वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यापासून १७ कि.मी.
अंतरावर असलेल्या गिरड या गावामध्ये अर्चना गणवीर राहतात. त्यांचा जन्म
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचा. भावडांमध्ये त्या सर्वात लहान.
घरच्या आर्थिक परिस्थितीचा कणा मोडलेला. वडील व्यसनाच्या आहारी गेल्याने
कुटुंबाचा संपूर्ण भार आईवर होता. आई घरी शिवणकाम करून संसार चालवायची.
अर्चना सातव्या वर्गात असल्यापासून आईच्या कामात मदत करता करता शिवणकाम
शिकल्या आणि पुढे ग्रॅज्युएटही झाल्या. घरच्या लोकांनी त्यांचे लग्न
उमरेड तालुक्यातील एका नोकरी असलेल्या मुलाशी करुन दिले, पण संसार तग धरू
शकला नाही. आईला मदत करताना घेतलेले शिक्षणानेच आज त्यांचे आयुष्य तारून
गेले आहे.
अर्चना आपली कहाणी सांगतात, मी संरारात अनेक अडचणी
सोसल्या. पण नंतर ठरवले, आजच्या दुःखात उद्याचा आनंद कुणालाही उजळू देणार
नाही, त्यामुळे माझ्या चांगल्या आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी मलाच कंबर
कसावी लागेल. माणूस म्हणून चांगले जीवन जगण्याचा मलाही अधिकार आहे. शेवटी
मी माहेरी आले. परंतु तिथल्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर ओझे बनून मला
तिथेही राहणे शक्य नव्हते. शेवटी मी माहेरही सोडले आणि गिरडला एका
संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली.
माझ्याकडे शिवणकामाचे
चांगले कौशल्य होते, मनाशी निर्धार व स्वतःवर विश्वास होता. या
संस्थेतले काम संपवून मी घरी कपडे शिवण्यास सुरुवात केली. पैसे गोळा
व्हायला लागले. दुर्देवाने संस्था बंद पडली. पण माझा शिवणकाम व्यवसाय
चांगला चालत होता. एकटी बाई म्हणून मला इथेही त्रास सहन करावा लागला पण मी
आपल्या मनाशी खंबीर होते. त्यातून स्वतःचा टिकाव करून काम करीत राहिले.
स्वत:चे
काम करीत असताना बरेचदा बचतगटांविषयी ऐकून माहित होते. त्यामुळे मला
बचतगटामध्ये सहभागी व्हायची इच्छा होती. माविम सहयोगिनी ताईच्या
माध्यमातून ही संधी मिळाली आणि मी आम्रपाली महिला बचतगटाची सदस्य झाले.
या माध्यमातून मला माझ्या शिवणकलेच्या अनुषंगाने संधी उपलब्ध होत गेली.
पुढे मी पार्लरचा कोर्सही केला. आता मी गावामध्ये केंद्र सरकार मान्य
शिवणकला डिप्लोमा व पार्लरचा डिप्लोमा कोर्स चालविते. माझ्याकडे गरीब
गरजू मुली शिकायला येतात. माझ्या आयुष्यात अनेक चांगल्या वाईट प्रसंगांचा
मी अनुभव घेतला असल्याने त्या मुलींना मानसिक, आर्थिक आधार देण्याचे काम
मी करीत आहे. मी शिकविलेल्या काही मुलींचे शिवणकामाचे व्यवसाय आता सुरू
झालेले आहेत, ते पाहून मनाला खूप समाधान मिळते. आईची मदत करताना माझ्याकडे
आलेल्या कौशल्यामुळे आणि बचतगटाच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीमुळे
आयुष्यात अनेक दु:ख झेलून देखील आज मी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहे.
आता
माझे पुन्हा लग्न झाले आहे. माझे यापूर्वी लग्न झालेले आहे हे माहीत असून
सुद्धा माझ्यातले गुण, स्वभाव, साहसीवृत्ती बघून एका मुलाने माझ्याशी
लग्न करण्याची तयारी दर्शविली. संसार करण्यासाठी मला मिळालेली आणखी एक संधी
मानून मीही या लग्नास तयार झाले. आता मला एक मुलगी असून मी अतिशय समाधानी
आणि आनंदी जीवन जगत आहे.
No comments:
Post a Comment