नान्नज म्हटले की नजरेसमोर उभे राहते ते सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेले एक गाव. कै.नानासाहेब काळे आणि त्यांचे चिरंजीव कृषीभूषण दत्तात्रय काळे यांनी अथक परिश्रमातून द्राक्ष संशोधन आणि उत्पादनामध्ये जिल्ह्याची कीर्ती सातासमुद्रापलिकडे पोहोचविली आहे.
नान्नजच्या कै.नानासाहेब काळे यांनी बारामतीहून १९५८ साली प्रथम बिया असलेल्या द्राक्षाचे वाण आणून त्याची लागवड केली. त्यावेळी जिल्ह्यात द्राक्षांच्या जाती विकसित झालेल्या नव्हत्या. त्यामुळे बिया असलेली द्राक्षेही चवीने खाल्ली जायची. परंतु बी विरहित द्राक्ष संशोधन करण्याचा कै.काळे यांनी ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी कॅलिफोर्नियात विकसित झालेल्या 'थॉमसन सिडलेस' या द्राक्षाच्या जातीचे वाण १९६४ साली बारामतीहून आणले. त्यावर सातत्याने संशोधन करून त्यांनी १९८० साली 'सोनाका' हे नवीन वाण शोधले. तर पुन्हा दहा वर्षानंतर १९९० साली 'शरद सिडलेस’चा उदय झाला.
दत्तात्रय काळे यांनीही आपल्या पित्याचा वारसा पुढे अविरतपणे चालू ठेवला. त्यांनी शरद सिडलेस मधून पुन्हा २००४ साली ‘सरिता सिडलेस’ व २००८ साली ‘नानासाहेब सिडलेस’ या दोन नवीन वाणांचे संशोधन केले.
उत्तर सोलापूर तालुका तसेच नान्नजचा हा भाग अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. द्राक्षाला जास्त पाणी लागते. त्यामुळे सहसा या पिकाकडे येथील शेतकरी वळत नाहीत. श्री.काळे यांनी राज्यात प्रथमच द्राक्ष पिकासाठी मल्चिंग प्लास्टिक पेपरचा वापर करून पाण्याची ५० टक्के बचत केली. सुरुवातीला ८ एकर क्षेत्रात द्राक्ष असलेली काळे यांची सध्या ४० एकर द्राक्ष बाग आहे. पाणी साठविण्यासाठी त्यांनी शेतात ३ कोटी लिटर क्षमतेचा टँक बांधला आहे.
हैदराबाद येथे १९९४ मध्ये भरलेल्या देशपातळीवरील शेती प्रदर्शनात शरद सिडलेसला 'बेस्ट फ्रूट ऑफ द फ्रूट' हा बहुमान मिळाला आहे. तर बारामती येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय द्राक्षे पिकावरील चर्चासत्रात नानासाहेब सिडलेस या द्राक्ष वाणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यातून द्राक्ष उत्पादक श्री.काळे यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात. सध्या सोनाका तसेच नानासाहेब सिडलेस या वाणाला राज्यात मोठी मागणी असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात सर्वत्र काळे यांनी संशोधित केलेल्या द्राक्ष वाणाच्या लागवडीला शेतकरी प्राधान्य देत असून त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक द्राक्ष उत्पादकाला मार्गदर्शनाचेही कार्यही त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहे.
No comments:
Post a Comment