Sunday, April 1, 2012

बचतगटाच्या माध्यमातून पारंपरिक मासेमारीला आली भरभराट

परभणी-ताडकळस रस्‍त्‍यावर लिमला गावापासून 5 किलोमीटर आत वसलेलं वझूर गाव. गावातील महिलांचं विश्‍व म्‍हणजे चूल आणि मूल. महिलांमध्‍ये आत्‍मशक्‍ती वाढविण्‍यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या वतीनं (माविम) प्रयत्‍न सुरु झाले. या प्रयत्‍नांना यश आलं. या गावातील महिलांनी आपला मासेमारीचा पारंपरिक व्‍यवसाय भरभराटीस आणला. आर्थिक उन्‍नतीबरोबरच सामाजिक उपक्रमातही इथल्‍या महिला अग्रेसर आहेत.

माविमच्‍या या प्रयत्‍नांविषयी ताडकळस इथल्‍या सहयोगिनी कविता काळे यांनी बचतगटांविषयी माहिती दिली. गावामध्‍ये महिला बचतगट स्‍थापन्याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. बचतगटाची चळवळ, तिची गरज, फायदा पटवून देण्‍यात आला. पण त्‍यात फारसं यश आलं नाही. पहिला बचतगट बराच उशिरा म्हणजे सन 2007 मध्‍ये स्‍थापन झाला. त्यानंतर महिलांमध्‍ये हळूहळू परिवर्तन होऊ लागलं. आज गावात 19 महिला बचतगट आहेत. यापैकी जगदंबा व मुंबादेवी या बचतगटातील महिलांचा पारंपरिक व्‍यवसाय होता मासेमारीचा. बचतगटाच्‍या माध्‍यमातून हा व्‍यवसाय वाढविण्‍याचा निर्णय महिलांनी घेतला.

बचतगटातून अंतर्गत कर्ज घेऊन या गटातील महिलांनी मासे पकडण्‍याचं मोठं जाळं घेतलं. त्‍यातून मासे पकडून त्‍या त्यांची विक्री करु लागल्‍या. त्‍यामध्‍ये त्‍यांना भरपूर नफा मिळू लागल्‍या. त्‍यानंतर त्‍यांनी गावाजवळील टरबूजवाडी इथं तलाव भाड्यानं घेतला आणि त्‍यामध्‍ये मासेमारी करु लागल्‍या. पण निसर्गाची साथ न मिळाल्‍यानं तिथं त्‍यांचं नुकसान झालं. तरी त्‍या डगमगल्‍या नाहीत. त्‍यांनी गावातील मासेमारीचा व्‍यवसाय सुरु ठेवला.

गावातील तलाव भाडेतत्‍वावर घेऊन त्यामध्ये त्या पावसाळ्यात मत्‍स्यबीज सोडतात. आवश्‍यक ती काळजी घेतल्‍यानंतर दोन महिन्‍यात मासे विक्रीसाठी तयार होतात. महिला बचतगटाच्‍या नियमित व्‍यवहारामुळं बँकेनं जगदंबा बचतगटास 1 लक्ष 20 हजार रुपये व मुंबादेवी बचतगटास 1 लक्ष 10 हजार रुपये कर्ज मंजूर केलं. त्‍यातून त्‍यांनी प्रति महिला 10 हजार रुपये या प्रमाणं 2 बचतगटांच्‍या 20 महिलांनी मासे पकडण्‍याचं मोठ जाळं विकत घेतलं. सहा महिने गावात व उन्‍हाळ्यात गावातील तळ्यात पाणी राहत नसल्‍यानं त्या बाहेरगावी जाऊन मासेमारी करू लागल्या आहेत. या मासेमारीतून मिळालेल्‍या नफ्यातून त्‍यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटला. आपल्‍या मुला-मुलींच्‍या शिक्षणावर त्‍यांनी लक्ष केंद्रीत केलंय. या महिलांनी शेतीसुद्धा विकत घेतली आहे. मासेमारी आणि शेती व्‍यवसायातून त्‍या आर्थिक समृद्धीच्‍या दिशेनं वाटचाल करीत आहेत.

महिला बचतगटाच्‍या आर्थिक विकासाविषयी सांगत असतानाच माविमचे जिल्‍हा समन्‍वय अधिकारी संजय गायकवाड यांनी या महिलांच्‍या सामाजिक जाणीवेविषयीही अभिमानानं सांगितलं. ते म्‍हणाले, या महिलांनी आर्थिक समृद्धी साधत असताना सामाजिक भानही जागं ठेवलं आहे. या महिलांनी एका अनाथ मुलीचं लग्‍न लावून दिलं. तिला आवश्‍यक ते सर्व साहित्‍य घेऊन दिलं. बचतगटाच्या महिलाच तिच्‍या नातेवाईक झाल्‍या आहेत. हे सर्व बचतगटामुळंच शक्‍य होऊ शकलं, एवढं मात्र निश्‍चित.


  • राजेंद्र सरग

  • No comments:

    Post a Comment