Wednesday, January 18, 2012

शेततळ्याच्या पाण्यावर भाजीपाल्याची शेती


कोरडवाहू शेती ही बहुतांशी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाच्या अनियमितेमुळे अशा शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे खात्रीशीर राहत नाही. यावर सामूहिक शेततळ्याचा पर्याय शोधून पाण्याची सोय झाल्याने कोरडवाहू शेतीमधूनच अधिक आणि खात्रीशीर उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयोग बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील कुबेफळ येथील शेतकरी रामराव फड यांनी करून दाखविला आहे.

फड यांनी कोरडवाहू शेतीला पाण्याचा शाश्वत आधार देण्यासाठी सामूहिक शेततळे तयार केले. शेताशेजारी असणाऱ्या ओढ्यावर सिमेंट बंधारा बांधला. त्यामुळे पाण्याची पातळी वर आली आहे. बंधाऱ्यालगत ४४ बाय ४४ मीटर आकाराचे १ कोटी २० लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले. या शेततळ्याचा फड यांना मोठा फायदा झाला असून कमी कालावधीत येणारी भाजीपाल्याची शेती या शेततळ्याच्या पाण्यावर त्यांनी फुलवली आहे.

सुरूवातीला टोमॅटो, मिरची आणि फुलगोबी अशा भाजीपाल्यांच्या पिकांचे उत्पादन त्यांनी घेतले. यावर्षी त्यांना ६० दिवसात येणाऱ्या फुलकोबीचे भरघोस उत्पादन मिळाले आहे. फुलकोबीच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी पाच फवारण्या केल्या असून त्यामुळे फुलकोबीवर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. सुरुवातीला आठ दिवस दररोज सहा तास ठिंबकच्या सहाय्याने पाणी दिले, तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही याचीही दक्षता त्यांनी घेतली. नंतर पाऊस सुरु झाल्याने पाणी देण्याची आवश्यकता भासली नाही. लागवडीनंतर ६० दिवसांनी काढणीला सुरुवात केली. येथून उत्पादित झालेल्या कोबीच्या एका गड्ड्याचे वजन सर्वसाधारण एक किलो भरले आहे.

शेतीत पिकविले भरघोस पण विक्री व्यवस्थापन नसेल तर शेतीत खर्च आणि उत्पन्न हे समीकरण जुळत नाही. यासाठी फड यांनी बाजाराचा अंदाज घेत ज्या ठिकाणी चांगला भाव आहे त्या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी पाठविण्याचे नियोजन केले. आता विदर्भासह मराठवाड्याच्या बाजारातही ते भाजीपाला पाठवितात. जालना येथील बाजार नजीक असल्याने फड या बाजारात भाजीपाला पाठवू लागले आहेत.

उत्कृष्ट भाजीपाला उत्पादक अशी त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेतल्यास निश्चितच उत्पन्न वाढीस हातभार लागेल.

No comments:

Post a Comment