पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना
पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया असून या योजनेतून पर्यावरण संवर्धन, जतन व संरक्षण करुनच समृध्द व संपन्न गावाची निर्मिती करणे, गावांमध्ये उच्च प्रतीच्या भौतिक व मुलभूत सुविधांची निर्मिती करणे, दर्जेदार सामाजिक मुलभूत सुविधा करणे, मुल्यवर्धित स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करणे, जल, जमीन, जंगल, हवा, वनस्पती यांचे योग्य व्यवस्थापन करुन भौतिक सोयी सुविधांची निर्मिती पर्यावरण संतुलन राखून करणे व त्याव्दारे ग्रामस्थांचा जीवनमान दर्जा सुधारणे, मोठया ग्रामपंचायतीचा पर्यांवरण विकास आराखडा व ग्रामविकास आराखडा तयार करुन शहरी तोडीच्या सुविधा निर्माण करुन त्यांना विकास केंद्र बनविणे.
वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, जल व्यवस्थापन व जलस्त्रोत रक्षण, जमीन व्यवस्थापन, वन व्यवस्थापन, जैव विविधता संवर्धन, जल प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीने अनुषंगिक बाबी व सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, अपारंपारिक ऊर्जा विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
धुळे जिल्हयात पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे.
भविष्यात या योजनेस मोठया प्रमाणात यश येणार असून जिल्हयातील या योजनेबाबत झालेल्या अंमलबजावणी विषयक थोडक्यात माहिती
जिल्हयात ५५१ ग्राम पंचायती असून पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर ८७ ग्रामपंचायतीने प्रस्ताव प्राप्त झालेले होते त्यात ७९ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव पात्र ठरविण्यात आले होते.
त्यापैकी अंतिम तपासणीत ४४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या असून यासाठी १ कोटी ४५ लाख निधी खर्च होणार आहे.
त्यात धुळे तालुक्यांच्या २०, साक्री ०५, शिंदखेडा १० तर शिरपूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
जिल्हयातील ५५१ ग्रामपंचायतींना २५ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे देण्यात आले असून वृक्ष लागवडीचे उद्दिष्टये पूर्ण करण्यासाठी ३३९ रोपवाटिका सुरु असून त्यांच्या माध्यमातून २१ लाख ८८ हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.
पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनांचा पाया मजबूत व्हावा यासाठी २०११ अखेर घरपट्टीच्या स्वरुपात कर वसुलीतून जिल्हयात जानेवारी २०१२ अखेर ५ कोटी ३१ लाख १७ हजार ०७ रुपयांची वसुली झालेली असून पाणीपट्टीच्या स्वरुपात जिल्हयात ३ कोटी ४९ लक्ष २ हजार रुपयांची भरभक्कम वसुली झालेली आहे.
जिल्हयातील ५ ते १७ हजार लोकसंख्येच्या ९ ग्राम पंचायती तर १० हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ४ अशा १३ पात्र ग्रामपंचायतीचा पर्यावरण विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेतील अटींची पात्रता पूर्ण करुन पात्र ठरण्यासाठी प्रयत्न आहे.
आजपर्यंत जिल्हयातील ५५१ ग्रामपंचायती पैकी १९९ ग्रामपंचायतींना ५ कोटी १४ लाख ९० हजार रुपयांचे वितरण करण्यात आले असून या अनुदानातून ग्रामपंचायती आपला विकास साध्य करीत आहे.
जगन्नाथ पाटील
No comments:
Post a Comment