शब्दाचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर सामान्यरूपात 'ई' च्या जागी 'य' येतो किंवा 'ऊ' च्या जागी 'व' येतो. उदा.- फाईल-फायलीत, काईल-कायलीत, देऊळ-देवळात, पाऊस-पावसात.
पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो, ('श्या' होत नाही). उदा. पैसा-पैशाचा, घसा-घशाचा, ससा-सशाचा.
पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी असलेला 'जा' सामान्यरूपात तसाच राहतो, (त्याचा 'ज्या' होत नाही). उदा.- मांजा-मांजाने, गांजा-गांजाचे, सांजा-सांजाची.
मधल्या अक्षरातील 'क' किंवा 'प' चे द्वित्व सामान्यरूपाच्या वेळी निघून जाते. उदा.- रक्कम-रकमेचा, तिप्पट- तिपटीने.
मधल्या 'म' पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर अनुस्वारविरहित होते. उदा.- अंमल-अमलात, किंमत-किमतीचा, गंमत-गमतीने, हिंमत-हिमतीने.
ऊकारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही. उदा.- गणू-गणूस, शकू-शकूस.
धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी 'व' असेल तरच 'वू' किंवा 'वून' होईल. उदा.-चाव-चावू-चावून, लाव-लावू-लावून, जेव-जेवू-जेवून, खा-खाऊ-खाऊन, गा-गाऊ-गाऊन, पी-पिऊ-पिऊन, धू-धुऊ-धुऊन.
(३) किरकोळ
नियम ९ : पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामांस लावताना दीर्घोपान्त्य लिहावा. उदा.- नागपूर, संबळपूर, तारापूर.
संस्कृतात 'शहर' याअर्थी 'पुर' हा शब्द प्रचलित आहे. तोच मराठीत 'पूर' असा दीर्घोपान्त्य लिहिला जातो. मराठीतील उच्चारपद्धतीला हे धरून आहे. त्यामुळे गावांची नावे वरीलप्रमाणे लिहिण्यात यावीत.
नियम १० : कोणता, एखादा ही रूपे लिहावी कोणचा, एकादा ही रूपे लिहू नयेत.
नियम ११ : हळूहळू, मुळूमुळू, खुटूखुटू या शब्दांतील दुसरा स्वर व चौथा स्वर दीर्घ लिहावा.
वरील शब्दांप्रमाणेच तसूतसू, झुंजूमुंजू, चिरीमिरी यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील ऊकार व ईकार मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ लिहावे. परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावे. उदा.- लुटुलुटु, दुडुदुडु, रुणुझुणु.
नियम १२ : एकारान्त नामाचे सामान्यरूप याकारान्त करावे. उदाहरणार्थ- करण्यासाठी, फडक्यांना (म्हणजे फडके यांना), पाहण्याला. अशा रूपांऐवजी करणेसाठी, फडकेंना, पाहणेला यांसारखी एकारान्त सामान्यरूपे करू नयेत.
एकारान्त सामान्यरूपे आज फारशी प्रचलित नाहीत. त्यांऐवजी याकारान्त सामान्यरूपे वापरली जातात. म्हणून यांचेकडे, कळवणेसाठी, करणेबाबत यांसारखी रूपे वापरू नयेत.
नियम १३ : लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्यावेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे. अन्य प्रसंगी तसे लिहू नये.
नाटकात किंवा कथा-कादंबरीत पात्रांच्या तोंडी, ''असं केलं'', ''असं झालं'', ''मी म्हटलं'' असे लिहिण्यास हरकत नाही. एरव्हीच्या लेखनात तसे लिहू नये. वरीलप्रमाणे बोली भाषेची रूपे वापरताना अकारान्त रूपे अनुस्वारयुक्त लिहिणे आवश्यक आहे.
नियम १४ : क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान् इत्यादी मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अकारान्त लिहावे.
मराठीत रूढ झालेले संस्कृत शब्द सामान्यत: जसेच्या जसे लिहिण्याची पद्धत आहे. त्यातील काही शब्द मुळात व्यंजनान्त आहेत. त्यानुसार वरील शब्द क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात् असे लिहिण्याचा प्रघात होता. परंतु मराठीच्या प्रकृतीनुसार विद्वान, कीर्तिमान, शक्तिमान यांसारखे शब्द स्वरान्त लिहिण्याचीही पद्धत रूढ होती व आहे. काही वेळा 'अर्थात्', 'क्वचित्' या अव्ययांपुढे 'च' हे अव्यय वापरण्यात येते. त्यावेळी 'अर्थातच', 'क्वचितच' असे लिहावे लागते. त्यामुळे वरील प्रकारात मोडणारे सर्व शब्द स्वरान्त लिहिण्यात यावेत. असे आणखी काही शब्द पुढीलप्रमाणे आहेत. जसे :- किंचित, तद्वत, दैववशात, श्रीमान, धनवान, भगवान, विद्युत, परिषद, संसद, सम्राट इत्यादी.
कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.
इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अकारान्त अक्षर आता व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) लिहू नये. उदा.- वॉटसन, बायरन, कीट्स, एम.एल.सी., पीएच.डी. इत्यादी.
नियम १५ : केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावे. तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) लेखन मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे.
नियम १६ : राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावी. रहाणे-राहाणे, पहाणे-पाहाणे, वहाणे-वाहाणे अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना 'राहा, पाहा, वाहा' यांजबरोबरच 'रहा, पहा, वहा' ही रूपे वापरण्यास हरकत नाही.
नियम १७ : 'इत्यादी' व 'ही' (अव्यय) हे शब्द दीर्घान्त लिहावे. 'अन्' हा शब्द व्यंजनान्त लिहावा. 'इत्यादी' हे अव्यय नसून विशेषण आहे. त्यामुळे ते दीर्घान्त लिहावे.
नियम १८ : पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्वदीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.
No comments:
Post a Comment