मराठी भाषेला १९६४ मध्ये राजभाषा म्हणून मान्यता मिळाली. साहजिकच महाराष्ट्रातील शालेय तसेच विद्यापीठातील शिक्षणाचे माध्यम मराठी असावे व राज्यकारभाराची भाषा मराठी असावी हे सर्वमान्य झाले. या भाषेच्या सक्षमीकरणासाठी आपण हे करू शकतो.
१. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज किमान १० तरी फोन कॉल हाताळतोच. दहाही वेळा आपण संभाषणाची सुरुवात हॅलो...! अशी करतो. आपण आपल्या मातृभाषेतून ही सुरूवात केली तर ? म्हणजेच नमस्कार ! या शब्दाने आपण संवादास सुरुवात केली तर ? त्यामुळे आपल्या भाषेबद्दलचे प्रेमही व्यक्त होईल शिवाय एखादी अनोळखी व्यक्ती, जी आपल्याशी थेट हिंदी अथवा इंग्रजीतून संवाद साधण्यास सुरुवात करते मात्र तिचीही मातृभाषा मराठीच असते अशी अधिक जवळकीने-मोकळेपणाने आणि मुख्य म्हणजे नेमक्या अभिव्यक्तिद्वारे आपल्याशी संवाद साधू शकेल.
२. आपण आपल्या मोबाईलवरून किमान १०-१५ तरी लघुसंदेश [SMS] दररोज पाठवतो. ते सगळेच अर्थातच इंग्रजीतून असतात. किंवा इंग्रजी लिपी आणि मराठी शब्द अशा पद्धतीने असतात. आपण दिवसभरात किमान दोन लघुसंदेश मराठीतून पाठवले तर ? पुन्हा एकदा भाषेवरील प्रेमाबरोबरच माहिती तंत्रज्ञानात मातृभाषेचा केला जाणारा वापर आपल्याबरोबरच समोरच्यालाही समाधान देवू शकेल. शिवाय आज कित्येकदा घरकाम करणाऱ्या व्यक्ती इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे मोबाईलचा परिपूर्ण वापर करीत नाहीत. अशांना मराठीतील लघुसंदेश पाठविले गेल्यास त्यांना आपण मूळ प्रवाहात आल्यासारखे वाटेल.
३. जी बाब SMS ची तीच ईमेल्ची सुद्धा ! आपल्याला सध्या सर्वच संकेतस्थळांद्वारे फोनेटिक [ उच्चारावरून शब्द ] पद्धतीने अनेक भाषांत ईमेल पाठविण्याची सुविधा आहे. ठरवून आपण दिवसभरात किमान एक ईमेल मराठीतून नक्कीच करू शकतो.
४. आज आपल्याला सणांच्या सुट्ट्या हव्याहव्याशा वाटतात. पण भारतीय महिने आणि दिनदर्शिका आपण विसरतो. इतकी की कित्येकदा गुरू पौर्णिमेच्या तिथी ऐवजी आपल्याला वट पौर्णिमेची तिथी आठवते. पण चैत्र, वैषाख, ज्येष्ठ.. असे महिने आणि त्या-त्या महिन्यांत येणारे सण आपल्याला सांगता येतील का ? नवरात्र म्हणजे आश्विन महिना हे किती जणांना माहिती असते ? तेव्हा किमान ज्या सणांच्या आपल्याला राष्ट्रीय सुट्ट्या असतात अशा सणांच्या तरी भारतीय दिनदर्शिकेची आपल्याला माहिती हवी. आणि ते त्याच तिथीनुसार बोलता यायला हवेत.
५. आपण हल्ली सामान्यपणे महिन्याला किमान एक तरी चित्रपट पाहतोच.. मग तो कित्तीही टुक्कार का असेना ! अशावेळी आपण आपल्या भाषेसाठी सुद्धा चित्रपट प्रेमातून काही करू शकत असू तर ? वर्षातून किमान दोन मराठी चित्रपट आणि दोन मराठी नाटके आपण नाही का पाहू शकणार ? किंवा अगदी मित्र-मैत्रीणींच्या सह जाऊन आपण नाही का मातृभाषेतील कलाकृतींचा आस्वाद घेवू शकणार ?
६. आपण हल्ली सर्रास पुस्तके वाचतो. अशावेळी ठरवून वर्षाकाठी किमान दोन मराठी पुस्तके विकत घेऊन वाचणे ही कृती सुद्धा अशीच सहज जमणारी आणि भाषेसाठी काही केल्याचा आनंद देणारी ठरू शकेल. त्यापुढे जाऊन वाचकांचा एखादा गट तयार केल्यास मराठी पुस्तक खरेदीवर काही विशेष सवलत मिळू शकेल का ते पाहता येऊ शकेल.
७. वाढदिवसाला, शुभकार्याला, अभिनंदन करताना भेटवस्तू देण्याची प्रथा आता चांगलीच रूजली आहे. अशावेळी ही भेटवस्तू म्हणून सर्वोत्तम मराठी पुस्तके/काव्यसंग्रह/नाट्यकृती यांचा आपण विचार करायला हवा. एक म्हणजे त्यासाठी आपण स्वतः ती कलाकृती वाचलेली असेल म्हणजे आपोआप वाचक म्हणून आपले भाषेसाठी योगदान होईल. आणि शिवाय इतरांना ती वाचायला दिल्याने भाषाप्रसारास-भाषेतील पुस्तक विक्रीस चालना देता येइल.
८. आता मात्र थोडी क्लिष्ट कृती सुचवितो आहे. आपण राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये हे पाहिले असेल की तिथे दररोज एक नवीन हिंदी शब्द लिहिलेला असतो. अपेक्षा ही असते की त्यातून प्रादेशिक शब्दांच्या वापरास चालना मिळावी. तद्वतच आपणही मराठीतील दररोज किमान एक तरी नवीन शब्द त्याच्या सर्व छ्टांसहित नव्याने समजून घेतला पाहिजे. यामुळे कालबाह्य होणाऱ्या कित्येक शब्दांना [ म्हणजे प्रत्येकी किमान ३६५ प्रति वर्षी ] प्रवाहात आणता येइल.
९. आणि आता शेवटचे तीन :
बॅंका, विमा कंपन्या, चल ध्वनी कंपन्या यांच्याकडे मराठीतून माहिती - सूचना पुस्तिका - प्रपत्रे [ फॉर्म्स ] इत्यादी देण्याचा आग्रह करणे.
१०. आपली स्वाक्षरी शक्य असल्यास मराठीतून करणे
११. आणि हा भाषा प्रसार कार्यक्रम प्रति महिना किमान ५ जणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे
आजची तरूण पिढी, त्यांची सेलिब्रेट करण्याची वृत्ती, त्यांचे माहिती-तंत्रज्ञानावरील प्रेम, करमणूकप्रधान समाजरचना, दिन-विशेष असे बिंदू लक्षात घेवून हा कार्यक्रम मी तयार केला आहे. त्यात जेव्हढी भर घालता येइल अर्थात जेव्हढी कृतीशील भर घालता येइल तेव्हढे उत्तमच!
No comments:
Post a Comment