Wednesday, April 11, 2012

स्‍वाभिमान योजनेमुळे मिळाला आत्‍मविश्‍वास

भारताने गुलामगिरीच्‍या शृंखला तोडल्‍या परंतु माणसाला माणूसपणा मिळण्‍यासाठी प्रदीर्घ काळ लागला. गरीब व दारिद्र्याने पिंजलेला मागासवर्गीय समाज प्रगतीच्‍या दिशेसाठी आस लावून होता. मागासवर्गीय समाजाच्‍या प्रगतीसाठी शासनाने अनेक पैलूंवर अभ्‍यास केल्‍यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्‍वाभिमान योजना ग्रामीण क्षेत्रात कार्यान्‍वित करण्‍यात आली. या योजनेचा लाभ वर्धा जिल्ह्यातील मदनीच्या सीताबाई हरिभाऊ भगत यांना मिळाला आणि अर्थप्राप्‍ती होऊ लागल्याने त्‍यांच्यात आत्‍मविश्‍वास जागृत झाला.

वर्धेपासून मदनी हे गांव २० किलोमीटर अंतरावर आहे. वर्धा नदीच्‍या प्रवाहाने पावसाळ्यात मात्र या गावाला पुराचा धोका संभवत असतो. याच गावामध्‍ये सीताबाई ह्या आपल्‍या कुटुंबासह राहतात. मुले लहान असतानाच हरिभाऊ भगत यांचे देहावसान झाले. त्‍यांच्‍या पश्‍चात गेल्‍या २५ वर्षांपासून सीताबाई आपल्‍या कुटुंबाचा सांभाळ मोठ्या कष्टाने करीत आहेत. द्रारिद्र्य व गरिबी यामुळे त्‍यांची आर्थिक परिस्थिती अत्‍यंत वाईट होती. मोलमजूरी करून कसेबसे संसाराचा गाडा त्या रेटत होत्या. गरिबीमुळे प्रगतीचे दार कधीच उघडणार नाही, असे त्‍यांना सतत वाटत होते.

यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेल्या बदलाबाबत माहिती देताना सीताबाई म्‍हणाल्‍या, मी मोलमजूरी करून इतरांच्‍या शेतावर काम करायला जात होते. एक दिवस कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्‍वाभिमान योजनेबाबत तलाठ्याने माहिती दिली. त्‍याबाबत समाज कल्‍याण अधिकाऱ्याकडून योजनेची अधिक सविस्तर माहिती मिळाली. माझ्या कुटुंबात मुलगा व मुलगी आहे. मुलीचे लग्‍न झाल्‍यानंतर मी मुलाच्‍या आसऱ्याने जीवन व्‍यतीत करायची. मुलगा सज्ञान होता. त्‍याच्‍या मदतीने मी जिल्‍हा विशेष समाज कल्‍याण अधिकारी यांच्‍याकडे मार्च २००६ मध्‍ये अर्ज सादर केला. त्यानुसार मला साडेतीन एकर जमीन मिळाली.

वर्धा नदीच्‍या काठावर असलेली जमीन सिंचनाअभावी पडिक होती. शासनाकडून या जमिनीचा सातबारा मिळाला आणि आम्हाला अत्‍यानंद झाला. थोडी मेहनत करुन जमिनीला उपजाऊपणा आणला. याच जमिनीच्या माध्यमातून गेल्‍या चार वर्षात जमिनीतून कापूस, तूर व सोयाबिनच्‍या उत्‍पादनामुळे आमचे जीवनमानच बदलून गेले. शासनाकडून अनुदानावर बंडी व बैल मिळाले. शेतीला लागणारे इतर साहित्‍यही मिळाले. हे सर्व साहित्‍य क्रमाक्रमाने मिळत गेल्‍यामुळे दरवर्षी खर्चाचा डोलारा कमी होऊन उत्‍पन्नात भर पडत गेली. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे एक वर्षापूर्वी घराचे बांधकाम देखील केले. घरावर छत मिळाल्याने मग मुलाचे लग्‍न केले. हे सर्व साध्य झाले केवळ शेतीमधून मिळालेल्‍या उत्‍पन्‍नातूनच. सर्व स्वप्नासारखे वाटावे असेच आहे पण आता आमचा संसाराचा गाडा आनंदाने सुरू असल्‍याचे सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळत होते.

सीताबाईंच्या कुटुंबात हे सर्व परिवर्तन कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्‍वाभिमान योजनेमुळे घडले आहे. सोसायटी व बँकेतून काढलेले कर्ज हप्‍त्‍या-हप्त्याने फेडणे सुरू आहे. ज्या बँकेकडून पूर्वी कर्ज मिळण्याची अजिबात आशा नव्हती त्या बँकेचे अधिकारी आता कर्ज देण्‍यासाठी तयार असतात. दारिद्र्य व गरिबीचे दिवस केवळ या योजनेमुळे बदललेले पहायला मिळाले. यामुळेच आमच्या कुटुंबात आत्मविश्वास जागृत झाला आहे. परिवर्तनाच्‍या दिशेने निघालेल्‍या दिंडीत आम्‍ही पाईक होऊन वाटचाल करीत आहोत, असेही त्यांनी भरल्या डोळ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment