बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील वाघजई हे सुमारे ८५० लोकवस्तीचे गाव. गावात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक. आता गावागावात बचतगटाची चळवळ गतिमान होत आहे. त्यामुळे या गावातही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना विस्तार अधिकारी जी.एम.पोफळे यांनी मागदर्शन करुन बचतगट स्थापन करण्यास प्रोत्साहीत केले. संत रोहिदास महिला बचतगट हा त्यापैकीच एक आहे.
या गटाची स्थापना १० मे २००९ रोजी झाली. दरमहा प्रत्येक सदस्याने १०० रुपये प्रमाणे बचतीला सुरुवात केली. पदरमोड करुन पै-पै जमविणाऱ्या या १० महिला सदस्यांच्या बचतीच्या सवयीमुळे किन्हीराजा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने सन २०१० मध्ये त्यांना २० हजार रुपये कर्ज दिले. या रकमेतून या महिलांनी खवा विक्रीला सुरुवात केली. विशेष म्हणजे या परिसरातीलच गावांमध्ये रोज एका सदस्याने खवा विक्रीसाठी नेण्याचा उपक्रम सुरु केला. सर्वांच्या प्रामाणिकपणामुळे हा व्यवसाय त्यांनी २० हजारांवरुन ३५ हजारांपर्यंत वाढविला.
संत रोहिदास महिला बचतगटातील सदस्यांच्या जिद्द व चिकाटीची दखल घेत बँकेने ऑगस्ट २०११ मध्ये १ लाख २५ हजार रुपयांच्या कर्जाचा पहिला हप्ता मंजूर केला. या मोठ्या रकमेमुळे बचतगटाला आर्थिक विकासाची दिशा गवसली. जाफराबादी, मुऱ्हा, गावरान अशा प्रकारच्या सात दुधाळ म्हशीची खरेदी महिलांनी केली. ग्रामीण भागातील या महिला व्यवहारात कुठे फसू नयेत, त्यांच्या बचतगटाला तोटा सहन करण्याची वेळ येऊ नये यासाठी या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुखदेवराव झोटे आणि बाबूराव सानप निस्वार्थपणे मागदर्शन करीत असल्याचे बचतगटाच्या सचिव तथा गावच्या उपसरपंच शकुंतला भास्कर बोराडे यांनी सांगितले.
या बचतगटाने खरेदी केलेल्या सात म्हशीपासून दररोज ७० लिटर दूध मिळू लागले आणि प्रत्येक म्हशीच्या दुधापासून दोन ते अडीच किलो या प्रमाणे सुमारे १५ किलोचे खव्याचे दररोज उत्पादन होऊ लागले. २०११ च्या दिवाळीमध्ये खव्याची मागणी वाढली. साधारणत: दोनशे पन्नास रुपये किलो दराने खवा विक्री सुरु झाली. दूध आणि खवा विक्रीमुळे आमच्या बचतगटावर लक्ष्मी प्रसन्न झाल्याचे दिसून आल्याचे गटातील सदस्यांचे म्हणणे आहे.
म्हशीची निगा कशी राखावी, दुधामधे वाढ करण्यासाठी म्हशींना काय आहार द्यावा याबाबत पशूधन अधिकारी डॉ.उदार यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे सदस्य सांगतात. त्यानुसार प्रत्येक म्हशीला दररोज पाच किलो सरकी ढेप, १५ किलो हिरवा चारा, ७ ते ८ किलो कडबा कुटार असा आहार दिला. त्यामुळे प्रत्येक म्हशीपासून १४ ते १५ लिटर दूध मिळू लागले. दररोज सुमारे १०० लिटर दुधाच्या उत्पादनामुळे दर आठवड्याला १० हजार रुपयांची आवक सुरु झाली. या दुग्धोत्पादनामुळे खवा, पेढा, तूप, दही असे विविध दुग्धजन्य पदार्थ गावानजिक दुसरबीड शहरातील स्वीटमार्ट व हॉटेलमध्ये पाठविले जाऊ लागले. उत्पन्न वाढल्याने बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यात आली.
बचतगटाची कर्ज परतफेडीची वृत्ती बँकेने स्वागतार्ह मानली व लगेच १ लाख २५ हजार रुपयांचा कर्जाचा दुसरा हप्ता मंजूर केला. त्यामुळे या महिला बचतगटांच्या सदस्यांचा उत्साह अजून वाढला. दुग्ध व्यवसायामुळे सर्व महिला सदस्यांजवळ पैसा खेळू लागला आणि त्यांची रोजमजूरीतून मुक्तता झाली. आमचे कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर येण्यास ही बचतगटाची चळवळच प्रेरणादायी ठरत आहे, असेही या बचतगटांच्या महिला अभिमानाने सांगतात.
हा महिला बचतगट आर्थिक विकास तर साधतच आहे मात्र सामाजिक समस्यांची जाणीवही या महिलांना आहे. या बचतगटाच्या सचिव तथा उपसरपंच असलेल्या शकुंतला बोराडे व महिला सदस्या ग्रामस्वच्छता अभियानात, तंटामुक्ती अभियानात, राष्ट्रीय उत्सवात हिरिरीने सहभागी होतात. लेक वाचवा या अभियानाच्या माध्यमातूनही जनजागृतीचे मोठे कार्य ह्या महिला करीत आहेत. या महिला बचतगटांचा बुलढाणा येथे जिल्हास्तरावर मॉ जिजाऊ या प्रथम पुरस्काराने गौरव करण्यात आला इतकेच नव्हे तर अमरावती येथे सायंस्कोर मैदानावर नुकत्याच संपन्न झालेल्या विकास गंगोत्री या विभागस्तरीय प्रदर्शनीत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment