परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुका आणि या तालुक्याच्या ठिकाणापासून १८ किलोमीटर अंतरावर आहे शिरोरी गाव. लोकसंख्या केवळ ८५३. साधारणपणे राज्याच्या लहान गावांमध्ये, खेड्यांमध्ये जशी परिस्थिती असते तशीच परिस्थिती शिरोरी गावात होती.
शासनाच्या सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेची महिलांना माहिती देण्यात आली. गावातील १२ महिला एकत्र आल्या. बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा आशेचा किरण त्यांना दिसला. त्यांनी १ मार्च २००९ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बचतगटाची स्थापना केली. शिर्सी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत खाते उघडले. या १२ महिलांनीही दरमहा प्रति सभासद १०० रुपये नियमित बचत करण्यास सुरुवात केली. इतर सर्व बचत गटांप्रमाणेच अंतर्गत कर्ज व्यवहार करुन या गटाच्या महिला आपल्या गरजा भागवू लागल्या. बचतगटाचे व्यवहार पाहून बँकेने त्यांना १५ हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करुन दिले. त्यातून तीन महिलांनी शेळीपालन सुरु केले.
या कर्जाची परतफेड झाल्यानंतर बँकेने दुसऱ्यांदा एक लाख रुपयांचे कर्ज दिले. दुसऱ्यांच्या शेतात मजूर म्हणून काम करणाऱ्या या महिलांना एवढी मोठी रक्कम कर्ज म्हणून मिळाल्याच्या घटनेवर विश्वासच बसत नव्हता. या कर्जातून कोणता व्यवसाय करावा, यावर विचारविनिमय झाल्यानंतर दुसऱ्यांच्या शेतात घाम गाळण्यापेक्षा आपण सर्व महिला एकत्र येऊन शेती करावी असा निश्चय त्यांनी केला. बऱ्याच प्रयत्नां नंतर गावातीलच एका शेतकऱ्याची १० एकर जमीन भाडेतत्वावर उपलब्ध झाली. भाडे ठरले प्रती एकर ४ हजार रुपये. त्यानुसार ४० हजार रुपये देऊन शेतजमीन ताब्यात घेतली.
भाडेतत्त्वावर घेतलेल्या या शेतात बचतगटाच्या महिला मनापासून राबू लागल्या. शेतीसाठी लागणारा खर्च गटातून होणार असल्याने महिलांचे खर्चावर नियंत्रण होते. शेतीची माहिती होतीच, त्यामुळे आवश्यक असणाऱ्या बाबींवरच खर्च झाला. गेल्या वर्षी १० एकरामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, गहू, हरभरा ही पिके लावली. बी-बियाणे, मशागत, खते, कीटक नाशक फवारणी तसेच भाडेतत्वावरची रक्कम असा एकूण एक लाख २० हजार रुपये खर्च आला. महिलांनी शेतात गाळलेल्या घामाचे मोती झाले. कापूस २४ क्विंटल, तूर अडीच क्विंटल, सोयाबीन १७ क्विंटल असे उत्पादन झाले. सध्या गहू व हरभरा ही पिके उभी आहेत. बचतगटाच्या माध्यमातून स्वत:च्या शेतजमिनीत काम करण्याचे समाधान आणि आनंद या महिलांना मिळाला. शेती उत्पादनातून झालेली उलाढाल सुखद अनुभवाची ठरली.
महिलांच्या या वाटचालीत महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड, बँकेचे शाखा व्यवस्थापक अशोक सोळुंके, नसीमा सय्यद मंझूर यांचे मार्गदर्शन लाभले. बचतगटाचे काम करत असतानाच आर्थिक स्वावलंबनाबरोबरच सामाजिक भानही या महिलांमध्ये आले. गावात दारुबंदी केली. निर्मल ग्राम, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर करुन आपले जीवन आनंददायी बनविण्याचा संकल्प या महिलांनी सोडला असून त्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
No comments:
Post a Comment