसे वावरले हे आपण अनेकदा तिथे काम करणाऱ्या मंडळींच्या आठवणीतून ऐकलं-वाचलं आहे. आकाशवाणीत काम केलेल्या बऱ्याच मंडळींची या विषयावरली पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.
आकाशवाणीत बरीच वर्षं निर्माता म्हणून काम केलेल्या मेधा कुळकर्णी यांच्या ‘स्थळकाळ आकाशवाणी’ हे अक्षर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं अशाच तऱ्हेचं पुस्तक असलं, तरी केवळ आठवणी, गमतीजमती यातच ते गुंतून पडत नाही. आकाशवाणीचा आवाका, ताकद आणि समाजाच्या प्रश्नांशी भिडण्याची या माध्यमाची ताकद याबद्दल अनुभवाचे बोल यात प्रतिबिंबित झाले आहेत हे त्याचं वेगळेपण आहे. या माध्यमाची ताकद चळवळींना बळ देऊन जाणारी कशी आहे याचा पडताळा स्वतः लेखिकेने अनेकदा घेतला. यामागे अर्थातच तिची सामाजिक दृष्टी आणि सामाजिक प्रश्नांबाबतचा ध्यास होता. ज्या काळात टीव्ही नुकताच सुरू झाला होता आणि रंगीत टीव्ही भारतात अजून यायचा होता त्या काळात आकाशवाणीत रुजू झालेल्या मेधा कुळकर्णी सुरुवातीला या सरकारी माध्यमात मिळणाऱ्या स्वातंत्र्याबद्दल काहीशा साशंक होत्या, पण त्याच बरोबर काही क्रिएटिव काम करण्याची संधी इथे असेल हा दिलासाही त्यांच्या मनात होता. साहित्यसंस्कृतीची जाण आणि जोडीला समाजाविषयीची बांधीलकी असलेल्या मेधाला हे माध्यम व तेथील कामाबद्दल कुतूहलही होतंच. तिथे रुजताना आलेले अनुभव, अडचणी, सरकारीपणाच्या शिक्क्यामुळे पाळावी लागणारी पथ्यं साऱ्यांचा सामना करत पुढे जायचं होतं. या वाटचालीबद्दल लिहितानाच आकाशवाणी ही चळवळींना पूरक कशी ठरू शकते याबद्दल घेतलेल्या प्रत्ययाबद्दलही त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे.
कोल्हापूरजवळच्या हुपरी गावात दलित-सवर्ण दंगल पेटली तेव्हा त्याआधी सलग तीन वर्षं अस्पृश्यता निर्मूलनाचा पुरस्कार मिळवणाऱ्या या गावाची रयाच बदलून गेली. त्यावर फीचर करण्याच्या कामात मदत करताना आपल्याला या माध्यमाची ताकद आणि ओळख खऱ्या अर्थाने पटली असं त्यांनी लिहिलं आहे. ‘बहुजनहिताय बहुजनसुखाय’ हे घोषवाक्य मिरवणारी आकाशवाणी खरोखरच बहुजनांसाठी कार्यरत झाली तर, हा विचार मेधाच्या मनात तेव्हा रुजला आणि कामाची दिशाच तिला सापडली. सरकारी चौकटीचं पालन करूनही लोकहिताची जपणूक चांगल्या प्रकारे करता येते याचा अनुभव मेधाला पहिल्याच महिन्यात मिळाला आणि त्यानंतरची वाटचाल तिथेच निश्चित झाली.
विवेक पंडितांचं वेठबिगार मुक्तीचं आंदोलन टिपतानाही असाच अनुभव आला. वेठबिगारीच्या प्रथेतली अमानुषता, क्रौर्य आणि त्यातलं वास्तव आकाशवाणीच्या माध्यमातून समाजासमोर आणताना गावांमधल्या प्रस्थापितांशी टक्कर देताना हुशारीने परिस्थिती हाताळावी लागली. रेशन व्यवस्था, पोलीस यंत्रणा हे सामान्यांच्या जीवनाशी निगडित विषय असोत की पुस्तकांवरील कार्यक्रम करताना सुचलेली ‘पुस्तकांच्या जन्मकथा’ हा प्रकाशकांच्या अनुभवांवरील मालिका असो प्रत्येक विषयात रस घेऊन काम करण्यातला आनंद मेधाने घेतला. महाराष्ट्रातल्या मान्यवर विदुषी दुर्गा भागवत, स्वतःच्या खास शैलीत लेखन करणाऱ्या कमल देसाई, विजय तेंडुलकर अशांच्या सविस्तर मुलाखतींचं ध्वनिमुद्रण करण्यातही मेधाने पुढाकार घेतला. दुर्गाबाईंच्या मुलाखतीवर आधारित पुस्तक पुढे प्रकाशित झालं. तेंडुलकरांची मुलाखत मात्र दोन-तीन तासच होऊ शकली. पुढे मेधाची बदली अन्यत्र झाली त्या काळात तर हे ध्वनिमुद्रण गहाळच झालं. असे आकाशवाणीतील गलथानपणाचे, असंवेदनशीलतेचे किस्सेही घडले.
