Tuesday, April 10, 2012

दुहेरी पंप योजनेमुळे मिळाले पाणी

गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडचा अतिदूर आणि अन्य राज्यांच्या सीमांना भिडणारा असा, वनांनी समृद्ध आणि त्यामुळे नक्षलग्रस्त असा जिल्हा आहे. वने मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ह्या जिल्ह्यात आदिवासी भटक्या विमुक्त जाती-जमाती पण मोठ्या प्रमाणात आहे. ह्यामध्ये गोंड-गोवारी, बुरड, कोळी, कोहळी, खाटीक, धनगर-धनगड, जोगी, नाथजोगी, कानफाटे, कानिफ, गोसावी आदी अनेक जाती-जमाती आहेत. ह्या पैकी जिल्ह्याच्या गोंदिया तालुक्यातील अदासी तांडा येथे नाथजोगी पंथीयांचा (भटक्या/ विमुक्त जमाती) ताबा आहे.

अदासी-तांडा येथील नाथ पंथीयांच्या वस्तीत गेल्या कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. ह्या लोकांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी दूरवरुन आणावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन ह्या तांड्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर व्हावी म्हणून नाथजोगी समाजाच्या विकासासाठी झटणारे नाथजोगी समाजाचे दुलिचंद बुद्धे ह्यांनी अथक परिश्रम घेतले.

केंद्र शासनातर्फे गोंदिया जिल्ह्यात सौर ऊर्जेवर कार्यरत राहणारे २०० दुहेरी पंप मंजूर करण्यात आले आहेत. अशा दुर्गम ठिकाणी बी.पी.एल.च्या शिधापत्रिका पण देण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी कमलेश सोनाळे यांनी दिली. ह्या दुहेरी सौर पंपाच्या आरंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेतराम कटरे यांनीही या समाजाच्या विकासासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले.

ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची पायपीट करण्याची गरज न राहिल्यामुळे नाथजोगी समाजातील तांड्यावरील महिलांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे हसू शासन योजनेच्या अंमलबजावणीतील कृतार्थता सहज सांगत होते

No comments:

Post a Comment