Wednesday, April 18, 2012

बुलडाणा जिल्हा परिषद ऑनलाईन

जिल्हा परिषद म्हणजे कुठल्याही जिल्ह्यासाठी मिनीमंत्रालयच, संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची वाट याच ठिकाणाहून जाते. राजकीय नेतृत्व घडविण्याचे काम जिल्हा परिषद करते. सध्या बुलडाणा जिल्हा परिषदेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु आहे. याच अनुषंगाने बुलडाणा जिल्हा परिषद आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोचण्याचा मार्ग उघडला असून www.zpbuldana.org या नावाने संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वात मोठी संस्था म्हणून जिल्हा परिषद ओळखली जाते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक दोन नव्हे तर १४ प्रकारची खाती जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असतात. यात कृषी, आरोग्य, सामान्य प्रशासन, शिक्षण प्राथमिक, ग्रामपंचायत, वित्त, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, बांधकाम, सिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण (माध्यमिक), शिक्षण निरंतर, भूजल सर्वेक्षण या विभागांचा समावेश असतो. या सर्व विभागांचे कामकाज, त्या-त्या विभागाअंतर्गत असलेल्या योजना, सर्वसामान्यांना दिल्याजाणारा लाभ याविषयीची माहिती आता इंटरनेटवर उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील गावात राहणाऱ्या व्यक्तीला या माध्यमातून माहिती घेता येईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.के. ठुबे, प्रकल्प संचालक संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनात व वेळोवेळी केलेल्या सूचनानंतर सामान्य प्रशासन विभागाने ही वेबसाइट तयार केली आहे.

काही दिवसांपूर्वीच हे संकेतस्थळ कार्यान्वित झाले असून त्यामध्ये विविध प्रकारची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे विविध विभाग, पंचायत समित्या, खातेप्रमुखांची, पदाधिकाऱ्यांची माहिती तसेच माहितीचा अधिकारही देण्यात आला आहे. सोबतच जिल्ह्याचे वैभव असलेल्या संत महात्म्यांची, थोरपुरुषांची, वनसंपदेची छायाचित्रे, जिल्ह्याचे विविध नकाशे उपलब्ध आहेत. जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वीच चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता इमारतीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे चित्र नोंदविले जात असून कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे. शिवाय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कॅबिनसमोरील पोर्च, त्यांचा कक्ष, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कक्ष अशा तीन ठिकाणी हे कॅमेरे कार्यान्वित झालेले आहेत. जिल्हा परिषदेचा अत्यंत महत्वाचा भाग असलेला सामान्य प्रशासन विभाग तर संपूर्ण संगणकीकृत बनविण्यात आला आहे. प्रत्येक टेबलवर संगणक आला असून लवकरच हे संगणक ऑनलाईन होतील, यामुळे डाटा एकमेकांशी शेअर करता येईल. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी भविष्यात या साइटवर आणखी माहिती टाकण्याचे नियोजन आहे.

सर्व विभाग प्रमुखांना अंतर्गत संवाद साधण्यासाठी सेन्ट्रेक्स यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. यापूर्वी आयएसओचे प्रमाणपत्र मिळालेले असून त्यानंतर एकूणच जिल्हा परिषदेची ही वाटचाल आता ई-गव्हर्नन्सच्या दिशेने सुरु झालेली आहे. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला माहिती उपलब्ध होऊन त्याव्दारे विकास साधल्या गेला तर उपक्रम आणखीच लाभदायी ठरतील, अशा प्रकारची आशा बाळगली जात आहे.

No comments:

Post a Comment