Wednesday, April 11, 2012

मेळघाटातील वसंत ऋतू


मेळघाट हा सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेला आहे. या सातपुडयामध्ये पूर्व मेळघाट वन विभाग, प्रामुख्याने चिखलदरा ३८१४ फूट समुद्रपासून उंचीवर आहे. पूर्व मेळघाट वन विभागाच्या पश्चिमेकडे व्याघ्र प्रकल्पाची सीमा असून उत्तर व पूर्वेकडे मध्यप्रदेश राज्याची सीमाआहे. दक्षिणेकडे अमरावती वनविभाग आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा भारतामध्ये पहिल्या दहा मध्ये अग्रणीय आहे.

सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यामध्ये विखुरलेला आहे, पण दोन्हीही राज्यांमधील सातपुडयाची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे.मेळघाट हा आपल्या वन्यप्राणी व वनस्पतीच्या दृष्टीने जैवविविधतेमध्ये आपले वेगळेपण दर्शवितो. मेळघाटातील वृक्षप्रजातीच्या प्रकारामुळे पर्यावरणावर अनुकूल परिणाम आढळून येतो. जसे वार्षिक पर्जन्यमान अमरावती जिल्हयामध्ये मेळघाटामध्ये अधिक प्रमाणात होणे, नदयांच्या पाण्याचा प्रवाह व पातळी दीर्घकाळासाठी टिकून राहणे. कमीत कमी तापमान व हवेमधील थंडावा किंवा आद्रता जास्त दिवस टिकून राहणे, याकरिता मेळघाट हा पर्यावरणाच्या दृष्टीने विदर्भामध्ये व महाराष्ट्रामध्ये आपले स्वत:ची ओळख दर्शवितो.

घाटांचा मेळ म्हणजे मेळघाट, मेळघाट हा धारणी व चिखलदरा या दोन तालुके मिळून पूर्ण होतो. मेळघाटातील जंगल हे दोन वन विभागामध्ये विभागले गेले आहे. पूर्व मेळघाट वन विभाग, व पश्चिम मेळघाट वन विभाग, पूर्व मेळघाट वन विभागाचे एकूण क्षेत्रफळ ५६०९७.०६ हे. आहे. पूर्व मेळघाट वन विभागाच्या भौगोलिक रचनेमध्ये विविधता आहे. जमीन- लाल, काळी, पाणी झ-याच्या स्वरुपात, धबधब्याच्या स्वरुपात, ओढयाच्या स्वरुपात, नदीच्या स्वरुपात जसे की, चंद्रभागा नदी, शहानूर नदी, आडनदी, इत्यादी. धबधबे, भीमकुंड, कलालकुंड जत्राडोह, पंचबोल, इत्यादी. पाणी हे जीवन आहे.

मेळघाटातील जंगलामध्ये वार्षिक पर्जन्यमान ११०० ते १२०० ‍िम.मी. इतके आहे. वातावरणातील आर्द्रता ६० ते ८५ टक्के व तापमान ९ ते ३७ डिग्री से.असते. पूर्व मेळघाट वन विभाग चिखलदरा अंतर्गत चिखलदरा, घटांग, जारीदा व अंजनगाव असे चार वनपरिक्षेत्र येतात. या चारही वनपरिक्षेत्रामध्ये वृक्षांची संख्या ११ ते १३ टक्के आहे. पूर्व मेळघाट वन विभागामध्ये जैवविविधता मोठया प्रमाणात आहे. शास्त्रीय व्याखेनुसार जैवविविधता म्हणजे विविधतेने वनस्पतीच्या विविध प्रजातीने नटलेला मेळघाटचे जंगल. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल - जारुळ, झाड- आंबा, प्राणी -शेकरु व पक्षी -हरियाल आहे. राष्ट्रीय पक्षी मोर आहे. पूर्व मेळघाट वन विभागामध्ये प्रामुख्याने चिखलदरा, घटांग व जारीदा या तीन वनपरिक्षेत्रामध्ये उंच,डोंगराळ प्रदेश व द-याखो-या असल्यामुळे भौगोलिक रचनेमध्ये सुध्दा विविधता आहे.

