Thursday, April 5, 2012

विकास भरारी

कृषी, पर्यटन, औद्योगिक, हॉटेल सर्व्हिसेस आदीबरोबरच प्रवासी वाहतुकही सुलभ व जलद गतीने झाल्यास जळगाव शहराचा व जिल्हयाचा सर्वागीण विकास होणार आहे व हेच सर्वागीण विकासाचं स्वप्न सर्वसामान्य जळगावकर नागरिकांनी पाहिले होते. व त्याकरिताच त्यांना जळगाव मध्ये विमानतळ हवे होते व त्यांच्या या स्वप्नाला एअर अथॅरिटी ऑफ इंडियाने जळगाव विमानतळाचं काम पूर्ण करुन बळकटी दिली आहे.

जळगाव मध्ये विमानतळ या स्वप्नाची पूर्तता मराठी नववर्षाच्या प्रारंभी जळगाव कन्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली अन जळगावकरांना विकासाची भरारी घेण्यासाठी ख-या अर्थाने आकाश खुले झाले.

विमानतळाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या उदघाटनाच्या कार्यक्रमास जिल्हयातील हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी विमानतळाचं उदघाटन करुन ते राष्ट्राला समर्पित केल्याचं जाहिर करताच सभा मंडपात उपस्थित नागरिकांनी प्रचंड टाळयांचा कडकडाट केला. त्यांनी एकमेकास मिठाई देऊन आपल्या स्वप्नपूर्तीचा आनंद साजरा केला.

नागरिकांचा हा आनंद म्हणजे त्यांच्या परिसराच्या विकासाकरिता विमानसेवेमुळे नवीन दारे उघडली जाऊन त्यांच्या आशा - आकांक्षाच्या पंखाना नवीन बळ मिळाले आहे. विमानसेवेमुळे येथील औद्योगिक,कृषी, पर्यटन विकासाला चालना मिळून या परिसरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. म्हणजेच वर्षानुवर्षे रोजगारासाठी पुणे, मुंबईकडे स्थलांतरित होणारा तरुण वर्गाला येथेच रोजगार मिळाल्यास त्यांचे स्थलांतर थांबून त्यांच्या जीवनाला एक प्रकारचं आर्थिक स्थैर्य निर्माण झाल्याने सामाजिक विकासाला ही चालना मिळणार आहे.

जळगाव हा कृषि प्रधान भाग असून उत्तर महाराष्ट्रातील एक महत्वाचे केंद्र आहे. ते वेगाने प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचं महामहिम राष्ट्रपती यांनी सांगितले. म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे शहर विमानसेवेमुळे देशाच्या सर्व भागाला जोडले गेल्यामुळे त्याच्या बाहूत अधिक बळ येऊन ते शहर सर्वागीण विकासाकडे जलद गतीने जाईल, याबद्दल मला खात्री वाटत आहे असे ही त्या म्हणाल्या.

जळगाव हे देशभरात केळी व कापूस पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. येथील केळी देश-विदेशात निर्यात केली जाते. परंतु त्याकरिता शेतक-यांना केळी मुंबई, औरंगाबादकडे पाठवावी लागत असे परंतु आता जळगाव विमानतळावरुन केळी निर्यातीची सेवा उपलबध होऊन वाहतुकीच्या खर्चात बचत झाल्यास शेतक-यांच्या उत्पन्नात ही मोठी वाढ होईल. त्यामुळे शेतकरी वर्ग विमानतळाच्या निर्मितीमुळे सुखावला आहे.

जळगाव मध्ये जैन इरिगेशन, रेमंड, सुप्रीम आदी जागतिक स्तरावर आपलं उत्पादन निर्यात करण्या-या कंपन्यांच्या विस्तारीकरणाला यानिमित्ताने चालना मिळेल. यामुळे जळगावचा औद्योगिक कायापालट होईल यात शंका नाही. तसेच येथील पायाभूत सुविधाच्या जोडीला विमानसेवेचे पंख मिळाल्यामुळे देशातील इतर नामांकित उदयोग ही जळगावकडे आकर्षित होतील. यामुळे पुढील काळात येथे मोठी रोजगार निर्मिती होऊन जळगाव रोजगार निर्मितीचं एक प्रमुख केंद्र बनेल.

राज्य शासन व केंद्रीय हवाई वाहतूक यंत्रणा यांच्यातील योग्य समन्वयातून जळगावकरांचे आकाशात झेपावण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं असून ते आजपासून विकासाची विमान भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.


  • सुनिल सोनटक्के

  • No comments:

    Post a Comment