साधारणपणे मार्च महिना आला की समस्त आयांना वाळवणाचे वेध लागत असत. वाळवण म्हणजे उन्हाळ्यामध्ये वाळवून तयार केलेले पापड, कुरडाया आणि तत्सम पदार्थ. मुलांच्या परीक्षा होईपर्यंत वाळवणाची पूर्वतयारी घराघरातून होत असे आणि परीक्षा संपल्यानंतर त्यांच्याच मदतीने वाळवणाची धांदल उडे. पापड, कुरडया, शेवया, पापड्या, दह्यातील मिरच्या असे पदार्थ प्रत्येक घरासमोर टाकलेल्या पलंगावर वाळताना हमखास दिसत. मला आठवतं माझ्या लहानपणी शेजाऱ्यापाजाऱ्यांनी मिळून मिसळून असे पदार्थ करण्याची पद्धतच असे. आम्ही ठरवून एकमेकींच्या घरी पापड करायला जायचो. आम्ही लहान मुली छोटे पापड लाटून द्यायचो आणि मग सर्व मोठ्या बायका मोठे गोल पापड लाटायच्या. मग आम्ही हे पापड सावलीत वाळवायचो. पण आमचं सगळं लक्ष असायचं पापडाच्या लाट्यांकडे. पापड संपत आले की मग आम्हाला तेलात बुडवलेल्या लाट्या खायला मिळायच्या. एक प्रकारे आमच्या श्रमाचा तो मोबदलाच असायचा. ती मिरीची चव असलेली उडदाच्या पिठाची लाटी खाल्ली की आम्ही खूष व्हायचो. त्याच लाट्या आज विकत घेताना आपल्या हातातून बालपण निसटून गेल्याची जाणीव तीव्रतेने झाली.
पापडांची धूम संपतानाच कुरडयांसाठी घरोघरी गहू भिजत घातले जायचे. गहू वाटल्यावर त्यातून निघालेला पांढराशुभ्र चिक कुरडयांसाठी सज्ज व्हायचा. गुठळ्या न होऊ देता पांढराशुभ्र चिक शिजला की अधिक चमकदार दिसायचा. मग सगळ्यांचे सोरे एकत्र करुन मेणकापडावर पटापट कुरडाया घातल्या जायच्या. जसजसं पातेलं रिकामं व्हायचं तसतसा चिक थंड व्हायचा आणि कुरडाया घालणं अधिक कष्टदायी व्हायचं. मग चवीसाठी प्रत्येकाला चिक दिला जायचा. खमंग फोडणी घालून किंवा दूध आणि साखर घालून घरोघरी चवीने हा चिक खाल्ला जायचा.
गव्हाचा चिक काढल्यानंतर उरलेला गव्हाचा कोंडा फेकून न देता त्याच्या धापोड्या बनवत. नुसत्या कच्च्या धापोड्या खाण्याची मजा वेगळीच असे. त्यानंतर नंबर लागे तो हरबऱ्याच्या वड्यांचा. रात्रभर हरभऱ्याची डाळ भिजली की सकाळी ती उपसून, पाणी न घालतां जाडसर वाटायची. त्यात हिंग, हळद, भरपूर तिखट घालून त्याचे छोटे-छोटे वडे घालून ते वाळवायचे. या वड्याची भाजी फार सुंदर लागते. पावसाळ्यात आणि जेव्हा बाजारात भाजी उपलब्ध नसते, तेव्हा ही भाजी हमखास केली जाते. दरम्यान सांडगे, दह्यातल्या मिरच्या असे कमी श्रमाचे आणि एकटीने करण्याजोगे पदार्थ घरच्याघरी उरकले जात.
मग नंबर लागत असे उपवासाच्या पदार्थांचा. यामध्ये आमचा सहभाग फारसा नसे. बटाट्याचे चिप्स केल्यानंतर खाली राहीलेल्या सत्त्वयुक्त पाण्यात केलेल्या साबुदाण्याच्या पापड्या एकदम चविष्ट लागायच्या. दरम्यान बटाट्याचा कीस, साबुदाणा-बटाट्याच्या चकल्या आई करायची. बटाट्याचे पापड बनवायला मात्र आम्ही मदत करायचो. हे सर्व उपवासाचे पदार्थ वेगळे ठेवले जात. त्यानंतर अत्यंत किचकटपणे आई ज्वारीच्या पापड्या करायची. त्या पापड्या कधीच मेणकापडावर घातल्या जायच्या नाहीत. जुन्या पण स्वच्छ धुवट चादरीवर अथवा साडीवर या पापड्या घातल्या जायच्या. मग दुपारनंतर साडीवर पाठीमागच्या बाजूने पाण्याचा शिपकारा मारुन त्या अलगद सोडवताना खरं कौशल्य पणाला लागे. मग खारोड्यांचा नंबर लागे. बाजरीच्या रवाळ शिजलेल्या पिठाच्या खारोड्या घालताना हात भाजून निघे. खारोड्या वाळल्यानंतर त्या कच्च्याच खाण्यात खरी मजा आहे. कच्चे शेंगदाणे, कांदा, कैरी असा फक्कड बेत म्हणजे आम्हा मुलांचा त्यावेळचा मधल्या वेळेतला नाष्टा असे.
मे महिन्यात ऊन अधिक तापू लागले की घरच्याघरी करता येण्याजोग्या शेवयांचा नंबर लागे. येथे सगळ्या बायकांच्या कौशल्याची परीक्षा होई. अतिशय नजाकतीने हातावर शेवया तयार केल्या जात व दोन पत्र्याच्या डब्यांच्या मधोमध बांबू आडवा टाकून त्यावर वाळवल्या जात. पापड, कुरडाया, शेवया, खारोड्या अशा महत्त्वाच्या बाबी झाल्यानंतर मग प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार पोह्याचे पापड, नाचणीचे पापड, तांदळाच्या पापड्या/कुरडाया असे पदार्थ घरोघरी तयार करत.
अशा सर्व वाळवणाच्या पदार्थांनी डबे भरले की वर्षाची बेगमी झाल्यामुळे आई संतुष्ट असे. आजकाल सगळ्या वाळवणाच्या गोष्टी पॉश मॉलमध्ये चकचकीत वेष्टणात मिळतात. त्या घेण्यासाठी आपल्याकडे पैसेही पुष्कळ असतात. पण ती आईच्या हातची चव, तो जिव्हाळा, आपलेपणाची भावना..... या गोष्टी कुठे मिळतील? पुर्वीच्या काळी जेव्हा शेजारपाजाऱ्यांच्या मदतीने वाळवण केलं जायचं तेव्हा कष्टाबरोबरच विचारांचीही देवाणघेवाण व्हायची. एकोपा वाढीसाठी याचा फायदा व्हायचा जणू काही एक सामाजिक स्नेहसंमेलनच व्हायचे. सासुरवाशीणींच्या भावनांना वाट मोकळी व्हायची. एकमेकींबद्दलचे किंतु साफ व्हायचे. लहान मुलींवर नकळत कष्टाचे संस्कार व्हायचे. मला वाटतं हा भाग जास्त महत्त्वाचा आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात फ्लॅट संस्कृतीमध्ये रमणाऱ्या मुलामुलींना असं लहानपण कसं मिळणार? असे संस्कार मिळणार आणि अशी संस्कृती ते कधी अनुभवणार?
No comments:
Post a Comment