Tuesday, January 3, 2012

बीडकरांनी साजरा केला ग्रंथोत्सव २०११

राज्य निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वाचन संस्कृती जोपासली जावी व या संस्कृतीच्या क्षेत्रात नवचैतन्य यावे, जास्तीत जास्त ग्रंथ वाचकांना उपलब्ध व्हावेत म्हणून मराठी भाषा विभागाच्या साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यामध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत बीड येथे संस्कार विद्यालयाच्या प्रांगणात दि. १५, १६ व १७ डिसेंबर २०११ या तीन दिवशी ग्रंथोत्सव विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. फक्त पाठीवर शाबासकीची थाप देऊन लढं म्हणा, बीडकरांना ते कोणत्याही चांगल्या उपक्रमासाठी सदैव तयार असतात तोच अनुभव या उपक्रमात आला. या उत्साहात सामान्य बीडकरही आपल्या घरचे कार्य समजून सामील झाला होता. त्यामुळे या ग्रंथोत्सवास एक वेगळेपणा प्राप्त झाला. 

ग्रंथोत्सवाच्या उदघाटन समारंभास जाताना संस्कार विद्यालयाच्या समोरच भाजीमंडीतील भाजी विकणाऱ्या एका बाईस सहज विचारले बाई समोरच्या शाळेत कसली गडबड आहे गं !

मॅडम तिथे पुस्तकाची दुकाने आली असं म्हणत्यात या प्रातिनिधीक उदाहराणावरुन किमान त्या बाईला येथे ग्रंथोत्सव आहे हे माहित होते.ते तिने तिच्या भाषेत सांगितले एवढेच.

दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता साहित्याची आवड असणारे जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उदघाटन उत्साहात पार पडले व वेळेचे बंधन पाळत आयोजकांनी कवी संम्मेलनास प्रारंभ केला.

सरस्वतीच्या दरबारी कवींची हजेरी ..…. 
बीड जिल्हा तसा अनेक गोष्टीत नावाजलेला आहे. परंतु येथील स्थानिक कवींनी सादर केलेल्या कविता एवढ्या अप्रतिम सुंदर असतील असे खरचं कोणाला सांगूनही पटणार नाही. या कवींना श्रोत्यांमधून भरभरुन दाद मिळाली. काव्यसंध्येची वेळ दोन तासाची होती परंतु घडयाळाच्या काट्याकडे न बघता ही मैफल तब्बल अडीच ते तीन तास रंगली आणि खऱ्या अर्थाने महात्मा गांधींच्या गावाकडे चला चा अर्थ उमगला व आपण माय मराठीच्या माहेरी आल्याचा आनंद झाला. काही कवींनी शोषित कष्टकरी वर्गाच्या भावनांची व्यथा कवितेतून मांडली तर काही कवींनी धर्म परंपरा, रुढी, चालीरिती यावर प्रकाश टाकणाऱ्या कविता सादर केल्या. काहींनी जगण्याची आशा व गरीब माणसाच्या समस्याचे चित्रण आपल्या कवितेतून प्रगट केले. आणि ग्रंथोत्सवाचा पहिला दिवस आनंदात पार पडला.

प्रकाशकांची हजेरी
या ग्रंथोत्सवाचे मुख्य अंग म्हणजे पुस्तकांची/ग्रंथाची विक्री संस्कार विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य मंडपात नावाजलेल्या ८ प्रकाशकांनी आपले पुस्तकाचे स्टॉल लावले. वाचन संस्कृतीला संजीवनी देण्यासाठी लाख मोलाची पुस्तके/ग्रंथ या स्टॉल मध्ये ग्रंथप्रेमींसाठी विक्रीस ठेवले होते. त्यात बालसाहित्य, कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह, नाटके, शासकीय प्रकाशने, संत साहित्य, विज्ञान तंत्रज्ञान, कृषी, ऐतिहासिक तसेच स्पर्धा परीक्षाची पुस्तके उपलब्ध होती. पुस्तकाची विक्री बरी होती. लोकांमध्ये पुस्तके विकत घ्यावीत असा दांडगा उत्साह होता. परंतु पुस्तकांच्या किंमती सामान्य वाचकांच्या आवाक्यात असाव्यात असा सूर वाचकांचा दिसून येत होता. तरीही बालकांची पालकांकडे पुस्तके विकत घेण्याची मागणी प्रकर्षाने जाणवत होती.

