श्री गजानन महाराज संस्थान परिसर स्वच्छतेचा आदर्श घ्यावा असा आहे. मात्र शहरातील अस्वच्छतेमुळे बाहेरगावाचा भाविक येथील नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर टिका टिपणी केल्याशिवाय राहत नव्हता. नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिल अडागळे यांनी या शहराचा अभ्यास करुन पांढरकवडा, जि. यवतमाळ नगरपालिकेत राबविलेला व यशस्वी झालेला स्वच्छतेचा पॅटर्न शेगाव शहरात नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील व नगरसेवकांच्या समन्वयाने कार्यान्वित केला. यामुळे शहरातील घाण, कचरा कमी झाला . स्थानिक नागरिकही पालिकेच्या या उपक्रमाला सहकार्य करीत आहेत.
नगरपालिकेचे ९० स्वच्छता कर्मचारी व कंत्राटपध्दतीने घेतलेले १५ कर्मचारी अशा १०५ कर्मचाऱ्यांना सहा प्रभागात विभागणी करुन त्यांची त्याच प्रभागात नियुक्ती केली. नियुक्त केलेल्या सफाई कामगारांनी आपल्याला दिलेल्या प्रभागातच साफसफाई ठेवावी, त्यासाठी दोन निरीक्षक आणि एक स्वच्छता अधिक्षक अशी पदे निर्माण करुन प्रत्येक प्रभागात दररोज सकाळी जमा होण्याचे ठिकाण नेमून दिले, याशिवाय स्थानिक नगरसेवकांची जोड कर्मचाऱ्यांसोबत घालून दिल्याने कर्मचारी अधिक प्रभावीपणे शहरातील नेमून दिलेल्या स्थळी नेमून दिलेल्या वार व वेळेत स्वच्छतेची कामे करीत असल्याने संपूर्ण शहर स्वच्छ झालेले आहे.
मुख्याधिकारी अडागळे यांना हा पॅटर्न राबविण्यासाठी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील यांची समर्थ साथ मिळाली. नगराध्यक्ष एका सामान्य नागरीकाप्रमाणे सकाळी ६ वाजता मुख्याधिकारी यांच्यासोबत प्रत्येक प्रभागात साफसफाई देखरेखीसाठी दररोज चार तास देत आहे. यामुळे नगर पालिकेकडे स्वच्छतेबाबत येणाऱ्या तक्रारी निकाली निघाल्या आहेत. परिसर स्वच्छतेबाबत सर्वजण दक्ष झाल्याने स्वच्छतेचा पॅटर्न शेगावात यशस्वी झाला. आज स्वच्छ व सुंदर शेगावचे स्वप्न साकार होताना पहाताना सर्वांनाच आनंद होत आहे.
No comments:
Post a Comment