चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा, वस्तापूर, कुलंगणा (खुर्द) कुलंगणा बुजरूक या चार गावातील अनेक शेतकरी सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करून शेती करीत आहेत. शेतीत लागणारे बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्यामुळे होणारी हानी आणि महागाईमुळे येणारा कर्जबाजारीपणा या बाबी लक्षात आल्यावर सेंद्रीय पद्धतीने शेती केल्याशिवाय विकास साध्य होणार नाही हे शेतकऱ्यांना कळून चुकले आहे. जीवन विकास संस्था यासाठी त्यांना मार्गदर्शन करीत आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, मिरची, ज्वारी, भुईमूग यांचे सेंद्रीय पद्धतीने चांगले उत्पादन घेतले आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात सुद्धा गहू व चना यांचेही भरघोस उत्पादन मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. हे पीक घेत असताना शेतकरी बियाण्यांचा उपयोग म्हणून शक्यतो स्वत: जवळील बियाणे वापरतात. तसेच सेंद्रीय खत व औषधी म्हणून दशपर्णी अर्क, जीवामृत, निंबोळी अर्क, शेणखत, गांडूळ खत याचा वापर करतात. कोणत्याही पद्धतीचे रासायनिक खत वा कीटकनाशकांचा वापर होत नाही. त्यामुळे सेंद्रीय शेतीतून अतिशय कमी खर्चात चांगल्या पद्धतीने पीक घेतले जात असल्याचे दिसून येत आहे.
लोकांना विषमुक्त अन्न देणे हे उदिष्ट शेतकऱ्यांनी समोर ठेवले आहे. विषमुक्त अन्नासोबतच फळे आणि पालेभाज्यांची लागवडसुद्धा सुरू केलेली आहे. इतरांनी देखील या पद्धतीने पिकांची, फळझाडांची, पालेभाज्यांची लागवड करावी, यासाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य सुद्धा हे शेतकरी आता करीत आहेत.
सेंद्रीय पद्धतीने कमी खर्चात चांगले उत्पादन होत असताना पाहून त्या परिसरामधील अनेक शेतकऱ्यांनी पुढील वर्षी सेंद्रीय पद्धतीने शेती करण्याचे ठरविले आहे. विषारी खत व औषधाचा वापर न करता ते शेती करणार आहेत. शेतकऱ्यांना सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता जीवन विकास संस्थेचे कार्यकारी संचालक फादर जॉली, सहाय्यक कार्यकारी संचालक फादर बेंजामिन, सागर कन्हेरे, ओमप्रकाश सुखदेवे, अतुल गवई, साधुराम खडके आदी प्रयत्न करीत आहे.
No comments:
Post a Comment