Thursday, April 5, 2012

सामुहिकपणे फुलवली शेती

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यापासून जवळच असलेले मौ.राजमोही हे गाव. या गावात असलेल्या माविमच्या एकूण ६ बचतगटांपैकी स्वयंसिद्धा योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या प्रगती बचत गटाने सामूहिक शेती तयार करुन उत्पन्नाचा चांगला मार्ग शोधला आहे.

राजमोही हे गाव तसे छोटेसे गाव. येथे पारंपरिक पद्धतीने पावसावर आधारित शेती होते. त्यात कापूस, सोयाबीन, तुरदाळ, मळ व मक्का ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. अन्य बचत गटांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा विचार प्रगती बचत गटातील महिलांनी केला. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली आणि शेवटी करार पद्धतीने सामूहिक शेती करण्याचे ठरविले.

बचत गटातील महिलांनी लोक संचलित साधन केंद्र कार्यालयाच्या संपर्कात राहून शेती विषयक मार्गदर्शन घेतले. त्यानंतर कोणते पीक घ्यावे याचा अभ्यास करण्यात आला. गावातील वरिष्ठ लोकांशी याबाबत चर्चा करून त्यानुसार नियोजन करण्यात आले. त्यानंतर शेतीसाठी कर्ज मिळण्याबाबत सेंट्रल बँकेकडे अर्ज केला. आपली सामूहिक शेतीविषयीची योजना आणि त्याद्वारे मिळू शकणारे उत्पन्न याविषयी सविस्तर माहिती समजावून सांगितल्यानंतर सेंट्रल बँकेकडून १ लाख २० हजारांचे कर्ज मिळाले. त्याच्या आधारे सामूहिक शेती करण्यास सुरूवात झाली. या शेतीमध्ये कापूस, मक्का, सोयाबीन या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

दहा महिलांनी रोज आळीपाळीने शेतीत कामाचे दिवस वाटून घेतले न चुकता ते आपल्या जबाबदारी नुसार काम करीत आहेत. त्यात शेतीची निंदणी करणे, पाणी देणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे हे सर्व जबाबदारीने केले जात आहे. त्यामुळे शेताची निगा चांगल्या प्रकारे राखली जात आहे. येणाऱ्या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षणासाठी तसेच आरोग्यासाठी पैशाचा वापर केला जातो.

कामावर मेहनत घेतल्याने या वर्षी त्यांना चांगले उत्पन्न मिळालेले आहे. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढल्यामुळे त्यांनी आता गटाच्या नावाने शेती करण्याचे ठरविले आहे. त्याच्या या कामाचे स्वरूप पाहून आता गावातील इतर बचत गटांतील महिलांनी देखील सामूहिक शेती करण्याचे ठरविले आहे, हे या महिलांचे यशच म्हणावे लागेल.


  • मेघ:श्याम महाले

  • No comments:

    Post a Comment