Thursday, April 12, 2012

आरोग्यदायी आवळा ठरला बचतगटाला वरदान

आयुर्वेदामध्ये ‘अमृतफळ’ म्हणून सुपरिचित व ‘क’ जीवनसत्वाने युक्त असलेल्या बहुगुणी आवळ्यामधील औषधी गुणधर्माचे मर्म अमरावती जिल्ह्यातील जयदुर्गा महिला बचतगटाने ओळखले. या बचतगटाच्या महिलांनी आवळ्यापासून विविध खाद्य पदार्थ बनविण्याचे कौशल्य साध्य करून तसेच आवळा प्रक्रिया उद्योग सुरु करुन स्वत:च्या आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला. त्यामुळे या बचतगटाची वाटचाल आता प्रगतीच्या दिशेने सुरु आहे.

अमरावतीपासून अवघ्या १०-१५ किलोमिटर अंतरावर असलेल्या बोरगाव धर्माळे येथील हा बचतगट आहे. विश्वरचना ग्रामीण संस्थेचे संस्थापक विजय धर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली या गावात १२ बचतगट काम करीत आहेत. जयदुर्गा महिला बचतगटाच्या अध्यक्षा श्रीमती निलीमा धर्माळे आणि श्रीमती नम्रता पारोदे ह्या सचिव पदाची धुरा जबाबदारीने सांभाळत आहेत. तर, बचतगटाच्या उत्पादनाचे महत्व ग्राहकांना पटवून देत मोठ्या प्रमाणावर मालाची विक्री करण्याचे कौशल्य श्रीमती कीर्ती गजानन मांडेकर यांना हस्तगत झाल्याचे सिद्ध झाले आहे. खऱ्या अर्थाने कीर्ती मांडेकर या बचतगटाच्या जनसंपर्क अधिकारी म्हणूनच उत्तम प्रकारे भूमिका वठवित असल्याचा प्रत्यय या बचतगटाला भेट दिल्यानंतर येतो.

जयदुर्गा महिला बचतगटात १३ सदस्य असून यापैकी १२ महिला सदस्य ह्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील आहेत. हा बचतगट १ सप्टेंबर २००९ मध्ये स्थापन करण्यात आला. प्रत्येक सदस्याने ५० रुपयांप्रमाणे दरमहा बचतीला सुरुवात केली. ७ हजार रुपयांच्या खेळत्या भांडवलावर २५ हजार रुपयांचे पहिले कर्ज गटाला मिळाले. त्यातून या बचतगटाने आवळा प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली.

अमरावती येथील सायंस्कोर मैदानावर नुकताच विकास गंगोत्री या विभागीय प्रदर्शनीत या बचतगटाने सहभाग घेतला. त्याप्रसंगी श्रीमती मांडेकर ह्या आवळ्यापासून उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री मोठ्या कौशल्याने करीत असल्याचे दिसून आल्यामुळे या बचतगटाच्या व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.

आपल्या गटाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, आवळा प्रक्रिया उद्योग सुरु करण्यापूर्वी आम्ही महिलांनी त्याबाबतची माहिती समजून घेतली आणि २५ हजार रुपयांच्या भांडवलावर हा व्यवसाय सुरु केला. मुंबई-पुणे या महानगरासह अकोला, बुलढाणा, यवतमाळ अशा विविध शहरांमध्ये वेळप्रसंगी आयोजित करण्यात आलेले कृषी प्रदर्शन, महिला मेळावे, पुस्तक प्रदर्शन, पुष्पप्रदर्शन व इतर कार्यक्रमानिमित्त आम्ही सहभागी होत राहिलो. आवळा पुरणपोळी हे आमच्या व्यवसायाचे आकर्षण ठरले. अनेकांनी आवळा पुरणपोळीचे कौतुक केले. लोकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सातत्याने अशा विविध मेळाव्यात आम्ही स्टॉल उभारले. यातून आमच्या बचतगटाची आर्थिक प्रगती होत गेली.

या बचतगटातील महिला आवळ्यापासून आवळा बर्फी, आवळा लाडू, आवळा पुरणपोळीचे सारण, मधुमेह शरबत, जलजिरा चूर्ण, आवळा सुपारी, आवळा केस तेल, आवळा सौंदर्य साबण, आवळा दंतमंजन, आवळा कॅन्डी, चिप्स अशा विविध वस्तू तयार करतात. आवळ्यापासून तयार केलेले हे सर्वच पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असल्याचे श्रीमती मांडेकर ग्राहकांना समजावून सांगतात. बोरगाव धर्माळे येथील मुलांना गुटखा खाण्याची सवय मोठ्या प्रमाणावर जडली होती मात्र आवळा कॅन्डी खाण्यामुळे मुलांचे गुटख्याचे व्यसन सुटल्याचे श्रीमती मांडेकर अभिमानाने सांगतात.

आमच्या उद्योगाची भरभराट होत गेल्यामुळे २५ हजार रुपयांच्या कर्ज परतफेडीनंतर बचतगटाला १ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज लगेच मिळाले. त्यामुळे आवळा प्रक्रिया उद्योगासंबंधी मिटकॉन व महाराष्ट्र उद्योग केंद्रातर्फे बचतगटाच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा गटाला विशेष उपयोग झाला. विविध वस्तूंच्या उत्पादन व विक्रीमुळे आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे होऊ लागली. त्यामुळे या कर्जापैकी ८४ हजार रुपयांची कर्ज परतफेड बचतगटाने सहज केली आहे. याशिवाय या बचतगटातील महिला सदस्य, गारमेंट्स, स्‍टेशनरी, दुग्ध व्यवसाय अशा विविध व्यवसायाद्वरे सुद्धा आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.


  • अशोक खडसे

  • No comments:

    Post a Comment