या जंगलातील पावसाळयातील पावसाचे पाणी दोन प्रमुख नदयांना जावून मिळते. तापी व पुर्णा या दोन महत्वपूर्ण नदया मेळघाट वनातून वाहतात. जमिनीमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे व तापमानामध्ये विविधता असल्यामुळे वृक्षांचा प्रकार हा पाणझळ वृक्षामध्ये येतो. म्हणूनच या वनाचा प्रकार पाणझळ प्रकारचे जंगल असे संबोधले जाते. या वनविभागामध्ये उंचवट, व खोलगट द-याखो-या असल्यामुळे सूर्याची किरणे काही ठिकाणी प्रत्यक्ष पोहचतात. काही ठिकाणी अप्रत्यक्ष पोहचतात.

ज्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरुपात पोहचतात त्या ठिकाणचे तापमान अधिक असते व ज्या द-याखो-यामध्ये सूर्याची किरणे कमी अधिक प्रमाणात असतात त्या ठिकाणचे तापमान कमी असते व आर्द्रता जास्त असते. या सर्व भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पूर्व मेळघाट वन विभागामध्ये वनस्पतीची जैवविविधता मोठया प्रमाणात आढळते. जैवविविधता ही तीन प्रकारची आहे. १. जेनेटिक विविधता २. स्पेसीज विविधता ३. इको सिस्टीम विविधता (परिस्थितीकी विविधता)

या वनविभागामध्ये जैवविविधतेचे हॉट स्पॉटस् मोठया प्रमाणात आढळतात. जसे घटांग वनपरिक्षेत्रातील सिरजबन, चिखलदरा वनपरिक्षेत्रातील पंचबोल व कलालकुंड चे खोरे , जारीदा वनपरिक्षेत्रातील भूतखोरा हे जैवविविधतेचे प्रमुख ठिकाणे आहेत.

या वनविभागामध्ये जैवविविधता ही वेलींच्या स्वरुपात, झाडांच्या स्वरुपात, झुडपांच्या स्वरुपात व गवत प्रजातीच्या वनस्पतींच्या स्वरुपात आणि फूल न येणारी वनस्पती, ब्रायोफायटा, टेरीडोफायटा, फंजाय,(बुरशी वर्गीय) व शेवाळ वर्गीय वनस्पतीच्या स्वरुपात जैवविविधता मोठया प्रमाणात आहेत.

या वनविभागामध्ये प्रामुख्याने आढळणा-या वृक्ष प्रजाती म्हणजे साग, आंबा, जांभूळ, आवळा, बिहाडा, हिरडा, अर्जुन कुंकू, तिवस, रानजाई, इ. , ब्रायोफायटा प्रवर्गातील टार्जिओनिया, रिक्सीया, ऍ़न्थोसिरॉस, फिनॅरिया, पॉलिट्रायकम, टेरिडोफायटा प्रवर्गातील सिल्वर फर्न, ऍ़डीऍ़न्टम, बचनाग, नेफ्रोलिपीस, इ. व जिम्नोस्पंप प्रवर्गातील चिखलदरा वनपरिक्षेत्रामध्ये प्रामुख्याने आढळणा-या वृक्ष प्रजाती म्हणजे पाईन, विद्या, ख्रिसमस ट्री, क्युप्रेसस, ज्युनिपर, ऍ़गॅथीस व ओडोकार्पस इत्यादी. या वनस्पती प्रजातीची जैवविविधता भौगोलिक रचनेनुसार जमिनीच्या प्रकारानुसार व वातावरणातील आर्द्रतेनुसार आहे. या वनविभागामध्ये उंच प्रदेशामध्ये व अधिक पर्जन्यमान होणा-या ठिकाणी आढळणा-या वनस्पती प्रजाती - कुमकुम, सिल्वर ओक, आवळा, कांचन, रक्तकांचन, पाईन, तिवस, घाटबोर,धायटी, बेहाडा, बिजा साग, आंबा, जांभुळ अमलतास, धावडा, मोहा, हिरडा, इत्यादी.

