या बोलक्या शब्दकोशात शैक्षणिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, विज्ञान, वित्त, प्रशासकीय, व्यावहारिक अशा अनेक क्षेत्रांतले एकूण चार लाख शब्द आहेत. हा शब्दकोश आपल्याला इंग्रजी शब्द, त्याचा उच्चार, स्पेलिंग आणि त्याचा मराठी अर्थ अशी सगळी माहिती सांगतो. तो आपल्याशी ब्रिटिश आणि अमेरिकन अशा दोन पद्धतीने बोलतो. शिवाय आपल्याला आवाज निवडण्याचीही सोय आहे. स्त्री-पुरुषांसह इतर २४ प्रकारच्या आवाजात आपण निवडलेल्या शब्दाविषयी सगळं काही ऐकू शकतो. पाचशे-सहाशे पानांचा लिखित शद्बकोश हाताळताना जो कंटाळा येतो तो दृक्-श्राव्य माध्यम असल्याने इथं जाणवत नाही आणि वेळही वाचतो. कारण संगणकामुळे क्षणात अर्थ मिळतो. शब्द ऐकलाही जातो आणि पाहिलाही जातो, त्यामुळे लक्षात राहतो. शिवाय समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यात उपयोग, व्याकरण अशा सर्व गोष्टींचा समावेश या बोलक्या शब्दकोशात आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही आपला शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आणि नवीन भाषा शिकण्यासाठी याचा चांगला उपयोग होत आहे.
ज्यांना तत्काळ संदर्भ शोधायचा आहे त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच आहे. संगणकाच्या एका क्लिकवर तुम्ही एखाद्या शब्दाविषयी सर्व काही पाहू आणि ऐकू शकता. आज अनेक परदेशी लोक या शब्दकोशाच्या आधारे मराठी भाषा शिकत आहेत.
हा बोलका शब्दकोश आपल्या संगणकावर डाऊनलोड केलेला असेल आणि इंटरनेट वापरताना आपल्याला एखादा इंग्रजी शब्द अडला असेल तर आपण फक्त त्या शब्दावर डबल क्लिक करायचे. क्षणार्धात आपल्याला त्या शब्दाचा मराठी अर्थ मिळतो. या शब्दकोशाची संगणकप्रणाली विंडोज ९५ पासून विंडोज ७ या सर्वावर म्हणजे अगदी साध्यातल्या साध्या संगणकावरही चालते. यातील सॉफ्टवेअर फॉर्मुल्यामुळे यात ऑटो अपडेटची सुविधा आहे.
आपल्या संगणकावर इंटरनेटची सुविधा असेल तर या सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट झालेले नवीन शब्द आपोआप अपडेट होत राहतात. त्यामुळे नवीन शब्दांसाठी या सॉफ्टवेअरची नवीन सीडी घेण्याची आवश्यकता भासत नाही. या बोलक्या शब्दकोशाचं डेमो व्हर्जन www.khandbahale.com या वेबसाईटवरून मोफत डाऊनलोड करता येतं. या वेबसाईटला भेट दिली तर आपल्या समोर खुला होतो शब्दांचा खजिना. हिंदी, मराठी, तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम्, पंजाबी या सात भाषांमधील कोणत्याही शब्दांचा अर्थ मिळू शकतो. जगभरातल्या १२० देशांतून दर दिवशी एक ते दीड लाख शब्दांचा सर्च केला जातो. शिवाय गुगलवर टॉप रँकिंग म्हणून ही वेबसाईट ओळखली जाते. ही मराठी भाषेसाठी आणि शब्दकोश वापरणाऱ्यांसाठी नक्कीच गौरवाची बाब आहे.
मोबाईल सर्वांसोबत सदैव असतो. त्यामुळे या माध्यमातून कुणालाही, कधीही, कुठेही सहजपणे शब्दकोशाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी इंग्लिश-मराठी मोबाईल शब्दकोश विकसित केला आहे. विशेष म्हणजे, इंग्रजी व मराठी मिळून तब्बल दीड लाख शब्दसंपदा असणारी हा शब्दकोश मोबाईल फोनच्या मेमरीतील अत्यंत कमी म्हणजे एखाद्या रिंगटोन एवढीच जागा व्यापतो. नोकियातर्फे या डिक्शनरीला बेस्ट रिजनल लँग्वेज अँप्लीकेशनचा बहुमानही प्रदान करण्यात आला आहे. अगदी साध्यातल्या साध्या मोबाईल फोनवर सुद्धा ती सहजपणे कार्यान्वित होऊ शकते.
याविषयी अधिक माहिती वा व्हीडीओ डेमोसाठी www.khandbahale.com या संकेतस्थळावर अथवा ९४२२२-५२४६६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
No comments:
Post a Comment