Sunday, April 8, 2012

बाजार सावंगीची रेणुकामाता यात्रा

चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ होतो. चैत्र महिना म्हणजे यात्रा-महोत्सवांचा महिना. याच महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी येथे रेणुकामातेची यात्रा भरते. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भक्त या यात्रेसाठी बाजारसावंगीला येतात. अलाहाबाद मधील तीर्थराज प्रयाग जसे त्रिवेणी संगमावर वसलेले आहे, त्या प्रमाणेच बाजारसावंगी हे गाव तीन नद्यांच्या संगमावर वसले आहे. निम, बोडका व पाडळी या तीन नद्यांचा संगम या गावी होतो.

औरंगाबाद शहरापासून उत्तरेला ४० किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावाला प्राचिन इतिहासाचा वारसा लाभला आहे. गावातील रेणुकामातेचे मंदीर यादवकालीन हेमाडपंथी पद्धतीचे आहे. मंदिरासमोरील सभा मंडप, १५ फूट उंचीची दीपमाळ, पुरातन आठ फूट उंचीची सुरक्षा भिंत, मंदिरासमोरच निजामकालीन कचेरीचा वाडा हे सर्व पाहण्यासारखे आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात रेणुकामातेची चार भुजाधारी मूर्ती आहे. निजामांचे मंडलिक राजे शामराज बहाद्दर व राजे फकिरराज बहाद्दर हे मातेचे उपासक होते. त्यांनीच या मंदिरात पुजारी नेमला व उत्सवाची सुरुवात केली असे सांगितले जाते. रेणुका मातेची पूजा पहाटे नगारा वाजवून आरतीने होते, तसेच दिवसभरात नऊ सुवासीनी, सात सौभाग्यवती यांची पूजा केली जाते. नववधू वरांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते, देवीची ओटी भरली जाते, अभिषेक व महापूजा करताना देवीला दागदागिने, चोळी-पातळ आदींचे दान केले जाते. शारदीय नवरात्र महोत्सवात नऊ दिवस महाआरती व महाप्रसादाचे वाटप केले जाते. कोजागिरी पोर्णीमेला कुबेर आणि लक्ष्मीची पूजा केली जाते.

रेणुकामाता यात्रा महोत्‍त्सवाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. यात्रा काळात गावकरी व भक्तजण नऊ दिवासांचा उपवास करतात रेणुकामातेच्या मूर्तीला सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजविले जाते, दररोज नवीन वस्त्र अर्पण केले जाते. मंदिरात सर्वधर्मीयांना प्रवेश दिला जातो, सर्वांना पूजेचा हक्क आहे. बाहेरगावी काम करणाऱ्या व्यक्ती यात्रा काळात आवर्जून गावाकडे परत येतात. रामनवमी दिवशी कीर्तन ठेवले जाते. पंचमीच्या पहिल्या रात्री गणपती, दुसऱ्या रात्री शारदा, तिसऱ्या रात्री गोपिका-कृष्ण-राधा, चौथ्या रात्री खंडोबा, व पाचव्या रात्री राम,लक्ष्मण, सीता, हनुमान, रावण अशी सोंगे काढली जातात. पाचव्या दिवशीचे चुडैल नावाचे सोंग अतिशय लोकप्रिय आहे. या सोंगात गावातील तरुण मुले सहभागी होतात. मेलेल्या प्राण्यांची हाडे, काठ्या इत्यादी विचित्र वस्त्रे घेऊन तोंडाला काळे लावून समोर बसलेल्या प्रक्षकांना भयभित करतात. या सोंगानंतर सूर्यादयाच्यावेळी नरसिंहाचे सोंग निघते. यावेळी मोठ्या संख्येने भक्तजण दर्शनासाठी येतात. सोंगांची मिरवणूक निघते. या मिरवणूकीवर रेवड्या व गुलालाची उधळण केली जाते. मिरवणूकीची सांगता मंदिराच्या आवारात होते.

हनुमान जयंती पासून भाविकांची गर्दी दर्शनासाठी वाढत जाते. यात्रेचा कालावधी तीन आठवड्यांचा असतो. यावेळेत गावात विविध कार्यक्रमांची मेजवानी असते. फिरते सिनेमा गृह, सर्कस, रहाटपाळणा अशा विविध प्रकारच्या मनोरंजनाची मेजवानी असते. ग्रामीण भागातील नागरिकांना ही यात्रा भक्ती व आनंदाची पर्वणी देणारी असते.


  • रवींद्र पंडितराव नलावडे

  • No comments:

    Post a Comment