वाजेवाडी इथं तारळी नदीच्या काठावर खोत कुटुंबियांची शेतीवाडी आहे. पाच भावांचं एकत्र कुटुंब, त्यात शंकरराव सर्वात धाकटे. पाचही भावांना शेतीतील तांत्रिक बाबींचे परिपूर्ण ज्ञान असल्याने त्यांच्या या ज्ञानाचा चांगल्या प्रकारे शेती करण्यासाठी उपयोग झाला. १९९०-९१ च्या सुमारास बारामती येथील कृषीभूषण अप्पासाहेब पवार यांची झालेली भेट शंकररावांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. उपलब्ध जमीन, पाणी आणि मनुष्यबळाचे सुयोग्य नियोजन करुन निर्धारपूर्वक भूमातेच्या सेवेला लागण्याचा निर्णय त्यांनी अप्पासाहेबांच्या सल्ल्यानुसार घेतला.
शेतीतून सोने पिकविण्याच्या निर्धाराने शंकररावांनी नियोजन केले. संपूर्ण लक्ष शेतीवर केंद्रित करून अनेक प्रयोग केले. ऊस, भात चांगल्या पद्धतीने कसे घेता येतील, याचा विचार केला. माती परीक्षण करुन खताच्या मात्रा द्यायचे ठरवले. पीक चांगले घेण्यापेक्षा आधी माती सशक्त करण्यावर त्यांनी भर दिला आणि यात त्यांना यशही लाभले.
वाजेवाडी परिसरात प्रामुख्याने आल्याचे पीक घेतले जायचे, पण ते पारंपरिक पद्धतीनेच. आल्याच्या उत्पादनाच्या पद्धतीत मूलगामी सुधारणा करण्याचे, आधुनिकता आणण्याचे त्यांनी ठरविले. चांगले बियाणे, शेणखत, रासायनिक खत आणि नियोजनबद्ध आंतरपीके कशी घेता येतील याचा अभ्यास करुन सातारी, माहीम, उदयपूर या जातींच्या आल्याचे उत्पादन घ्यायला त्यांनी सुरूवात केली. जमीन भुसभुशीत केल्यानंतर उन्हात चांगली तापवून लागणीपूर्वी रासायनिक खतांची अर्धी मात्रा दिली जाते. नंतर आल्यासाठी बेड (वाफे) तयार केले जातात. साधारणत: एका गुंठ्यासाठी ३० किलो बियाणे वापरले जाते. तुषार सिंचन यंत्रणा संपूर्ण क्षेत्रात बसवून कमीत कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेण्याची क्रांती खोत यांनी घडविली आहे. जमिनीच्या एकाच क्षेत्रातून, नीट नियोजन केल्यास, किती आणि कसे उत्पादन घेता येते, याचा परीपाठच खोत यांनी अन्य शेतकऱ्यांना घालून दिला आहे.
आंतरपिकांचा प्रभावीपणे वापर केल्यास एकात्मिक कीड-रोग नियंत्रणासोबत उत्पादनही चांगले मिळते. ज्या खड्ड्यात आले पेरले त्यातच शेणखत घालून धनेही पेरले. १२ दिवसानंतर गांडूळ खत, राख, भातचे तूस, ट्रायकोडर्मा, पी.एस.बी., बायोला यांचे मिश्रण एकरी दोन टन याप्रमाणे दिले. सुमारे ३५ दिवसांत कोथिंबीर काढून विकली. त्यातून प्रति गुंठा सुमारे एक हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले. त्याचबरोबर कोथिंबीर काढल्यानंतर जागा भुसभुशीत झाल्याने आल्याची उगवण चांगली होऊ शकली. नंतर तिसाव्या दिवशी आल्याच्या क्षेत्राभोवती कुंपण करुन दोडका व कारली बी पेरले आणि मध्ये मिरचीचे रोप लावले. चाळीसाव्या दिवशी आल्याच्या वाफ्याला लागूनच झेंडूची पाचशे झाडे लावली. आवश्यकतेनुसार बुरशीनाशकाच्या व कीटकनाशकांच्या फवारण्याही केल्या. दोडका, कारली आणि झेंडूच्या फुलांची तोड सुरु होतानाच २७० ते २८० दिवसांच्या दरम्यान सरीत पपईची लागवड केली. त्याच वेळी आल्यावर पाचटाचे आच्छादन केले आणि बेडच्या बाजूने स्वीटकॉर्नची (मधूमका) लागवड केली.
आंतरपिकांची नवी पद्धत शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. इतकी सारी पीके एकाच रानात घेऊन अधिक उत्पादन घेण्याचा हेतू असला तरी तो दुय्यम ठेवून आल्याचे पीक, निरोगी व सशक्त व्हावे त्यावर कीड- रोग येऊ नये, हा मुख्य हेतू जोपासल्याचे खोत म्हणाले. कोथिंबिरीने सावली वाढते. उन्हाचा आघात ती सहन करते. आल्याला बाधा होत नाही. झेंडूची फुले पिवळी असल्याने आल्याचा शत्रू असणारी कंदमाशी त्याकडे आकर्षिली जाते. आल्यावर तिचा हल्ला कमी होतो. मिरचीचा बुरशीनाशक म्हणून उपयोग होतो. दोडके व कारल्याच्या वेलांच्या कुंपनामुळे हवेतून वाहून येणाऱ्या बुरशीचा हल्ला थोपवला जातो. शिवाय त्यांची फुलेही कंदमाशांना काही प्रमाणात आकर्षित करतात. पपईमुळे जमिनीतील जीवाणूंचे प्रमाण वाढते आणि आल्याला सावली म्हणून चांगला उपयोग होतो. स्वीटकॉर्नमुळे पाण्याचे नियंत्रण होते. वाऱ्याचा झोत अडविला जातो.
दीड एकर क्षेत्रातील खर्च व उत्पन्नाचे गणित मांडताना खोत म्हणाले, या क्षेत्रासाठी सर्व प्रकारचे बियाणे ४५ हजार रुपये, पाणी व्यवस्थापन २० हजार, खते कीटकनाशके, जैविक खते व इतर खर्च ७० हजार आणि मजूरी, मशागत आणि इतर खर्च सुमारे ५० हजार रुपये असा एकूण सुमारे एक लाख ८५ हजार रुपये खर्च आला. त्यातून सुमारे नऊ लाख ८१ हजार २०० रुपये उत्पन्न मिळाले. एका गुंठ्यात आल्याचे साधारण ५०० ते ५५० किलो उत्पादन काढले जाते. खोत यांनी आंतरपिकाबरोबरच काही क्षेत्रात पट्टा पद्धतीने ऊस लागवड केली आहे. याद्वारे एकरी साधारण ५० टन उत्पादन ते घेतात.
शेतीक्षेत्रात आंतरपीके घेऊन शेती लाभदायी बनविण्याची क्रांती वाजेवाडीच्या शंकरराव खोत यांनी घडविली आहे. काळ्याआईची सेवा करुन संपूर्ण तरुणाई सातत्याने नवनवे प्रयोग करण्यात घालविली. मात्र या साऱ्याचं मनस्वी समाधान मिळत असून आज हजारो शेतकरी खोत यांची शेती आणि पीकपद्धती पाहण्यास येत आहेत. शंकरराव खोत यांना शेतीक्षेत्रातील आधुनिक वाल्मिकी म्हटले तर वावगे ठरणार नाही. खोत यांना या आधुनिक शेतीपद्धतीसाठी शासनाकडून जिल्हा, विभाग आणि राज्यपातळीवरील पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment