भारताच्या मराठी तंत्रज्ञांनी पराकोटीचे प्रयत्न करुन आशिया खंडातील यशस्वी केलेला हा दुसरा 'लेक टॅपिंग' प्रयोग आहे. उच्चत्तम तंत्रज्ञानामध्ये भारताची मान उंचाविणाऱ्या या दुसऱ्या 'लेक टॅपिंग' प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्तांची तहान भागविली जाणार असून राज्याचं विनाव्यत्यय वीज निमिर्तीचं स्वप्न साकार करणाऱ्या या 'लेक टॅपिंग' अर्थात जलाशय छेद प्रक्रियेविषयी थोडंसं.. ..
कोयना जलविद्युत प्रकल्पात पहिले लेक टॅपिंग १३ मार्च १९९९ रोजी यशस्वीरित्या केले. तर येत्या बुधवारी दुसरे 'लेक टॅपिंग' यशस्वीरित्या होत आहे, कोयनेच्या लेक टॅपिंगसाठीचे तंत्रज्ञान हे परदेशातून आणलेले तंत्रज्ञान नसून सर्व काही मराठी तंत्रज्ञांनी पराकोटीचे प्रयत्न करुन देशाची मान जगात उंचावण्याचे केलेले हे महान कार्य आहे.
सध्या कोयना प्रकल्पातून होत असलेली ३५० कोटी युनिट वार्षिक वीज निर्मिती दुसऱ्या 'लेक टॅपिंग' मुळे यापुढे विनाव्यत्यय (अखंडीतपणे) होणार आहे. तसेच कृष्णा लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राला वीज निर्मितीसाठी मिळणारे २५ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरणे आता शक्य होणार आहे. या २५ टीएमसी अतिरिक्त पाण्यामुळे १२० कोटी युनिट वीज जनरेट करता येणे शक्य आहे.
येत्या बुधवारी कोयना प्रकल्प देशाला अर्पण केला जात असून या 'लेक टॅपिंग' मुळे दुष्काळग्रस्तांची तहान भागविली जाणार आहे तसेच राज्यातील अंध:कार संपून अखंड प्रकाशाने महाराष्ट्र उजळून निघणार आहे. ही क्रांती या 'लेक टॅपिंग' प्रकल्पामुळे घडते आहे, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पामध्ये होत असलेला जलाशय छेद प्रक्रियेचा हा आशिया खंडातील दुसरा प्रयोग असून यापूर्वी १३ मार्च १९९९ रोजी कोयना जलाशयातच 'लेक टॅपिंग'चा आशिया खंडातील पहिला प्रयोग यशस्वी करण्यात आला.
जलाशयाच्या खाली नियंत्रित विस्फोटाद्वारे बोगद्याच्या आकाराचे छिद्र करुन बोगद्यात पाणी घेणे या प्रक्रियेस 'लेक टॅपिंग' म्हणजेच जलाशय छेद प्रक्रिया संबोधले जाते. ही प्रक्रिया नॉर्वेजियन तंत्रज्ञानावर आधारित आहे. 'लेक टॅपिंग'साठी बोगद्याची कामे जलाशयाच्या खाली फक्त ५ ते ६ मीटर जाडीचा रॉक प्लग ठेवून पूर्ण केली जातात व बोगद्यात गेट टाकून हा रॉक प्लग शेवटी नियंत्रित विस्फोटाद्वारे उडविली जातो.
कोयना जलविद्युत प्रकल्पातील दुसरे 'लेक टॅपिंग' हे टेंभू - ताकारी योजनेतील दुष्काळग्रस्तांना २१ टीएमसी पाणी शेती आणि पिण्यासाठी देण्याबरोबरच एप्रिल, मे, जून मध्येही अखंडीत विद्युतनिर्मिती करण्यास सहायभुत ठरणाऱ्या या दुसऱ्या जलशय प्रक्रियेची काही ठळक वैशिष्टे असून ती पुढीलप्रमाणे आहेत:-
• दुसऱ्या 'लेक टॅपिंग' चा प्रयोग पहिल्या 'लेक टॅपिंग' च्या तुलनेत दुप्पट खोलीवर घेतला जाणार आहे
• या प्रयोगात रॉक प्लगमध्ये ४५ अंश च्या कोनाऐवजी ८० अंशच्या कोनात अंतिम ड्रिलिंग केले. यामुळे रॉक प्लगमध्ये करावे लागणारे अंतिम ड्रिलिंग पहिल्या प्रयोगाच्या तुलनेत कमी झालेले आहे.
• या प्रयोगात प्लास्टिक प्रकारची विस्फोटके वापरण्यात आली असून सदर विस्फोटके प्रथम प्लास्टिकच्या पाईपमध्ये भरुन नंतर ती रॉक प्लगमध्ये लोड करण्यात आली आहेत.
• या प्रयोगात अंतिम विस्फोटासाठी वापरण्यात आलेले डिटोनेटर्स हे नॉन इलेक्ट्रिक या प्रकाराचे असल्याने कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेत पहिल्या प्रयोगाच्या तुलनेत जास्त वाढ झाली आहे.
• या प्रकल्पासाठी बसविण्यात आलेले आपत्कालिन दरवाजे हे एकसंध प्रकारचे असल्याने त्यातून होऊ शकणाऱ्या संभाव्य पाणी गळतीचे प्रमाण कमी होणार आहे.
'लेक टॅपिंग' हा प्रयोग प्रगत महाराष्ट्राला पुढे नेणाऱ्या गतिमान उपक्रमातील महत्वाचा टप्पा म्हणून कार्यान्वित होत आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात हा योग जुळून येतोय हाही योगायोगच आहे.
या प्रकल्पाच्या यशस्वीतेत बिनीचे शिलेदार म्हणजे कोयना जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता दीपक मोडक असून त्यांनी आपल्या तज्ञ, अनुभवी अभियंता,तंत्रज्ञ तसेच कारागीरांच्या सहाय्याने हा महाप्रकल्प साकार केला आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्प हा सन १९५६ ते १९६२ या काळात मुख्यत्वे जलविद्युत निर्मितीसाठी बांधण्यात आला. कायेना धरणांची सध्याची पाणी साठविण्याची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या प्रकल्पातून सध्या टप्पा १ ते४ मधून व धरण पायथा विद्युतगृहातून अशी एकूण १९६० मे.वॅ. वीज निर्मिती करण्यात येते.
कोयना टप्पा १ हा १९६२ मध्ये व टप्पा २ हा १९६७ मध्ये व टप्पा ३ हा १९७५ साली कार्यान्वित करण्यात आला. त्यांनतर १९८५ च्या दरम्यान कोयना प्रकल्पाचा राज्यातील एकूण वीजनिर्मितीसाठी पिकींग स्टेशन म्हणून वापर करण्याचे ठरविण्यात आले व त्यासाठी टप्पा १ व २ ला समांतर अशा १००० मे. वॅट क्षमतेच्या टप्पा ४ चे नियोजन करण्यात आले व सन १९९९ साली टप्पा ४ कार्यान्वित करण्यात आला.
अधिजल भुयार विस्तारीकरणाची आवश्यकता
टप्पा ४ चे नियोजन करताना नियोजनावेळी असलेला कोयना धरणातील पाणी वापर व प्रकल्प लवकर पूर्ण होण्याची गरज लक्षात घेण्यात आली. त्यानुसार टप्पा ४ ची न्यूनतम पातळी के.आर.एल ६३० मीटर इतकी ठरविण्यात आली आणि जलप्रवेश बोगदा मुखाची पातळी ६१८ मीटर ठेवण्यात आली. यावेळी धरणाची एकूण साठवण क्षमता ९८.७८ टीएमसी एवढी होती व पूर्वेकडील पाणीवापर २३ टीएमसी इतका होता.
१९९६ साली कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाल्यावर टेंभू, ताकारी म्हैसाळ इ. उपसा सिंचन योजना व अन्य योजना यासाठी कोयना धरणातून अतिरिक्त २० टीएमसी पाण्याची मागणी झाली. ही मागणी भागविण्यासाठी सन २००३ मध्ये कोयना धरणाच्या सांडव्याच्या दारांना ५ फुटी झडपा लावून धरणाची संचय पातळी ५ फूटांनी वाढवून ६.४७ टीएमसी पाणीसाठा वाढविण्यात आला. यामुळे कोयना धरणाची एकूण साठवण १०५.२५ टीएमसी झाली. उर्वरित १४ टीएमसी पाणीवापर हा ६३० मीटरचे खालील पाणीसाठ्यातून पुरविणे क्रमप्राप्त ठरले.
यामुळेच टप्पा ४ ची वीजनिर्मितीसाठी न्यूनतम पातळी ६१८ मीटर इतकी ठरविण्यात आली. पर्यायाने जलप्रवेश बोगद्याच्या मुखाची पातळी ६०६ मीटर इतकी करणे आवश्यक झाले. यासाठी अर्थातच टप्पा ४ च्या मूळ अधिजलभुयाराचे योग्य ठिकाणावरुन विस्तारीकरण करुन बोगदा ६०६ मीटर खोलीला पोचेल अशी मांडणी करण्यात आली आणि २००१ साली टप्पा ४ च्या विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात आले. यात सध्या वापरात असलेल्या टप्पा ४ च्या ४२२५ मीटर लांबीच्या व ९.५ मीटर व्यासाच्या अधिजल भुयाराची लांबी आणखी ४५०० मीटरने वाढवून मुख्य नदीपत्राकडे नेण्यात आली.
जलाशय छेद प्रक्रियेतील अंतिम कामे
जुने व नवीन विस्तारीत अधिजल भुयार जोडल्यानंतर जलाशय छेदप्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. व त्यासाठीची कामे ऑगस्ट २०११ पासून सुरु करण्यात आली. या प्रक्रियेतील काही महत्त्वाची कामे अशी -
• सर्वप्रथम इनटेक स्ट्रक्चर येथील सेवा द्वारे, आपत्कालीन द्वारे यांची उभारणी करुन घेण्यात आली.
• काम सुरु असताना उद्भवणारी आपत्कालीन स्थिती जशी पाणी गळती, वीजपुरवठा बंद पडणे इत्यादीसाठी पाणी उपसा करणारे पंप,डिझेल जनरेटर्स यांची उभारणी करण्यात आली.
• भुयाराच्या मुखाशी असणाऱ्या खडकाच्या प्लगची जाडी सरासरी ४.५ ते ५.५ मीटर इतकी नियंत्रित विस्फोटांव्दारे तासण्यात आली.
• खडकाच्या प्लगची नेमकी जाडी व खडकाचे सामर्थ्य व स्वरुप, आरपार विंधन विवरे घेऊन निश्चित करण्यात आले.
• खडकाच्या प्लगचे, ग्राऊटींग, शॉटक्रिटच्या साहाय्याने मजबुतीकरण करण्यात आले आणि प्लग भोवतीच्या खडकाचे रॉकबोल्टींगच्या सहाय्याने स्थिरीकरण करण्यात आले.
• आरपार विंधनाच्या साहाय्याने मिळालेल्या माहितीच्याआधारे अंतिम विस्फोटाचे संकल्पन करण्यात आले. यात दोन्ही (डाव्या व उजव्या) खडकाच्या प्लगमध्ये ५१ मी.मी. व्यासाचे प्रत्येकी ११० होल व ८९ मी.मी व्यासाचे प्रत्येकी ९ होल घेण्यात आले.
• अंतिम विस्फोटासाठी Bonogel NSP-७११ हे पाण्याखाली स्फोट घडवू शकणारे विशिष्ट दर्जाचे प्लॅस्टीक विस्फोटक व डिटोनेटर्स वापरण्यात येणार असून त्याचे नियंत्रण वायरच्या साहाय्याने जमिनीवर सुरक्षित ठिकाणी आणण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण भुयाराची तपासणी करुन तेथे कोणी व्यक्ती अथवा अनावश्यक वस्तू नाही याची खात्री करुन आपत्कालीन दरवाजे बंद करुन इनटेक टनेल पाण्याच्या सहाय्याने भरुन घेण्यास सुरुवात केली जाईल.
• इनटेक टनेलमध्ये भरलेले पाणी एका विशिष्ट पातळीला आल्यावर व विस्फोटाच्या ठिकाणी हवेचा संकल्पित दाब निर्माण झाल्यावर जमिनी वरुन सुरक्षित ठिकाणाहून कळ दाबून दोन्ही प्लगमध्ये विस्फोट केला जाईल.
• विस्फोटानंतर खडकाचा भुगा मकपिटमध्ये जमा होईल व पाणी शांत झाल्यावर आपत्कालीन व्दारे उघडली जातील व नंतर विस्तारित अधिजल भुयारातून टप्पा-४ कडे जलाशयातील पाणी वाहू लागेल.
कोयना जलविद्युत प्रकल्पातील विनाव्यत्यय वीजनिर्मितीला उपयुक्त ठरणारे हे दुसरे 'लेक टॅपिंग' उच्चतम तंत्रज्ञानाचे दमदार पाउल असून येत्या २५ एप्रिल रोजी मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्रीमहोदय व अन्य मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत राष्ट्राला अर्पण केले जात आहे. ही महाराष्ट्राच्या दृष्टिने खरोखरच अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे.
No comments:
Post a Comment