पारंपरिक शेतीत अडकून न राहता शेतीतंत्राचा अभ्यास केल्यास वेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळते. उत्साह जाणवतो. असेच विविध प्रयोग डॉ. नंदकुमार तोटे आपल्या ११ एकरच्या मळ्यात घेतात. त्यांचे हे शिवार हे माई उद्यान म्हणून परिसरात प्रसिध्द आहे. या उद्यानाला भेट देण्याची संधी आयतीच चालून आली. निमित्त होते नेहमीच्या कार्यालयीन आढावा बैठकीचं. नागपूरचे संचालक भि.म.कौसल, अमरावतीचे उपसंचालक प्रमोद गवळी आणि विदर्भातील सर्व जिल्हा माहिती अधिकारी या सर्वांसह मी या आगळया वेगळया उद्यानाला भेट दिली. आम्ही सर्वजण पवनार येथील डॉ. तोटेंच्या माई उद्यान या शेतावर पोहचलो.
उपक्रमशीलता त्यांनी जोपासली आहे. वेगळेपणाचं धाडस केलं पण त्याचं उत्तम फळ आता त्यांच्या पदरात पडलयं याची प्रचिती शेतात पाऊल टाकल्याबरोबरच जाणवत होती.
हळदीचे पीक दिसत होते याबाबत विचारणा केली असता डॉ. नंदकुमार तोटे म्हणाले ही गंमतच झाली. आणले आल्याचे कंद पण पीक आले हळदीचे. त्याचं असं झालं शेतात आले लावायचे म्हणून अद्रकाचे कंद खरेदी करुन आणले. त्यात काही कंद वेगळ्या प्रकारचे होते. ते काय असेल म्हणून पाव एकरात पेरणी केली. ते हळदीचे कंद निघाले. त्यामुळे त्याची अधिक माहिती घेतली. या सर्व कंदांना वाढवत एक एकरपर्यंत नेले. त्याच हळदीने एका एकरात तब्बल पावणे दहा लाखांचे उत्पादन गेल्या वर्षी दिले.
वर्धा जिल्ह्यातील वायफड हे हळदीचे वाण प्रसिध्द आहे. परदेशात खाद्य पदार्थात रंग वापरताना कृत्रिम रंग न वापरता हळदीचा वापर होतो त्यासाठी सेरम हे वाण प्रसिध्द आहे. त्याला युरोपीयन देशातून मोठी मागणी आहे. त्या हळदीची लागवड केल्यास मोठी मागणी आहे. त्या हळदीची लागवड केल्यास शेतक-यांचे उत्पन्न आणि विदेशी मुद्रा या दोन्हीत वाढ होईल. हळदीच्या कच्च्या कंदांना स्वच्छ करुन प्रथम त्याला उकळावे लागते त्यानंतर त्याला वाळवून पॉलिश केल्यावर हळकुंड तयार होते ज्यापासून हळद तयार होते असं सांगून डॉ. तोटे म्हणाले की गेल्या काही वर्षात हळदीचा भाव ६० रुपयांवरुन ४०० रुपये किलोपर्यंत वाढला आहे.
हळदीच्या पिकात त्यांनी सांगलीच्या सिताफळाची ७५० झाडे लावली असून, आंतरपीक म्हणून ते त्यात ज्वारीची लागवड करतात. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते. त्यामुळे जूनला लागवड केल्यास मार्चमध्ये हळदीचे उत्पादन निघते त्यामुळे पाणी टंचाईचा फटका बसत नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीच्या बागा आहेत. त्या सर्व शेतक-यांना पाण्याची समस्या आहे ती डॉ. तोटे यांना जाणवत नाही. शेताच्या बाजूने महाकाली धरणाचाकालवा आहे. यातून मार्च महिन्यापर्यंत पाणी मिळते. नागपूर भागात संत्री आणि संत्र्यांचे मळे अशी शेती अधिक आहे. डॉ. तोटे यांनी एका एकरात मोसंबीची लागवड केलीय. तसेच एका एकरात लिंबूची बाग आहे. ११ पैकी ४ एकर शेती ते सेंद्रीय पध्दतीने करतात.
त्यांच्या कामाची दखल घेत कृषी विभागानं त्यांना यंदा शेतीनिष्ठ शेतकरी सन्मान दिला. शिवार भेट संपल्यानंतर आम्ही गाडीत बसताना माझ्या मनात हाच विचार होता खरोखरच आता पारंपरिक शेतीचा नाद सोडण्याची व नवा विचार करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.
No comments:
Post a Comment