त्याचे झाले असे, १९८८ साली मी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम हा अभ्यासक्रम करण्यासाठी गेलो. तेव्हा मी दूरदर्शनमध्ये करारपत्रित कलाकार ( स्टाफ आर्टिस्ट ) म्हणून कार्यरत असल्याने मला अध्ययन रजा मिळू शकत नव्हती, जी एरव्ही नियमित शासकीय कर्मचा-यांना मिळू शकते, म्हणून मी अन्य स्वरुपाची रजा घेऊन हा अभ्यासक्रम करण्यासाठी गेलो. अभ्यासक्रमाचे पहिले सत्र नोव्हेंबरमध्ये संपले आणि मी रजेवरुन परत दूरदर्शनमध्ये सेवेत रुजू झालो.
त्याच वेळी माझे वरिष्ठ अधिकारी निर्माते सुधीर पाटणकर यांच्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित हिंदी माहितीपट राष्ट्रीय प्रसारणासाठी बनविण्याची जबाबदारी केंद्राने सोपविली. बैठकीतून परत आल्यावर आपल्यावर किती प्रचंड जबाबदारी सोपविली आहे, हे पाटणकरांना कळून चुकले होते. त्यामुळे ते विचारमग्न झाले होते. कक्षात येताच मी त्यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी कारण सांगितले. यावर मी त्यांना म्हणालो, तुम्ही मला दोन दिवसांचा वेळ द्या, पूर्ण विचार करुन काय ते ठरवू या.
या दोन दिवसात विचारांती माझ्या लक्षात आले की, बाबासाहेबांची ओळख प्रामुख्याने भारतीय घटनेचे शिल्पकार आणि दलितांचे नेते अशी होते. वस्तुत: याशिवाय ते विचारवंत, समाज सुधारक, शिक्षण प्रसारक, कामगार नेते, धर्माचे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ, संपादक अशा विविध भूमिकांतून प्रभावीपणे वावरलेले आहेत. या विविध पैलूंपैकी मला सर्वाधिक भावला तो म्हणजे शिक्षणाचा पैलू. खरे पाहता बाबासाहेबांनी स्वत: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले होते. परदेशात जावून डॉक्टरेट मिळविली होती. या त्यांच्या उच्च शिक्षणामुळे आपले पुढचे जीवन ऐटीत आणि आरामात घालविणे त्यांना सहज शक्य होते. परंतु शिक्षणाचे महत्व ओळखून त्यांनी देशबांधवांना शिक्षित करण्यासाठी शिक्षण प्रसारणाचे काम हाती घेतले.
१९८८ साली औरंगाबादला विद्यापीठात शिकत असताना जो मराठवाडा तेव्हाही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्टया मागासलेला समजला जात असे, अशा मराठवाडयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे १९४८ साली मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. हे पाहून मला बाबासाहेबांविषयी अतोनात आदर वाटू लागला. अन्यथा त्या काळी मराठवाडयातील तरुण तरुणींना उच्च शिक्षण घ्यावयाचे असल्यास नागपूर, पुणे, हैद्राबाद अशा दूरच्या ठिकाणी जावे लागायचे.
इतक्या दूर जावून शिक्षण घेण्याची अनेकांची ऐपत नसायची. त्यामुळे मराठवाडयातील हजारो तरुण उच्च शिक्षणापासून वंचित राहत. त्यांच्या या अडचणी ओळखून बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मराठवाडयातील पहिले असे मिलिंद महाविद्यालय सुरु करुन दूरदृष्टी दाखविली.
या महाविद्यालयामुळे मराठवाडयात उच्च शिक्षणाची क्रांती झाली असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. म्हणूनच १९८८ साली माहितीपटासाठी विषयाचा विचार करताना मला बाबासाहेबांच्या शैक्षणिक पैलूवरच संपूर्ण माहितीपट असावा असे वाटू लागले. वरिष्ठांशी चर्चेअंती याच विषयावर माहितीपट करण्याचे निश्चित झाले. माहितीपटाचे स्वरुप विचारात घेता त्यासाठी सर्व तपशील, संशोधन परिपूर्ण असणे गरजेचे होते. त्यासाठी संशोधनाचे काम प्रा.गोविंद पानसरे यांना देण्यात आले. त्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित संहितालेखन प्रा.रतनलाल सोनग्रा यांनी केले.
माहितीपटाच्या चित्रीकरणास आम्ही औरंगाबादपासून सुरुवात केली. या चित्रीकरण पथकात कॅमेरामन के.गणपती, ध्वनिचित्रमुद्रक किशोर जोशी, सहाय्यक ए.के.सारस यांचा समावेश होता. नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाची वास्तू, तेथे उपलब्ध असलेली छायाचित्रे, बाबासाहेबांच्या संग्रही ठेवलेल्या वस्तू, प्राचार्याची आणि विद्यार्थ्यांची मनोगते, तत्कालीन मराठवाडयाचे कुलगुरु प्रा.शिवाजीराव भोसले यांचे निवेदन आणि पुणे, महाड, मुंबई येथील शैक्षणिक वास्तूंचे चित्रीकरण व संकलन करुन पुढे ६ डिसेंबर, १९८८ रोजी दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणातून हा माहितीपट प्रसारित झाला.
डॉ.बाबासाहेबांनी विद्यार्थी दशेत कसे शिक्षण घेतले, त्यानंतर समाजाला शिक्षित करण्यासाठी कसे परिश्रम घेतले, शैक्षणिक संस्था कशा उभारल्या, त्यांना या कामी मिळालेले इतरांचे साहय, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांनी लिहिलेले ग्रंथ या सर्व महत्वाच्या शैक्षणिक बाबींचे दर्शन सुमारे ३० मिनिटांच्या या माहितीपटाद्वारे अत्यंत संवेदनशिलपणे दाखविण्यात आले. त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी असल्याने व रात्रौ ९ ची वेळ ही प्राईमटाईम असल्याने या माहितीपटाविषयी देशातील विविध भागातून खूप भावपूर्ण प्रतिक्रिया आल्या.
या माहितीपटामुळे बाबासाहेबांच्या एका पैलूचे थोडे फार का होईना, दर्शन घडविण्याची आपल्याला संधी मिळाली याबद्दल मला नेहमीच समाधान वाटत आले. तसेच बाबासाहेबांचे जीवन आणि कार्य किती अचंबित करणारे आहे, हेही लक्षात येत गेले.
पुढे डॉ.बाबासाहेबांच्या ऐतिहासिक शैक्षणिक कार्याची नोंद घेऊन १४ जानेवारी, १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला मिळालेली ही मानवंदनाच होय.
No comments:
Post a Comment