संत एकनाथांनी ‘संस्कृत भाषादेवे केली। प्राकृत काय चोरापासौन झाली।।’’असा प्रश्न विचारलेला आढळतो. ह्यावरून इतर क्षेत्रे सोडाच, पण धार्मिक व्यवहारात मराठीच्या वापराला संपूर्णपणे प्रतिष्ठा लाभलेली नव्हती असं दिसतं. त्या काळात मराठी लोकभाषा असली तरी ज्ञानभाषा नव्हती. ज्ञानभाषा संस्कृत होती आणि संत व पंडित कवींनी संस्कृतमधले ज्ञान मराठीत आणण्यासाठी ग्रंथरचना केल्याचा दावा केला असला तरी तो केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरता मर्यादित होता. याचे एक कारण असं होतं की इंग्रजी अंमल प्रस्थापित होण्यापूर्वी ज्ञानाचा मक्ता ब्राम्हण आणि तत्सम जातींकडेच होता आणि ही मक्तेदारी कायम राहावी म्हणून ज्ञानभाषा संस्कृत असणं त्यांच्या सोईचं होतं. महानुभाव पंथाने व संतकवींनी वाङमय निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली असली तरी ती भक्ती व आध्यात्माच्या क्षेत्रात होती व रामायण, महाभारत, भागवत, पुराणे व गीता वगळता समृद्ध अशा संस्कृत काव्य-नाटकादी वाङमयावर आधारीत रचना मराठीत झाल्या नाहीत.
भारतीय परंपरेत चौदा विद्यांचा व चौसष्ट कलांचा उल्लेख आहे. आध्यात्मापासून राजनीतीपर्यंत आणि आयुर्वेद, गणित, ज्योतिष, तत्त्वज्ञानापासून अर्थशास्त्रापर्यंत अनेक विषयांवर संस्कृत भाषेत विपुल लेखन झाले आहे. पण हे विषय मराठीत आलेच नाहीत. याचा अर्थ त्याकाळी महाराष्ट्रात ज्ञानाची परंपरा नव्हती का? तर होती. शेती आणि बलुतेदारी व्यवसाय सक्षमपणे चालू होते आणि त्याविषयीचे ज्ञान परंपरेने पुढल्या पिढीकडे संक्रमित होत होते. अ.पां.देशपांडे यांनी ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि मराठी भाषा’ या लेखात (अंतर्नाद, सप्टेंबर २०११) म्हटल्याप्रमाणे घरबांधणी, सांडपाणी-व्यवस्था यांचे तंत्रज्ञान त्या त्या काळास अनुकूल असे पूर्वीपासून होते आणि त्यासाठी – मग ती प्राकृत असो की आणखी काही – तत्कालीन मराठी भाषा वापरली जात असे. त्यामुळेच प्लम बॉबला ओळंबा, स्पिरिट लेव्हलला पाणसळ, ट्रॉवेलला करणी अथवा थापी असे जे शब्द आजही ग्रामीण भागात वापरले जातात ते त्यांच्यापर्यंत पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. ..
पेशव्यांच्या काळी सरदार पानसे त्यांचे तोफखानाप्रमुख होते आणि ते उखळीच्या तोफांसाठी दारुगोळा बनवीत. हे तंत्रज्ञान तेव्हा त्यांना अवगत होते. शिवाजी महाराजांनी स्थानिक जनतेच्या सहभागानेच अनेक नवीन किल्ले बांधले, आरमार उभारले, ते ‘सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुलकरां’ सारखे स्थापत्य अभियांत्रिकीतील तज्ज्ञ उपलब्ध होते म्हणूनच. परंतु या ज्ञानाचे संहितीकरण झाले नव्हते. परंपरेने चालत आलेल्या ज्ञानात भर पडत नव्हती आणि ज्ञानाचे आदान-प्रदान होत नव्हते. या अर्थाने मराठी ज्ञानभाषा नव्हती. अर्थात ही स्थिती केवळ महाराष्ट्र आणि मराठी भाषेपुरतीच होती असे नव्हे तर त्या काळातील सर्वच प्रांत व भाषांना लागू होती.
