Tuesday, April 10, 2012

सुनील राजगुरू यांचा मत्स्य व्यवसाय

पारंपरिक शेती सध्या न परवडणारी झाल्याने शेतीस पूरक व्यवसाय म्हणून मासे पालनाचा व्यवसाय सोलापूर जिल्ह्याच्या माढ्यातील प्रगतशील तरुण शेतकरी सुनील प्रल्हाद राजगुरू यांनी सुरू केला आहे.

सुनील राजगुरू हे शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित तरुण. आई शिक्षण खात्यात, तर वडील आरोग्य खात्यात नोकरीस. वडिलोपार्जित चाळीस एकर जमीन असताना पारंपरिक पिकांमुळे मात्र शेती तोट्याची ठरत होती. त्यामुळे पारंपरिक शेतीस फाटा देऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळलेल्या सुनील यांनी आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवस रेशीम उद्योग आणि ससे पालनाचा व्यवसाय केला.

राजगुरू यांच्या शेतात बोअर आहे. या बोअरचे पाणी साठविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामुदायिक शेततळे योजनेतून त्यांनी ३४ बाय ३४ बाय १० मीटरचे शेततळे तयार केले. काही दिवसांनंतर या तळ्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी शासकीय अनुदानासह स्वत:कडील दीड लाख रुपये खर्च करून त्यांनी ३८ बाय ४५ बाय १० मीटरचे तळे तयार केले. या तळ्यातील पाण्याचा शेतीसाठी चांगला उपयोग होऊ लागला आहे.

या तळ्यातील पाण्यावर त्यांनी केशर, हापूस, पायरी, रत्ना या जातीच्या आंब्याची तसेच पाच एकर जागेमध्ये जांभूळ, नारळ यांचीही बाग लावली. या पाण्यावर फळबागांची निगा राखत असतानाच दोन एकर ऊसही चांगल्या पद्धतीने जोपासला.

तळ्यातील पाणी जसे शेतीसाठी उपयोगी ठरू लागले तसे या पाण्याच्याच साहाय्याने शेती पूरक व्यवसाय म्हणून राजगुरू यांनी मासेपालनाचा व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांनी 'कटला व सायफरनेसिया' या जातीच्या माशांची पाच हजार अंडी या पाण्यात सोडली. या दोन जातीच्या माशात सायफरनेस मासा तळाला राहतो तर कटला जातीचा मासा पाण्याच्या वरच्या थरात राहतो. त्यामुळे दोन्ही जातींच्या माशांना समान खाद्य मिळते. सध्या माढा भागात माशांसाठीचे खाद्य बाजारपेठेत उपलब्ध नसल्याने मक्याचा भरडा, तांदूळ, शेंगापेंड व शेण असे खाद्य माशांना टाकले जाते. अवघ्या सहा महिन्यात या माशांची अर्धा ते पाऊण किलोपर्यंत वाढ झाली असून त्यांची स्थानिक बाजारपेठेत विक्री होत आहे. इंदापूर, सोलापूर येथे या माशांसाठी ठोक बाजारपेठही उपलब्ध असल्याने राजगुरू त्या बाजारपेठेतही मासे पाठवित आहेत.

माशांची प्रजनन क्षमता वाढल्याने आता पाण्यात नवीन अंडीपुंज सोडण्याची गरज राहिलेली नाही. वरचेवर माशांची निर्मिती वाढत असल्याने मासे पालनाचा हा व्यवसाय दीर्घकाळ चालणारा आणि फायदेशीर ठरत आहे.

विविध शेतीपूरक व्यवसायातून प्रगती साधणाऱ्या राजगुरू यांच्या मासेपालन व्यवसायाची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातून अनेक शेतकरी माढा येथे येत आहेत. यानिमित्ताने राजगुरू आर्थिक प्रगती साधण्याबरोबरच इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक देखील ठरू लागले आहेत.


  • फारुक बागवान

  • No comments:

    Post a Comment