Saturday, April 14, 2012

समूह उद्योगातून समृद्धीकडे

आपल्या पारंपरिक व्यवसायातूनही आपण आर्थिक समृद्धीकडे जाऊ शकतो, हे शिरपूर तालुक्याच्या गिधाडे गावातील संत रोहिदास महिला बचतगटातील सदस्यांनी दाखवून दिले आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात तापी नदीच्या काठावर वसलेले गिधाडे हे छोटेसे गाव. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ग्रामीण पतपुरवठा कार्यक्रमाअंतर्गत संत रोहिदास महिला बचतगटाने बैलांना लागणाऱ्या नाथणी बनविण्याचा उद्योग सुरु केला आहे. शेतमजुरी करणाऱ्या महिला बैलांना लागणाऱ्या नाथणी तयार करू लागल्यामुळे बचतगटातील महिलांना हुरूप आला आणि हा आपला पारंपरिक व्यवसाय असल्याचीही त्यांना जाणीव झाली. भांडवलाअभावी उद्योग न करता शेतमजुरी करण्याची वेळ गावातील महिलांवर आली होती. आता बचतगटाच्या माध्यमातून भांडवलही उपलब्ध होणे शक्य झाल्याने पुन्हा एकदा महिला या उद्योगाकडे वळल्या आहेत. शेतमजुरी करून फावल्या वेळात हा उद्योग सुरु केल्यामुळे त्यांना दोन पैसे जादा मिळू लागले आहेत. यातून आपल्या गरजा भागविणे त्यांना सोयीचे होऊ लागले आहे.

संत रोहिदास बचतगटात सर्व महिला दारिद्र्य रेषेखालील असल्यामुळे बचतगटाला स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचा लाभ मिळाला. प्रथम कर्जासाठी बचतगटाने बँकेकडे प्रस्ताव सादर केला. बचतगटाचा आर्थिक व्यवहार नियमित व पारदर्शी असल्यामुळे बँकेने २५ हजार रुपये कर्ज मंजूर केले. कर्जातून महिलांनी मिळून बैलांची नाथणी बनविण्याच्या व्यवसायास चालना दिली.

गावात शेतकरी वर्ग मोठा असल्यामुळे प्रत्येकाकडे बैलजोडी आहे. त्यामुळे व्यवसायाला चांगली संधी होती. व्यवसायाला लागणारे चामडी पट्टे महिलांनी खरेदी केले व गटातील सर्व महिला मिळून हा व्यवसाय करु लागल्या. तयार झालेला माल गटातीलच महिला शिरपूर व शिंदखेडा बाजारात जाऊन विकू लागल्या. स्वत:च मालाची विक्री करु लागल्यामुळे महिलांना नाथणीच्या एक जोडी मागे जास्त फायदा मिळू लागला. उद्योगामुळे महिलांनी बँकेच्या प्रथम कर्जाची लवकर परतफेड केल्यामुळे दुसऱ्या कर्जाची मागणी केली. महिलांचा व्यवसाय पाहून बँकेने दुसरे कर्ज म्हणून दोन लाख रुपये मंजूर केले. या कर्जाचा वापरही महिलांनी व्यवसाय वाढविण्यासाठी केला.

संत रोहिदास बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या नाथणी चांगल्या व मजबूत असल्यामुळे शेजारील गावातील शेतकरीही या बचतगटाकडे येऊन खरेदी करू लागले आहेत. बराचसा माल घरीच विक्री होतो. व्यवसायामुळे बचतगटातील महिलांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व सभासदांनी बचतीत वाढ करण्याचा निर्णय घेऊन ती २५ वरुन ५० रुपये केली आहे. विशेष म्हणजे बचतगटातील सभासदांनी व्यवसायात वाढ केल्यामुळे घरातील पुरूष मंडळीही महिलांना कामात मदत करू लागले आहेत.

स्वयंसहाय्यता बचतगटामुळेच आम्ही सामूहिक उद्योग करु शकलो आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमतेकडे आमची वाटचाल सुरु झाली, असे संत रोहिदास महिला बचतगटाच्या सदस्या अभिमानाने सांगतात.


  • जगन्नाथ पाटील

  • No comments:

    Post a Comment