'आपत्तीमे कॉऑर्डीनेशन और रोल आयडेन्टीफाय करना सबसे
महत्वपूर्ण बात है, यदी पुरी जानकारी रखी जाए तो आसानीसे ऐसे डिझास्टरका हम
मुकाबला कर सकते है'...एनडीआरएफचे असिस्टंट कमांडंट एस.ए.अहमद
प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगत होते. मंचाच्या बाजूला
विविध प्रकारचे साहित्य टेबलवर ठेवले होते. त्यातील बहुतेक साहित्याविषयी
जाणून घेण्याची उत्सुकता प्रशिक्षणार्थींमध्ये होती.
...रत्नागिरी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील अल्पबचत सभागृहात शोध व सुटका पथक
आणि प्रथमोपचार पथकातील सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या तळेगाव युनिटतर्फे हे प्रशिक्षण
देण्यात येणार होते. एनडीआरएफच्या ३५ जवानांचे सुसज्ज पथक त्यासाठी दोन
वाहनांसह उपस्थित झाले होते. पोलीस, गृहरक्षक दल, महसूल कर्मचारी, आरोग्य
विभाग, महावितरण आदी विविध विभागातील प्रशिक्षणार्थी सभागृहात दाखल झाले
होते.
... राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अस्तित्वात
आल्यानंतर एनडीएमएच्या नियंत्रणाखाली एनडीआरएफची स्थापना करणे अनिवार्य
झाले. त्यानुसार महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफची टीम कार्य
करते. देशभरात ग्रेटर नोएडा, भटींडा, कोलकाता, गौहाटी, मुन्दली(ओरीसा),
अराक्कोणम् (तामिळनाडू), पुणे, गांधीनगर, पटणा आणि गुंटूर (आंध्रप्रदेश) या
दहा ठिकाणी या संस्थेची प्रत्येकी एक बटालियन तैनात करण्यात आली आहे.
प्रत्येक
बटालियनमध्ये ११४९ प्रशिक्षित जवानांचा समावेश असतो. त्यात आपत्तीचा सामना
करण्यासाठी ४५ जवानांची सर्व साहित्यांनी सुसज्ज टीम तयार करण्यात येते.
दोन टीम्स 'ऑन व्हील्स' (२४ तास तयार) असतात. पुणे परिसरातील तळेगाव येथे
महाराष्ट्रातील टीमचे तळ आहे. आपत्तीच्या वेळी मदतीसाठी धावून जाण्याबरोबरच
आपत्तीविषयी जनजागृती आणि प्रत्येकाला शोध व सुटकेचे प्रशिक्षण देण्याचे
कार्य या टीम्स जागोजागी जाऊन करीत असतात. टीमच्या सदस्यांची पार्श्वभूमी
विज्ञान शाखेची असते, अशी माहिती असि.कमांडंट अहमद यांनी दिली. मेडिकल
फर्स्ट रिस्पॉन्स (एमएफआर), कोलॅप्स स्ट्रक्चर सर्च ऍ़ण्ड रेस्क्यु
(सीएसएसआर), केमिकल, बायोलॉजिकल, रेडीओलॉजिकल ऍ़ण्ड न्यूक्लिअर इमर्जन्सी
अशा विविध विषयांमध्ये प्रत्येक जवान निष्णात असतो. यातील सर्व उत्तम
जलतरणपटू असतात तर काही 'डीप स्विमर्स' असतात. हेलीस्लेदरींगद्वारे बचाव
कार्य करण्याचे प्रशिक्षणही या जवानांनी घेतलेले असते. त्यामुळे प्रत्येक
प्रकारच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी हे सक्षम असतात...
...प्रशिक्षणाच्या
सुरुवातीला नैसर्गिक आपत्तीच्यावेळी बचाव कार्यात हृदयक्रिया बंद झालेल्या
नागरिकांचे प्राण कसे वाचवावे, या प्रात्यक्षिकापासून झाली. त्यानंतर
रक्तस्त्राव रोखण्याचे तंत्र, पूर परिस्थितीचा मुकाबला करण्याचे तंत्र आदी
विविध विषय प्रशिक्षणादरम्यान हाताळण्यात आले. पूराच्या वेळी प्लास्टीकच्या
रिकाम्या बाटल्यांचा बचावासाठी उपयोग करण्यासारख्या काही कल्पना भन्नाटच
होत्या. आपत्तीच्या वेळी आपले सर्वस्व गमावलेल्या नागरिकांची 'सायकोसोशल
केअर' हा विषय माझ्यासह सर्वांसाठीच नवा असावा.
प्रशिक्षणाच्या
माध्यमातून समाजातील एक जबाबदार घटक निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न
एनडीआरएफचा असल्याचे जाणवले. त्सुनामीच्या वेळी देशाचे प्रतिनिधीत्व
करणाऱ्या एनडीआरएफच्या टीमने जपानमध्ये केलेल्या अभिमानास्पद कामगिरीची
माहितीदेखील अहमद यांचेशी चर्चा करताना मिळाली. केवळ शारिरीक किंवा
यांत्रिक बळाचा वापर न करता योग्य संवाद प्रणाली आणि माहितीचा वापर करून
आपत्तीकाळात चांगला प्रतिसाद देता येतो हेच आजच्या प्रशिक्षणाने सिद्ध
केले. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे माहिती घेऊन सज्ज राहण्याचा मंत्र या
टीमने उपस्थितांना दिला.
डॉ.किरण मोघे
No comments:
Post a Comment