बचतगटांच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये राज्यात प्रचंड क्रांती घडून आली आहे. नव्हत्याचे होते करणाऱ्या या उपक्रमामुळे वाशिम जिल्ह्यातील सावळीच्या सावित्रीबाई फुले बचतगटाच्या महिलांनी बकरी पालनाच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे.
सावळी हे वाशिम पासून सुमारे ३० कि.मी. अंतरावरचं गाव. एकूण ८ बचतगट असलेल्या या गावातील महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचतगटाची स्थापना सुमारे सहा वर्षांपूर्वी झाली. सुरुवातीला या महिलांना बचतीचे महत्व पटवून दिल्यानंतर ११ महिलांनी एकत्र येऊन प्रति महिना ५० रुपये प्रमाणे बचत करण्यास सुरूवात केली आणि बघता बघता त्यांनी एकत्र कधीच न पाहिलेली रक्कम गटाकडे जमा व्हायला सुरूवात झाली.
काही महिन्यांनंतर या महिलांनी अंतर्गत व्यवहार करुन आपल्या छोट्या छोट्या अडीअडचणी दूर करण्यास सुरूवात केली. त्यांनी बचतीमध्ये मात्र खंड पडू दिला नाही. सुरळीत बचत आणि अंतर्गत व्यवहाराची व्याजासह परतफेड पाहून लवकरच त्यांच्या गटाचे पंचायत समितीद्वारे प्रथम ग्रेडेशन करण्यात आले व त्यांना २५ हजार रुपयांचा फिरता निधी मंजूर झाला. आयुष्यात आपण कधी व्यवसाय करू शकू असे स्वप्नातही न पाहिलेल्या महिलांसाठी ही आर्थिक मदत म्हणजे एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधीच होती. या कर्जाची त्यांनी अल्पावधीतच परतफेड केली आणि बँकेचा विश्वास संपादन केला.
फेब्रुवारी २००८ मध्ये सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचतगटाचा कर्जासाठीचा दुसरा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यांनी बकरी पालनाचा व्यवसाय निवडला. त्यांना ४० बकऱ्या मिळाल्या. यामधून या गटातील महिला जोड व्यवसाय करु लागल्या. बकऱ्यांपासून पिल्ले तयार झाली आणि पाहता पाहता सावित्रीबाई बचतगटाची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यातूनच बँकेच्या कर्जाची परतफेड व्याजासह होऊ लागली. या परिस्थितीतही नियमित बचत सुरूच ठेवल्याने आज त्यांची बचत २५ हजार रुपये झाली आहे.
ज्या महिला मजुरी करुन पोट भरत होत्या त्या आज बँक बॅलन्स ठेवायला लागल्या ही या गटाची जमेची बाजू आहे. आर्थिक परिस्थिती सुधारली यामुळे साहजिकच त्यांच्या राहणीमानात बदल झाला. वैचारिक पातळीही सकारात्मक झाली. अनसिंग लोकसंचालित साधन केंद्राद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणातून व बँक व्यवहारातून बौद्धिक वाढ झाली. त्यांच्यात सक्षमीकरणाची, बळकटीकरणाची ताकद आली त्यामुळे आज गटातील प्रत्येक महिलेला बँक व्यवहार व व्यवसाय म्हणजे काय ते कळते. आज महिला अबला नसून सबला झाली आहे. लहान मुलांसाठी बकरीचे दूध उपयुक्त ठरल्याने लहान मुलांचे स्वास्थ सुद्धा चांगले राहत आहे हा यातील आणखी एक फायदाच म्हणता येईल.
सर्वच बाजूंनी विचार करता सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचतगटाच्या महिलांना खऱ्या अर्थाने बचतगटाचा अर्थ समजला आणि त्या यशस्वी ठरल्या असे म्हणता येईल.
No comments:
Post a Comment