Tuesday, January 10, 2012

गतिमान प्रशिक्षणाची नांदी

जागतिकीकरणात संगणकीकरणाचा मोठया प्रमाणावर वापर केला जात आहे. त्याचे महत्‍व लक्षात घेवून महाराष्‍ट्र शासनाने संगणकीकरणाचे विविध प्रकल्‍प हाती घेतले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने उपलब्‍ध करून दिलेल्या सर्व साधनांचा वापर करुन शासकीय कामकाजात गतिमानता आली आहे. कोणतीही नवीन संकल्‍पना प्रभावीपणे कृतीत आ‍णण्‍यासाठी त्‍यासंबधीचे सखोल ज्ञानाची माहिती असणे गरजेचे असते. युनिकोड अथवा संगणकीकरणाचे विविध प्रकल्‍प शासन हाती घेत आहे. याची फलश्रुती चांगली व्‍हावी म्‍हणून विविध प्रशिक्षणाची गरज आहे. हे प्रशिक्षण सर्वांना यशदा किंवा अन्‍य संस्‍थेमार्फत देण्‍यासाठी अधिक खर्च व वेळ लागणार आहे. यासाठी व्‍हर्च्‍युअल प्रशिक्षणाची कल्‍पना पुढे आली. एका ठिकाणाहून राज्‍याच्‍या विविध भागात एकाचवेळी प्रशिक्षण देणे या उपक्रमामुळे शक्‍य झाले आहे. याची माहिती देणारा व पहिल्या उपक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी देणारा निरोप प्राप्त झाला. ही माझ्यासाठी नामी संधी होती.

या अभिनव उपक्रमाची सुरूवात सकाळी ११ वाजता जिल्‍हा परिषद सभागृहात होणार होती. प्रशिक्षण सुरु होण्‍यापूर्वीच सभागृहात उपस्थित राहिलो. अहमदनगर जिल्‍हयातील पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षणासाठी सभागृहात उपस्थित होते. त्‍यांची संख्‍या सुमारे पाचशेच्‍यावर होती. प्रशस्‍त, अद्ययावत, सर्वसुविधायुक्‍त जिल्‍हा परिषद सभागृहात लावण्‍यात आलेल्‍या मोठया स्क्रिनकडे त्‍यांच्‍या उत्‍स्‍कुतेने नजरा लागल्‍या होत्‍या. कारण महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये प्रथमच दूरस्थ प्रशिक्षणाची कल्‍पना प्रत्‍यक्ष कृतीत साकार होणार होती.

पुणे येथील यशवंतराव चव्‍हाण विकास प्रशिक्षण प्रबोधिनीचे महासंचालक डॉ.संजय चंहादे यांनी पुणे येथून राज्‍यातील प्रशिक्षणार्थीशी व्हिडीओ कॉन्‍फरसिंगद्वारे संवाद साधून अभियान उपक्रमाचा शुभारंभ केला. माहिती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करताना आजच्‍या काळात महिती तंत्रज्ञानाचे महत्‍त्‍व विशद केले. प्रशिक्षणार्थीशी संवाद साधून अपेक्षा काय आहेत हे जाणून घेतले. यावेळी यशदाचे उपमहासंचालक डॉ. कृष्‍ण लव्‍हेकर,सी डॅकचे व्‍याख्‍याते योगेश कुलकर्णी उपस्थित होते.

या दूरस्थ प्रशिक्षणाचा उपक्रम महिती तंत्रज्ञान संचालनालय, यशदा व सी-डॅक यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राज्‍यातील १२ जिल्‍हयांमध्‍ये प्रथम राबविण्‍यात आला. यामध्‍ये राज्‍यातील १३४ पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला. महाराष्‍ट्र हे मराठी भाषिक राज्‍य आहे हे लक्षात घेवून शासन व्‍यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्‍हावा. यासाठी आजचे प्रशिक्षण युनिकोडविषयी ठेवण्‍यात आले होते. गावपातळीवर ही युनिकोड म्‍हणजे काय त्‍याचा वापर कसा करावा. त्‍याचे फायदे आदी संबधी सविस्‍तर माहिती सी-डॅकतर्फे सूर्य पचौरी यांनी सोप्‍या भाषेत प्रात्‍याक्षिकासह दिल्‍याने प्रशिक्षणार्थीना हे ज्ञान अवगत करण्‍यास सुलभ झाले. हा प्रशिक्षणाचा उपक्रम सध्‍या १२ जिल्‍हयात राबविण्‍यात आला असला तरी टप्‍याटप्‍याने राज्‍यात सर्वत्र त्‍याची लवकरच अंमलबजावणी करण्‍यात येणार आहे या प्रशिक्षणामुळे वेळ व पैसा यांची बचत झाली. अन प्रशिक्षणचा हेतू ही साध्‍य झाला हे म्‍हटलं तर वावगं होणार नाही.


  • दिलीप गवळी

  • No comments:

    Post a Comment