शैक्षणिक कार्यक्रमांची जबाबदारी बरीच वर्षं सांभाळताना लेखिकेने त्यात नवे प्रयोग करण्यावर भर दिला. विज्ञानविषयक कार्यक्रमासाठी जयंत नारळीकरांकडून लेखन मिळवणं, सुरेंद्र चव्हाण या एव्हरेस्ट सर करणाऱ्या मराठी तरुणाचा, ही वाटचाल करतानाचा अनुभव त्याच्याच आवाजात श्रोत्यांना ऐकवणं, साहित्य संमेनाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या विद्रोही संमेलनाचं महत्त्व संचालकांना पटवून दोन्ही संमेलनांचं वार्तांकन आकाशवाणीवर होण्याची सोय करणं अशा वेगवेगळ्या घटनांमधून लेखिकेचा व्यापक व समाजाभिमुख दृष्टिकोन दिसतो. लोकजागर या साक्षरता प्रसाराला वाहिलेला कार्यक्रम करण्याचा अनुभव मेधाच्या अनुभवांच्या कक्षा रुंदावणारा ठरला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधलं जीवन जवळून बघण्याचा अनुभव मिळाला, या शहराचं एक वेगळं रूप बघता आलं. या मंडळींना आकाशवाणीसारख्या माध्यमाच्या संपर्कात आणणं हे देखील एक आव्हानच होतं, पण ट्रेनिंग मिळाल्यावर तिथली मुलं तयार झाली. पुढे या मुलांपैकी अनेकजण शिक्षणात चमकले, प्रगतीच्या वाटेवर गेले. प्रौढ साक्षरता वर्गांना येणाऱ्या स्त्रियांमध्ये होणारा बदलही टिपता आला. अक्षरओळखीने या महिलांना नवी ओळख दिली.
आकाशवाणीत असतानाच मेधाने सुरू केलेली ‘संपर्क’ ही स्वयंसेवी संस्था आणि या माध्यामातून केलेलं सामाजिक-राजकीय जागृतीच्या क्षेत्रातलं काम हेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकून जातं. ‘संपर्क’च्या माध्यमातून सोशल अँडव्होकसीच्या क्षेत्रात पाय रुजवताना कामाचं व अनुभवांचं क्षितिज अधिक रुंदावत गेलं, तो सगळा प्रवास या पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे. दारुबंदीच्या आंदोलनाची वाटचाल टिपण्याचे प्रयत्न, सामाजिक कार्यकर्त्यांना व माध्यमांना परस्परांबद्दल जागरूक करण्याचा उपक्रम अशा वाटांनी जाताना सामाजिक संस्थांचं बदलतं स्वरूप जाणवलं, आणि महत्त्वही. आकाशवाणीतून बाहेर पडण्याची मनाची तयारी झाली होती, मात्र व्यावहारिक कारणांमुळे हा निर्णय लांबवावा लागत होता. दरम्यानच्या काळात परदेशातील रेडिओचं काम बघण्याचा अनुभव गाठीला बांधला गेला. आपल्याकडे खासगीकरण झाल्यानंतरच्या वातावरणात बदललेला रेडिओचा चेहरा जवळून पाहता आला. या बदलांबद्दल त्यांनी मोकळेपणाने लिहिलं आहे. या सगळ्या प्रवासात प्रसारभारतीनंतरचे बदल, नवे प्रवाह हे सारं आलंच.
रेडिओतून बाहेर पडण्याची इच्छा होती, त्यामागे हे बदल होते आणि तिथलं राजकारणही. सरकारी क्षेत्रात आलेला हा त्रासदायक अनुभव मेधासाठी कसोटीचा ठरला. नियमांना बगल देऊन झालेल्या बदलीविरुद्ध दिलेला लढा हा त्यांच्या रेडिओ-पर्वातील अखेरचा अनुभव. त्यातून विजयी होऊन त्या बाहेर पडल्या. सरकारी लाल फीत आणि कोर्टाची पायरी याबद्दल लिहिताना वास्तव समोर ठेवणारी तटस्थ भूमिका घेऊन त्यांनी लिहिलं आहे.
केवळ एक नोकरी म्हणून आकाशवाणीतल्या कामाकडे न बघता त्यात जीवनाचं, सामाजिक जाणीवेचं तत्त्व शोधणाऱ्या एका संवेदनशील व्यक्तीच्या अनुभवांचं हे पुस्तक आहे. आकशवाणी हे चळवळीचं माध्यम, प्रसंगी मुखपत्र कसं बनू शकतं हे ओळखून काम करणाऱ्या मेधासारख्या व्यक्ती विरळाच असतात. आपल्या कामात रस घेऊन, त्यात बुडून जाऊन वाटचाल करणं महत्त्वाचं मानून झालेली वाटचाल वाचणं विशेषतः तरुणांना प्रेरणादायी ठरू शकेल. साध्या शैलीत केलेलं हे लेखन मागच्या काळाबद्दल सांगताना उद्याच्या भविष्याची चाहूल काय असेल याचा कानोसाही नकळतपणे घेतं. मुद्दाम कोणताही आविर्भाव न घेता केलेलं हे लिखाण आनंद देणारं आहे, तसंच अंतर्मुखही करून जाणारं आहे.
नंदिनी आत्मसिध्द
No comments:
Post a Comment