स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शन सन २०१० पासून जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी भरविण्यास सुरुवात झाली. मुक्ताई सरस चे तिसरे वर्ष होते. प्रदर्शन जिल्हयातील महिला बचत गटांसाठी एक आधारवडच ठरले आहे. सन २००९-२०१० व २०१०-२०११ या दोन वर्षात मुक्ताई सरस प्रदर्शनात सुमारे ३५० महिला गटांनी सहभाग नोंदविला होता. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सदरच्या गटांना सुमारे २५०-३०० स्टॉल्स प्रदर्शनाकरीता उपलब्ध करुन देण्यात आले होते.
मागील दोन्ही प्रदर्शनाला जळगावकरांनी मोठा प्रतिसाद दिला. हजारो नागरिकांनी प्रदर्शन कालावधीत बचतगटांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांनी निर्माण केलेल्या अप्रतिम वस्तूंची खरेदी केली. या दोन प्रदर्शनातून सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांची उलाढाल झाली. चार-पाच दिवसात बचतगटांच्या वस्तूंची एवढया मोठया प्रमाणावर विक्री झाल्याने बचतगटातील महिलांचा उत्साह दुणावला. तसेच प्रदर्शन आयोजनामागचा उददेश ही सफल झाला.
सदरच्या प्रदर्शनात खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनास भेट देणा-यांना वस्तू खरेदी बरोबरच अस्सल खान्देशी खाद्यपदार्थाची मेजवानी आपसूकच मिळाली.
जिल्हयात आजमितीस सुमारे ९ हजार ५०० बचतगट कार्यरत असून त्यापैकी साडे सहा हजार गट महिलांचे आहेत. मुक्ताई सरस ने चूल व मूल या संकल्पनेतून कधीही बाहेर न पडलेल्या ग्रामीण भागातील महिलांना बाहेरचं जग दाखवून व्यवहार कुशल बनविण्याचं काम केले. या कालावधीत बचतगटांना आपल्या वस्तूंचे विपणन, वितरण, जाहिरात कशी करावी, मालाचा दर्जा कसा ठेवावा आदी बाजारपेठीय संकल्पाचा अनुभव येण्यास मदत झाली.
प्रदर्शनात बचतगटांकडून तांब्याच्या वस्तू, गोधडी, चामडयाच्या वस्तू, पणती, दिवे, कुरडई, पापडया, लोणचे, लाडू, चिक्की, मसाले, तांब्याची भांडी, रजया, बांबूच्या वस्तू , हँड बॅगा, मायक्रम झुले आदि वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.
यावेळी बचतगटांच्या प्रदर्शनाबरोबरच खान्देशातील कलावंताच्या कलागुणांना वाव देणारा ' खान्देश महोत्सवही ' आयोजित करण्यात आला होता. रोज सांयकाळी ६ ते ९.३० या कालावधीत स्थानिक कलाकारांनी आपल्या कलागुणांचा कलाविष्कार सादर केला. यात लोकनृत्य, पोवाडा, लावणी,मिमीक्री, लोकगीत, विडंबन आदि कार्यक्रम सादर केले गेले. म्हणजेच २५० बचतगटांच्या प्रदर्शनाबरोबरच जळगावकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीही मिळाली. अल्पावधीतच ' मुक्ताई ' ने जिल्हावासियांच्या मनात स्थान निर्माण केले असून ' मुक्ताई सरस ' प्रदर्शन हे ख-या अर्थाने जिल्हयातील महिला बचतगटांच्या वस्तूंच्या विक्रीकरिता एक हक्काची व सरस बाजारपेठ ठरलं आहे.
No comments:
Post a Comment