Thursday, January 19, 2012

सांडपाण्याच्या लिलावातून ग्रामपंचायत झाली लखपती


ग्रामविकासाची दृष्टी असेल, गावाचे पदाधिकारी व नागरिकांचे सहकार्य असेल तर विकास निश्चित साधता येतो हे बुलढाणा जिल्ह्यातील तळणी गावाने दाखवून दिले आहे. गावातील सांडपाण्याचा लिलाव करुन यावर्षी तळणी ग्रामपंचायतीने ३३ हजार रूपये तर गेल्या तीन वर्षात या माध्यमातून एकूण १ लाख ४ हजारांचे अतिरिक्त उत्पन्न मिळविले आहे.

तीन हजार लोकसंख्या असलेल्या तळणी गावाने सांडपाणी व्यवस्थापनात राज्यातील इतर ग्रामपंचायतीसमोर एक आदर्श उभा केला आहे. पाच वर्षापूर्वी या गावात भीषण पाणी टंचाई होती. २००७-०८ या वर्षात या गावाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटल्यानंतर गावाला मुबलक पाणी मिळायला लागले. आज या गावात दिवसातून दोन वेळा नळाद्वारे पाणी मिळेल इतके पाणी उपलब्ध असते. गावाला भरपूर पाणी मिळाल्याने साहजिकच गावातील सांडपाण्याचे प्रमाणही वाढले. त्यावेळेच्या सरपंच आशा नारखेडे यांनी सर्वांच्या सहकार्याने या सांडपाण्याचे व्यवस्थापन योग्य रितीने करण्याची आणि त्याद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची योजना आखून त्याबाबतचे नियोजन सुरू केले.

सांडपाणी हे शेतीसाठी उत्तम खत ठरू शकते, हे लक्षात घेऊन ते वाया जाण्याऐवजी शेतकऱ्यांना विकण्याची कल्पना सर्व गावकऱ्यांना पटली. यासाठी गावातील सर्व सांडपाणी गावानजिक असलेल्या एका नाल्यात सोडणे, तेथे बांध घालणे आणि जमा होणारे हे सांडपाणी विकण्याचा ठराव घेतला गेला.

हे पाणी विकत घेण्याला गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. २००८-०९ मध्ये या पाण्याचा २६ हजार ५९९ रुपयांत लिलाव झाला. ज्यांनी हे पाणी विकत घेतले त्या शेतकऱ्यांनी या पाण्यावर भरघोस उत्पन्न काढले. त्यानंतर २००९-१० साली एक वर्षासाठी हे पाणी ४७ हजारांना विकले गेले. तर तिसऱ्या वर्षी सहा महिन्यांसाठी या सांडपाण्याचा लिलाव करण्यात आला ज्यासाठी ग्रामपंचायतीस ३९ हजार ५०० रूपये मिळाले.

गावातील दुर्लक्षित असलेल्या या सांडपाण्याच्या माध्यमातून २००८-०९ या वर्षापासून ग्रामपंचायतीला तब्बल १ लाख ०४ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्याचबरोबर या सांडपाण्यावर शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्नही घेतले आहे. दुहेरी फायदा देणारी सांडपाण्याच्या पुनर्वापराची ही योजना इतर गावांसाठीही निश्चितच उपयोगी ठरू शकेल.

No comments:

Post a Comment