‘या की ताई, आमची पुरणपोळी खाऊन जा. . . ही पुरणपोळी, नेहमीची नाहीय तर आवळ्याची आहे. . . वेगळी आणि औषधी. . . ती खा आणि निरोगी राहा. . .’ असं किंवा‘ या ताई हे आमचे वेफर्स खाऊन बघा, अहो हे बटाटय़ाचे नाही तर कांद्याचे वेफर्स आहेत, एकदम चटपटीत आणि कुरकुरीत’ असं सांगून जेव्हा महिला आपल्या आगळ्या वेगळ्या आवळ्याच्या पुरणपोळीचं तसेच कांद्याच्या वेफर्सचं मार्केटिंग करीत होत्या तेव्हा बचतगटातील महिलांनी आता त्यांच्या अंगभूत कला-कौशल्याने आणि त्याला मिळालेल्या प्रशिक्षणाच्या जोडीने आकाश मुठीत सामावून घेतल्याचे, त्यांच्या स्वप्नांना कर्तृत्वाचे पंख मिळाल्याचे स्पष्ट दिसत होते. निमित्त होते महालक्ष्मी सरस २०१२ चे.
जिद्द जिवंत असली की जीवन उभं करता येतं. जगण्याचं हे गणित समजलेल्या आणि अडीअडचणीतून, गरीबीतून मार्ग काढणार्या महिला सुरुवातीला कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने कार्यरत झाल्या असल्या तरी आता या गृहस्वामिनी खर्या अर्थाने उद्योग स्वामिनी झाल्या आहेत.
वांद्रा पश्चिमला म्हाडाच्या मैदानात महालक्ष्मी सरस- २०१२ चे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने फक्त मुंबईकरांनाच नाही तर विविध कारणांनी राज्याच्या इतर भागातून आणि राज्या बाहेरून मुंबईत येणार्या रसिकजनांसाठी एक आनंद सोहळाच साकार झाला आहे. प्रदर्शनात महाराष्ट्रासह २६ ते २७ राज्यांच्या बचतगटांचे ६०० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या भव्य प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर महिलांची प्रगती, त्यांचा उद्यमशील स्वभाव आणि आपण निर्माण केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न याकडे लक्ष वेधल्याशिवाय राहात नाहीत.
महिलांचे आत्मभान आणि आत्मसन्मान जागविणारे हे क्षण महिला सक्षमीकरणाचे एक महत्वाकांक्षी पाऊल आहे. जे केवळ कुटुंबाच्या विकासासाठीच नाही तर गाव, तालुका राज्य आणि देशाच्या विकासासाठी देखील समर्पित आहे.
बाजारपेठ म्हटली की स्पर्धा ही आलीच. आपली वस्तू, आपलं उत्पादन बाजारपेठेत टिकवून ठेवायचं असेल, त्याला व्यापक बाजारपेठ मिळवून द्यायची असेल तर त्याचा दर्जा उत्तम राखतांना त्यात नाविन्य राखलं पाहिजे, त्याचं चांगलं पॅकेजिंग आणि ब्रॉण्डिंग झाले पाहिजे, ती काळाची गरजही आहे हे ओळखून बचतगटांनी आपापले ब्रॅण्ड विकसित करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे फलित म्हणूनच की काय पुण्याचा सावित्री, वर्ध्याचा वर्धिनी, बीडचा तेजस, कोल्हापूरचा महालक्ष्मी, ठाण्याचा वज्रेश्वरी सारखे ब्रॅण्ड आपल्या वैशिष्टय़ांसह या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.
राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या बचतगटांनी आपल्या अनोख्या कला-कौशल्याने अनेक वस्तू तयार केल्या आहेत. त्याचं सुंदर रुप एकत्रित स्वरूपात पाहणं ही मनाला हरखून टाकणारी गोष्ट आहे.
महिलांसाठी तर हे प्रदर्शन म्हणजे एक प्रकारची पर्वणीच आहे.. मधुबनी- वारली पेटिंग्ज्, पेपर मेशी, ज्यूट आणि चामडय़ाच्या बॅगा, चंदेरी- पैठणी, पोचमपल्ली साडय़ा, राजस्थानी मोजडी, कोल्हापूरी चप्पल, काश्मिरी शाल, नाविन्यपूर्ण दागिने यासारख्या सुंदर सुंदर वस्तू आपल्याला मनाला मोहिनी घातल्याशिवाय राहात नाहीत.
गरिबीत राहणं कोणालाही आवडत नाही. पण म्हणून काहीच प्रयत्न न करता आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा ठेवणंही चुकीचचं आहे हे लक्षात घेऊन राज्यातीलच नव्हे तर देशभरातील महिला बचतगटांच्या मोठय़ा प्रमाणात माध्यमातून संघटित होत आहेत, एकत्र येऊन आपल्या कला-कर्तृत्वाला वाव देत आहेत. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर महिला व बालविकास, नाबार्ड, माविम, जलस्वराज्य प्रकल्प अशा विविध विभागांच्या माध्यमातून राज्यात सुमारे चार ते साडेचार लाख बचतगट स्थापन झाले आहेत. यामध्ये महिला बचतगटांची संख्या सर्वाधिक आहे.
बचतगट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर साधारणत: पापड, लोणची, मसाल्याचे पदार्थ आणि छोटय़ा छोटय़ा वस्तू बनविणार्या महिलांचे उद्योग असं चित्र डोळ्यासमोर येतं. पण अलिकडच्या काळात बचतगटांनी घेतलेली झेप पाहता हे चित्र आता तितकसं खरं राहिलेलं नाही हे प्रदर्शनाकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. उद्योगाच्या या पारंपरिक क्षेत्रापलिकडे जाऊन महिलांनी जेट्रोफा लागवड, गारमेंट उद्योग, समूह शेती सारख्या मोठय़ा उद्योगात आपलं पाऊलं खंबीरपणे रोवलं आहे. एवढच कशाला तर सहकारी साखर कारखाना ते एफ एम आकाशवाणी केंद्र सुरु करण्यापर्यंत या बचतगटांनी धाडस दाखवलं आहे, आपल्या उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देखील मिळवून दिली आहे.
स्त्री शक्तीच्या आविष्काराला सकारात्मक दिशा देणारे हे महिला बचतगट केवळ महिलांना आत्मनिर्भर करत नाहीत तर त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून सामाजिक कार्यात, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवित आहेत. त्यातून सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया वेग घेत आहे. त्यामुळेच काल जेव्हा महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या शुभारंभाप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणार्या बचतगटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने गौरविले गेले तेव्हा पुरस्कार प्राप्त बचतगटातील एका महिलेने दिलेली ‘मंजिले उन्हीको मिलती है, जिनके सपनोंमे जान होती है, यूंही पंख होने से कुछ भी नही होता, हौसलोंसे उडान होती है . . . ’ ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जात होती.
No comments:
Post a Comment