जेवढं गाव लहान तेवढेच तंट्याच प्रमाणही कमीच असतं. पण जेवढं गाव मोठं तेवढं तंट्याचं प्रमाण अधिकच राहतं व तंटा सोडवणे म्हणजे तंटामुक्ती समितीला एक प्रकारची तारेवरची कसरत करावी लागते. अशीच कसरत अमरावती जिल्हयातील वरुड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जरुड तंटामुक्तगाव समितीने गावात शांतात निर्माण करण्यासाठी केली. वीस हजार लोकसंख्येच्या या गावाला आज येथील तंटामुक्त गाव समितीने तंटामुक्त करुन दाखविले आहे.
गावात निर्माण झालेले तंटे सभेमध्ये ठेवून त्यावर वेळोवेळी चर्चा केली. गावात सर्वाधिक तंटे हे अवैध धंद्यातून निर्माण होतात. त्याला आळा बसावा, यासाठी तेथील पोलिसांचेही तंटामुक्तीसाठी चांगल्या प्रमाणात सहकार्य मिळाले. यासाठी व्यसनमुक्तीसाठी गावात प्रबोधनात्मक कार्यक्रम, जनजागृती रॅली काढण्यात आली. तंट्यातील अर्जदार-गैरअर्जदार यांना सभेमध्ये बोलावून त्यांना निर्माण झालेल्या तंट्यामुळे दोन्ही परिवारांना नुकसानीची बाब पटवून सांगितली. व नंतर यावर उपाययोजना करीत दोघांमध्येही प्रेम व आपुलकीची भावना एकमेकांप्रती निर्माण करुन त्यांचे तंटे सामंजस्याने सोडविले.
वरुड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जरुड या गावात सन २०१०-११ मध्ये येथील तंटामुक्त समितीला फौजदारी स्वरुपाचे ११२ तंटे, दिवाणी स्वरुपाचे १५ व महसुलीचे ८ असे एकूण १३५ तंटे प्राप्त झाले होते. या सर्व तंट्यांचा एकत्रित आकडा पाहून प्रथम समितीला ही बाब अशक्य वाटली. मात्र यातून यश जर गाठायचे असेल, तर समितीच्या सर्व सदस्यांनी हातात हात घेऊन अगदी जिव्हाळ्याने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन समिती सदस्याने निर्धारपूर्वक पाऊले उचलली.
गावात एकमेकांप्रती प्रेम व एकोप्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी गावात जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक प्रबोधनात्मक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच शासनाच्या ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये लोकसहभाग यावर प्रामुख्याने भर दिला. ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम, ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारी मुक्तीसाठी प्रोत्साहित करणे, तसेच गावात साजरे होणारे उत्सव एकत्रितरित्या साजरे करण्यासाठी तशी भावना निर्माण करणे, त्यासाठी त्यांना प्रवृत्त करुन त्यांचा सहभाग वाढविणे यासाठी विविध यशस्वी प्रयोग जरुड या सर्वाधिक लोकसंख्येच्या गावात तंटामुक्त समितीने केले. अन् गाव तंटामुक्त झाला.
No comments:
Post a Comment