इंग्रजी राजवट स्थिर झाल्यावर महात्मा फुलेंसारख्यांच्या प्रयत्नांनी विशिष्ट वर्गाची ज्ञानाची मक्तेदारी हळूहळू नष्ट होऊ लागली. आज आपल्याला अभिप्रेत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान इंग्रजी अंमल सुरू झाल्यावरच आले. इंग्रजांनी ह्या देशात प्रथमच औपचारिक शिक्षणपद्धती सुरू केली. गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने १८२२ साली जगन्नाथ शंकरशेट, धाकजी दादाजी, मकबा इ. मुंबईतील नागरिक पुढार्यांच्या साहाय्याने ‘हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळी’ ह्या नावाची संस्था काढली. ह्या मंडळीने १८३५ पर्यंतच्या १०-१२ वर्षांत विविध शालोपयोगी ग्रंथ मराठीत तयार केले. मुंबई विद्यापीठातील वैद्यक शिक्षणाच्या पहिल्या तुकडीत भाऊ दाजी लाड होते आणि तेव्हा त्यांना वैद्यक शिक्षण मराठीतून मिळाले होते. सुरुवातीच्या एलफिन्स्टनसारख्या इंग्रज शासकांचे मत एतद्देशीयांना आधुनिक ज्ञान देशी भाषांतून द्यावे असे होते. परंतु दुर्दैवाने मॅकॉलेसारख्यांच्या विचारसरणीचा विजय झाला आणि प्राथमिक शिक्षण वगळता शिक्षणाचे माध्यम इंग्रजी झाले. १८४० ह्या वर्षी स्थापन झालेल्या प्रांतनिहाय शिक्षण मंडळांपैकी (बोर्ड ऑफ एज्युकेशन) मुंबई इलाख्याच्या मंडळाचा अध्यक्ष आस्कीन पेरी ह्याने सर्वत्र शिक्षणाचं माध्यम हे इंग्रजी करण्याचा ठराव मांडला. त्याला कर्नल जर्व्हिस आणि तीन भारतीय सभासद ह्यांनी विरोध केला. मध्य युगात युरोपात सर्व देशांत उच्च ज्ञान लॅटिन ह्या भाषेतच दिले जात होते. त्यामुळे सामान्य जनता त्या ज्ञानाला पारखी होत असे.
पुढे सर्व शाखांतील ज्ञान त्या त्या देशाच्या भाषेत द्यावयाची प्रथा पडली. ह्याचा परिणाम असा झाला की, उच्च ज्ञानाचे झरे सामान्य जनांपर्यंत पोहोचले. त्या इतिहासापासून काहीच धडा न घेता मूठभर इंग्रजांनी आपली मातृभाषा लक्षावधी भारतीयांवर लादायची काय? असा प्रश्न जर्व्हिस ह्यांनी विचारला होता. पेरीने हट्टाने आदेश काढून चवथी ते सातवी (तत्कालीन मॅट्रिक) ह्या वर्गात मराठी वगळता अन्य सर्व विषयांच्या शिक्षणाचं माध्यम इंग्रजी हे केलं आणि ही व्यवस्था पुढे १०० वर्षे तशीच राहिली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ह्यांनी देशी भाषांचा विद्यापीठांत समावेश झाल्यास त्यांत अधिक चांगली पुस्तकं तयार होतील, अशी सूचना रजिष्ट्रार ऑफ नेटिव्ह पब्लिकेशन्स ह्यांच्याकडून करवून विद्यापीठाच्या कार्यकारिणीत चर्चा घडवून आणली. तिथे बहुमत मिळत नाही असं पाहून एम. ए., एम.डी. (वैद्यकीय), एल. एल. बी. ह्या परीक्षेत विद्यार्थ्यांना त्या त्या विषयावरील एक प्रबंध मातृभाषेत लिहिण्याची अट घालावी असा प्रस्ताव मांडला. पण तो मान्य झाला नाही. (ना.वा. पाटणकर, “मुंबई विद्यापीठात मराठीची प्रस्थापना - १८५८ ते १९४७”, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, एप्रिल, १९८४) असे असूनही वैयक्तिक स्तरावर मराठीला ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करण्याचे प्रयत्न राजवाडे, केतकरांसारख्या एकांड्या शिलेदारांनी केले.
No comments:
Post a Comment