पूर्व मेळघाट वन विभागामध्ये आढळणा-या दुर्मीळ प्रजाती - (रेअर प्लॉन्ट स्पेसीस) बचनाग, दहीपळस, सफेद मुसळी, Viscum articulatum (बांधा) केवकंद, मोर्चेला, (मशरुम) मालकांगणी (ज्योतिषमती), गोंगल , पिवळा पळस, Agathis, Tetu, पिवळा धोत्रा, बिजा साग, शेरोपेजीया, इत्यादी. तसेच कमी उंची असलेल्या वन प्रदेशात आढळणा-या वनस्पती प्रजाती - कुडा, अंमलतास, भिंगरी , बेल, उंबर, वड, पिंपळ , कडुनिंब, बिबवा, पळस, पांगारा, बाभूळ इत्यादी. तसेच नदी काठी आढळणा-या वनस्पती प्रजाती अर्जुन, उंबर, आंबा, मॉसेस,फर्मस, गवत प्रजाती इत्यादी.
चिखलदरा या थंड हवेच्या पर्यटन स्थळी ऐतिहा‍सिक गाविलगड किल्ल्याचे वास्तव्य आहे. हा किल्ला विदर्भामध्ये प्रसिध्द आहे. हा ऐतिहासिक किल्ला वनपरिक्षेत्रामध्ये येतो. या वनपरिक्षेत्राचा हा एक प्रमुख भाग आहे.वनस्पती जैवविविधेच्या दृष्टीने सुध्दा वनस्पती शास्त्रज्ञ या ऐतिहासिक किल्ल्याकडे मोठया अभ्यासू वृत्तीने व उत्कंठेने पाहतात. या किल्ल्यामध्ये तिखाडी, बिजासाग, दगडफूल, तिवस, आवळा, जंगली चाफा, धामन, गूळवेल, निवडुंग, पुर्ननवा, अनंतमूळ, बांधा इत्यादी वनस्पती प्रामुख्याने आढळतात.

जागतिक वनदिन २१ मार्च, हा वसंत ऋतू मध्ये साजरा करण्याचे कारण या कालावधीपासून जंगलामध्ये फुलो-याची विविधता असते.संत तुकाराम महाराजांच्या अभंग वाणीनुसार वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे | पक्षी ही सुस्वरे आळविती || या वसंत ऋतूमध्ये झाडांची फुले, पळसाची फुले, पांगा-याची फुले, काटेसावर, कांचन, अमलतास इत्यादी झाडांची फुले मनुष्य प्राण्यांचे व पक्षांचे लक्ष वेधून घेते. ऋतूमध्ये बदल होण्याचे संकेत देतो.

या वनविभागामध्ये पावसाळा , हिवाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये फुलो-यावर येणा-या वनस्पती मानवांच्या डोळयांना आक‍िर्षत करतात. पावसाळयामध्ये फुलो-यावर येणा-या वनस्पती - साग, जंगली ज्वारी, रायमोनीया, कळलावी, चित्रक, केवकंद, तरोटा,काळी मुसळी, पांढरी मुसळी, मुरळ शेंग इत्यादी. हिवाळयामध्ये फुलो-यावर येणा-या वनस्पती- धायटी, सागरगोटी बिबवा, मुरळसेंग, मालकांगणी, बांधा, कॅशीया, शंकासूर, तिखाडी, कुसुम, पोगोस्टीमॉन, इत्यादी.
उन्हाळयामध्ये फुलो-यावर येणा-या वनस्पती हॉलिगे, कांचन, रक्तकांचन, गुलमोहर, सोनमोहर, निळागुलमोहर, पांगारा, आंबा, घाटबोर, चारोळी, कुंमकुम, सिल्वर ओक, कडुनिंब, गोंगल मोहा पांगारा इत्यादी.

या वनविभागामध्ये आढळणा-या प्रमुख दुर्मीळ वनस्पती - सफेद मुसळी, काळी मुसळी, दहीपळस, बिजासाग, गोंगल, घाटबोर, व्हॅन्डा, बचनाग, मोर्चेला, ऍ़गॅथीस रोगुष्ठा, मालकांगणी, टेटू, इत्यादी.

पूर्व मेळघाट वन विभागाव्दारे जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन, लोकसहभागातून वनाचा विकास, लोक जनजागृती, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वनसंवर्धनाची जागृती, वन्यजीव सप्ताह साजरा करणे, आदिवासी लोकांना प्रशि‍क्षित करणे. जसे, बांबूपासून कला, लाख तयार करणे, अगरबत्ती तयार करणे, मध काढणे, व वनऔषधीचे संवर्धन करणे आदी उपक्रम साततत्याने राबविले जातात. त्यामुळेच मेळघाटातील जैवविविधता समृध्द आहे.

जंगल वाचवा - जीवन वाचवा
आजच्या एकविसाव्या शतकात जंगलाचे संवर्धन जर लोकसहभागातून झाले तर जैवविविधेचे संगोपन व संवर्धन आपोआपच होईल. वन ही राष्ट्रीय संपत्ती आहे तिचे जतन करा, असे आवाहन डॉ.जितेंद्र रामगावकर उपवनसंरक्षक, पूर्व मेळघाट यांनी सर्व शालेय विद्यार्थी, आदिवासी बांधवांना केले आहे.


  • मुकेश चौधरी

  • No comments:

    Post a Comment