रत्नागिरी जिल्ह्यात भातगाव आणि जयगड खाडी परिसर निसर्ग पर्यटनासाठी योग्य ठिकाण आहे. सह्याद्रीच्या द-याखो-यातील दाट वनराईच्या सान्निध्यात वेड्यावाकड्या वळणावरून भटकंती करण्यात वेगळाच आनंद मिळतो. परिसरातील देवालयांना भेट देऊन धार्मिक पर्यटनाचे समाधानही मिळते. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या निवळीचा धबधबा पाहून या भटकंतीची सुरुवात करता येते.
महामार्गाच्या कडेला उभे राहूनच उंच डोंगरावरून खाली कोसळणारा धबधबा पाहता येतो. हिरव्यागार वनराईतून फेसाळणा-या पाण्याची शुभ्र धारा चटकन लक्ष आकर्षून घेते. थोडं पुढे गेल्यावर धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी पाय-यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पावसाळ्यात ही वाट निसरडी होत असल्याने जरा सांभाळूनच जावे लागते. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर उजवीकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने भातगाव किंवा गणपतीपुळेकडे जाता येते.
रस्त्याने पुढे गेल्यावर उजव्या बाजूस भातगावकडे जाणारा रस्ता आहे. दाट झाडीतून हा रस्ता पुढे जातो. पावसाळ्यात गेले तर दोन ठिकाणी डोंगरावरू कोसळणारे लहान धबधबे पाहता येतात. हिवाळ्यात खाडीत सकाळच्या वेळी दाट धुके असते. उंचावरून हे दृष्य अत्यंत सुंदर वाटते. खाडीतले सौंदर्य आणि त्यावरचा भव्य पूल कॅमे-यात कैद करण्यासारखा आहे. भातगावमार्गे पुढे हेदवी-वेळणेश्वरला जाण्यासाठी रस्ता आहे. केवळ १५ ते २० किलोमीटरच्या अंतरावर ही दोन्ही पर्यटनस्थळे आहेत.
भातगाव रस्त्याला न वळल्यास निवळी-जयगड रस्त्यावर गणपतीपुळेच्या वळणापासून पाच किलोमीटर अंतरावर कोळीसरे गावाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावर लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे. गर्द झाडीने वेढलेल्या मंदिराच्या बाजूस बारमाही वाहणारा झरा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचे क्षण घालविण्यासाठी हे स्थान अत्यंत योग्य आहे. मंदिरातील पाच फुट उंचीची श्रीलक्ष्मी केशवाची मुर्ती नेपाळमधील गंडकी नदीपात्रातील काळ्या तांबूस रंगाच्या शालीग्राम शिळेतून घडविलेली आहे. मंदिर परिसरात खाजगी भक्तनिवासाची सुविधा आहे. निवळीमार्गे जयगड रस्त्याला असणाऱ्या कोळीसरे फाट्याचे अंतर २७ किलोमीटर आहे.
याच मार्गाने पुढे जयगडला जाता येते. गावात शिरताच जेएसडब्ल्यु प्रकल्पाचा विस्तारलेला परिसर समोर दिसतो. खाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस वळण घेऊन जयगडच्या किल्ल्याकडे जाता येते. शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला हा किल्ला विजापूरकरांनी बांधला. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. १२ एकर परिसरात पसरलेला किल्ला अजूनही मजबूत अवस्थेत आहे. बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केली आहे. किल्ल्याच्या तीन बाजूने पाणी असून बालेकिल्ल्यास महाद्वार आहे. किल्ल्याला जांभा पाषाणापासून बनविलेली मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूला खंदक कोरलेले आहेत. किल्ल्याला एकूण २८ बुरूज असून या बुरूजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते. किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहचते. गणपतीपुळे- जयगड अंतर १० किलोमीटर आहे.
जयगड येथील जेएसडब्ल्यु प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याकडून पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर मंदिर आहे. वाहन थेट मंदिरापर्यंत जाते. समुद्र किना-यावरील एका मोठ्या खडकावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. समुद्राच्या बाजूचा उंच कडा पाहतांना थरारक अनुभव येतो. मंदिरात गोमुखातून अखंड वाहणारा झरा आहे. निवांतपणे उंचावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी या प्राचीन मंदिराला अवश्य भेट द्यावी. कऱ्हाटेश्वर मंदिरापासून परततांना उजवीकडे दीपस्तंभ दिसतो. शास्त्री नदीच्या मुखाशी असलेल्या या दीपस्तंभावरून समुद्र किना-याचा रम्य परिसर न्याहाळता येतो. दुपारी ३ ते ५.१५ या वेळेत तिकीट काढून उंचा मनो-यावर जाता येते. उंचीवरून समुद्र न्याहाळण्याचा रोमांचीत करणारा अनुभव येथे पर्यटकांना मिळतो.
जयगडची भटकंती झाल्यावर गणपतीपुळे किंवा हेदवीकडे जाण्यासाठी मार्ग आहे. हेदवीकडे जाताना फेरीबोटीतून वाहनासह प्रवास करण्याचा अनुभव घेता येतो. खाडीच्या पलिकडील तवसाळ गावापासून हेदवी ११ किलोमीटर अंतरावर आहे. या मार्गावरील रोहिल्याच्या खाडी परिसरातील निसर्ग पाहिल्यावर खाडीवरील पुलावर क्षणभर थांबण्याचा मोह आवरला जात नाही. एकूणच रत्नागिरी जिल्ह्यातील कुठल्याही भागात गेलात तरी परतीचा प्रवास समाधानाचा, तृप्ततेचा आणि हूरहूर लावणारा असेल हे नक्की!
No comments:
Post a Comment