परिसंवाद 
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या परिसंवादाचा विषय होता दृकश्राव्य माध्यमांमुळे वाचन संस्कृती लोप पावते की काय ? या परिसंवादात साहित्याची जाण असणाऱ्या जिल्ह्यातील नामवंत मान्यवरांनी भाग घेतला. त्यात अमर हबीब, प्रा. एकनाथ आबुज, प्रा. हेमलता पाटील, प्रा. विद्यासागर पाटागणकर तसेच डॉ. सतिष साळुंके यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या परिसंवादाचा विषय पाहता व परिसंवादात भाग घेतलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा या विषयावरील गाढा अभ्यास पहाता परिसंवादाची चर्चा खूप रंगली.वाचक चांगलं वाचतीलही पण त्यासाठी चांगले लिहिले गेले पाहिजे असे मत मान्यवरांनी या परिसंवादात व्यक्त केले. व नंतर सौ. के.एस. के. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन दुसरा दिवस खेळी-मेळीच्या वातावरणात गेला.

प्रकट मुलाखत
कोणताही विषय वर्ज्य नसलेल्या व कोणत्याही विषयावर हक्काने बोलणारे परळीचे साहित्यिक प्रा. मधु जामकर यांची मराठी भाषा या विषयासंदर्भात घेतलेली मुलाखत ऐकण्यासाठी वाचक हजर होते. मुलाखतकारही अगदी तयारीनिशी आल्याचे त्यांनी विचारलेल्या प्रश्नावरुन जाणवत होते. परंतु मुलाखत् देण्यासाठी समोर बसलेल्या व्यक्ती तेवढयाच तोलाच्या व हजरजबाबी होत्या. एकंदरीत ही मुलाखत कायम स्मरणात राहिल अशी ठरली.

या ग्रंथोत्सवात वाचनाची आवड असणार्‍या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती जाणवली. तर माय मराठीवर मनातून प्रेम करणारा सामान्य वाचक ग्रंथोत्सवात मोठया संख्येने सामील झाला होता. एक गोष्ट येथे जाणवली ती म्हणजे मराठीतील एखादे चांगले पुस्तक आले तर ते इतर भाषेत येत नाही व इतर भाषेतील चांगले पुस्तक मराठीत लवकर भाषांतर होऊन प्रकाशित होत नाही याची खंत वाटली.

निरक्षर असूनही बहिणाबाई चौधरी मराठी माझी माय सरसोती-मला शिकविते बोली असे म्हणतात तर तीर्थामध्ये काशी –व्रत्तामध्ये एकादशी-भाषामध्ये तैशी- मऱ्हाटी शोभीवंत ज्ञानेश्वरांच्या या एका ओळीमधून मराठी भाषेचे स्थान किती मोठे व सर्वश्रेष्ठ आहे हे स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर सुरेश भटाची लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी / जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी ही कविता मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करते. संत ज्ञानेश्वर तुकाराम मुक्ताई, एकनाथ, नामदेव,चोखामेळा अशा कितीतरी संतानी मराठीत अभंग रचना करुन मराठी जनमानसात रुजवली वाढविली त्यामुळे तिला कधीही लोप न पावणाऱ्या अजानवृक्षाचे आर्युमान लाभले आहे. कोणत्याही भाषेला बोली भाषा असते तशी ती मराठीतही आहे. त्यात पुणेरी, वऱ्हाडी, खानदेशी, मालवणी या बोली भाषा म्हणजे मराठीच्या अंगाखाद्यावर खेळणारी नातवंडेच म्हणावे लागतील.

मराठी माणुस तसा उत्साहप्रिय आहे परंतु उत्साहात तंटा बखेडा झाला नाही असे सहसा घडत नाही परंतु या उत्सहामध्ये तसे काही झाले नाही. अख्या बीडकरांनी यात सहभाग घेतला. असे म्हणतात कोठे सोन्याच्या तर कोठे हिऱ्याच्या खाणी सापडतात परंतु महाराष्ट्राच्या या मातीत साहित्यिक जन्माला येतात. याच मातीत आपण जन्मलो याचा सार्थ अभिमान प्रत्येकामध्ये हवा या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाला वाचनाची आवड निर्माण व्हावी ही अपेक्षा.

No comments:

Post a Comment