Wednesday, January 25, 2012

जागृत मतदार


आम्ही गोंधळी गोंधळी. . आम्ही जागरुक गोंधळी
आमचा घालावा गोंधळ आणि वाजवु प्रबोधनाचे संबळ
नको हक्काची आबाळ. . मतदानाची इच्छा करा प्रबळ
लोकशाहीच्यामार्गाने चाला. . नाही म्हणून नका मतदानाला
अंगीचा घालूनी कंटाळा. . मतदानाची वेळ नीट पाळा
दुसरं काम तात्पुरतं ठेवा बाजूला, सगळया मतदारांना घ्या संगतीला
निर्भयपणे करा मताचे दान . . नेता निवडा आपल्या मतानं
मतदानाबाबत नको उदासीनता . .लोकशाहीची जपुया महानता. .

असा गोंधळ कानावर पडला आणि चालणारी पाऊलं एकदम थबकली. मतदानासाठी आवाहन करणारा हा आगळावेगळा गोंधळ नक्कीच लोकांच्या मनाला भावून जात होता म्हणूच या गोंधळ्याभोवती भलीमोठी गर्दी जमली होती. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय २५ जानेवारी २०१२ ला दुसरा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करते आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाचा मुलभूत अधिकार बजावण्याचे आवाहन करणारा हा गोंधळ आणि या माध्यमातून करण्यात येणारी जनजागृती निश्चितच लक्षवेधी ठरत होती.

निवडणुका आल्या की मतदारयादीत नाव नसणं, नावात- रहिवाशी पत्त्यात चुका असणं किंवा बदल झालेला असणं, छायाचित्र ओळखपत्र नसणं यासारख्या अनेक तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात. पण त्यासाठी मतदार म्हणून आपण स्वत: किती दक्ष असतो, आपल्या नावातील- पत्त्यातील बदल, सुधारणा करून घेण्यास आपण किती प्रयत्न करतो हे समजून घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच आपण पात्र असताना मतदानाचा हक्क बजावणंही. जी व्यक्ती वयाची १८ वर्षे पूर्ण करते त्या व्यक्तीला राज्यघटनेने मतदानाचा मुलभूत हक्क प्रदान केला आहे. पण या मुलभूत हक्काची आपण कितीजण अंमलबजावणी करतो ? हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. मतदानाच्या टक्केवारीवरून हे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे.

आपलं मत- आपला हक्क आणि आपलं मतदान केंद्र याबाबतीत जागरूक राहताना मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावं, मतदानाचा मुलभूत अधिकार बजावावा आणि मतदानाला न जाण्याची आणि मतदान न करण्याची उदासीनता मनातून काढून टाकावी यासाठी विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जात असते. 

तरूणांना आपण देशाचा आधारस्तंभ मानतो. याच आधारस्तंभाने पुढे येऊन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं, समृद्ध, सशक्त लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करावा यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक वर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिला आणि युवकांचे मतदानाचे प्रमाण वाढावे, त्यांनी पुढे येऊन निर्भयपणे आपला मतदानाचा आणि घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा वापर करावा या उद्देशाने या कार्यक्रमात महिला आणि युवकांना समोर ठेऊन विशेष जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यादृष्टीने एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. मतदार असल्याचा अभिमान, मतदानासाठी सज्ज, जागृत मतदार, समृद्ध लोकशाहीचा आधार, तुमचे मत- तुमची निर्णयशक्ती, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा सहभाग अशा प्रोत्साहनात्मक स्वरूपात मोहीम राबविण्यात येत असून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय योगदान देण्याबद्दल, सहभागी होण्याबद्दल आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विविध प्रसारमाध्यमांचा उपयोगही करून घेण्यात आला आहे. १८ ते १९ वयोगटातील मतदारांना त्यांनी त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी एक विशेष मोहीम देखील या निमित्ताने घेण्यात आली. 

ज्या मतदाराचा जन्मदिनांक १ जानेवारी १९९२ ते १ जानेवारी १९९४ या दरम्यान आहे, अशा १८ ते १९ या वयोगटातील मतदारांना, त्यांचे नाव मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची विशेष संधी यानिमित्ताने करुन देण्यात आली. यासाठी मतदार नोंदणीचा नमूना अर्ज क्रमांक ६, रंगीत छायाचित्र, मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक होते. ज्या पात्र तरुण नागरिकांनी अद्याप त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवले नसेल त्यांनी त्वरित मतदार नोंदणी करावी आणि दि. २५ जानेवारी २०१२ या ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कार्यक्रमात छायाचित्र मतदार ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन ही या निमित्ताने करण्यात आले होते.

राज्यात आजमितीस एकूण ७ कोटी, ८७ लाख, २१ हजार ४७२ नोंदणीकृत मतदार आहेत. यामध्ये ४ कोटी १४ लाख, ७५ हजार ३६० एवढे पुरुष तर ३ कोटी ७२ लाख, ४५ हजार ८४२ महिला मतदार आहेत. यापैकी ८२.३४ टक्के मतदारांना त्यांचे छायाचित्र ओळखपत्र वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. 

राज्यात नव्याने सुमारे १९ लाख मतदारांची नाव नोंदणी झाली आहे. नव्याने नोंदणी झालेल्या १८ ते १९ वयोगटातील ५ लाख ५० हजार ३८६ युवक-युवतीना छायाचित्र ओळखपत्र तसेच मतदार दिन बिल्ला वाटपाचे काम प्रत्येक मतदान केंद्रावर केले जाणार आहे. यामध्ये ३ लाख ६२ हजार ११४ पुरुष तर १ लाख ८८ हजार २७२ महिला मतदाराचा समावेश आहे.त्याचप्रमाणे नव्याने नोंदणी झालेल्या २० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या एकूण १३ लाख ५० हजार ५८८ इतकी आहे. त्यांनाही यावेळी फोटो ओळखपत्र तसेच मतदार दिन बिल्ला वाटप केले जाणार आहे. यामध्ये पुरुष मतदार ७ लाख ४७ हजार ०४३ तर महिला मतदार ६ लाख ०३ हजार ५४५ इतक्या आहेत.

मुख्य निवडणूक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी विकसित केलेल्या http://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही निवडणूक प्रक्रियेसंबंधीची माहिती आणि त्यासाठीचे फॉर्म्स उपलब्ध करुन देण्यात आले असून हे फॉर्म्स भरुन ते संबंधित मतदारसंघातील यादीत नोंदविण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी, यांच्या कार्यालयात नेऊन देता येतील.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आपण मतदार असल्याचा अभिमान बाळगून मतदानासाठी सज्ज राहताना सुदृढ आणि सशक्त लोकशाही च्या निर्मितीमधील आपला सहभाग सर्वांनी अधिक बळकट करावा एवढीच या निमित्ताने अपेक्षा.

No comments:

Post a Comment