महिलांच्या उन्नतीसाठी बचतगट चळवळीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे आयोजित सरस प्रदर्शनात महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनात दापोलीच्या महिलांसाठी प्रेरक ठरलेल्या भैरव महिला बचतगटाने सहभाग घेतला.
दापोली तालुक्यातील देहण या ग्रामीण भागात वर्षानुवर्षे मोलमजुरी करुन काबाडकष्ट करणाऱ्या महिला राहतात. या महिलांपैकी १५ महिलांनी एकत्रित येऊन बचतगट स्थापन केला. या गटाला सुरुवातीला २५ हजार रुपयांचा रिव्हाल्वींग फंड मिळाला. या भांडवलातून माहिलांनी स्थानिक पातळीवर मसाला, मिरची, धने तसेच भाजीपाल्यांची विक्री करुन बचतगटाला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला यश आले. ६ महिन्यात २५ हजाराचे कर्ज फेडून ३० हजाराची निव्वळ कमाई झाली. प्रत्येकीला घरचा संसार सांभाळून कुटुंबाच्या खर्चासाठी थोडीफार रक्कम हाताशी येऊ लागली.
महिलांचा आत्मविश्वास वाढू लागला. संतोष कानसे यांच्यासारख्या प्रेरकाचे मार्गदर्शन मिळाल्यावर महिलांना मोठी झेप घेण्याचे वेध लागले. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नांना सुरुवात केली. दापोली परिसरात काजू लागवड मोठ्या प्रमाणात झालेली असल्याने काजू प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल मुबलक प्रमाणात मिळणे शक्य होते, म्हणून या महिलांनी प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली.
मालवण येथील नामांकित झांटे कॅश्यु प्रोसिसिंग युनिटला भेट देऊन महिलांनी उद्योगाची माहिती घेतली. २००४ मध्ये वैनगंगा बँकेकडून २ लाख ५० हजाराचे कर्ज घेण्यात आले. काजू प्रोसिंसिंगसाठी ४० हजाराचे यंत्र तसेच सुमारे २ लाखाची काजू बी खरेदी करण्यात आले. गावातच कच्चा माल भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने काजू प्रक्रिया उद्योगाची सुरुवात चांगली झाली. काजूगर, मसाला काजू, खारे काजू, मिरी काजू अशी विविध उत्पादने घेण्याची सुरुवात झाली. सुरुवातीला बाजार मिळविण्यासाठी महिलांनी खूप परिश्रम घेतले. नंतरच्या काळात उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळत गेला. वर्षाकाठी ५ लाखाची उलाढाल सुरु झाली.
केवळ उत्पादनवाढीवर न थांबता आपली विक्री वाढविण्यासाठी विविध ठिकाणी प्रदर्शनात आपला माल ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तर प्रदेशात लखनौ, दिल्लीतील गुडगाव, राज्यातील औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात बचतगटाने सहभाग घेतला. प्रत्येक प्रदर्शनात चांगली विक्री झाली. गत वर्षी नवी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या मुंबई महालक्ष्मी सरस प्रदर्शनात तर १० दिवसात पहिल्या क्रमांकाची ३ लाख ५० हजार रूपयांची विक्री झाली.
प्रदर्शनात प्रथम दर्जाचा काजू ८०० रुपये किलो दराने विकला गेला. प्रत्येक प्रदर्शनात चांगली विक्री झाली. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची केवळ ५ वर्षात परतफेड करण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे सांगताना गटाच्या महिला सदस्यांच्या चेहऱ्यावर झळकणारे समाधान त्यांच्या यशाची कहाणी सांगून जाते.
'केल्याने होत आहे.. आधी केलेची पाहिजे' असा संदेश इतर गटांना देत या गटाची वाटचाल समृद्धीच्या दिशेने सुरू आहे. त्यांचे प्रयत्न पाहिल्यावर त्यांच्या यशाबाबत खात्री पटते.
No comments:
Post a Comment