Wednesday, June 13, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ३३) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर समजून घेऊ...! काही समाजकंटकांनी त्यांच्या या आजाराचे भांडवल करून भैय्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला बदनाम करण्याचा प्रयत्‍न केला. भैय्यासाहेबांनी राजकीय स्वार्थाचा त्याग केला. धम्मकार्य केले तरीही काहींनी त्यांना बदनाम करण्याचे सोडले नाही.....!


यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचा जन्म माता रमाई यांच्या पोटी १२ डिसेंबर १९१२ रोजी झाला आहे. यशवंतरावांना लहानपणापासूनच न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलियोसारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले.त्यांचे लग्न १९ एप्रिल १९५३ रोजी मीराबाई सोबत झाले होते.भैय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वत:चे आयुष्य स्वत:चे घडविले त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला.त्यानंतर मुंबई विमानतळ परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता.यशवंतरावांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे बुध्दभूषण प्रिंटींग प्रेस असे नाव झाले.१९४४ पासून बाबासाहेबांच्या जनता प्रबुध्द भारत मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा Thoughts on Pakistan हा इंग्रजी ग्रंथ भय्यासाहेबांनीच छापला. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे Federation versus Freedom आणि Thoughts on Linguistic States हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले. त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार आणि भारतीय बौध्द महासभेच्या वतीने त्यांनी वा.गो.आपटे लिखित बौद्धपर्व’ हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.भैय्यासाहेबांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर.बाबासाहेबांची अनेक स्मारके त्यांनी उभारली आहेत.१ ले स्मारक त्यांनी मुंबई येथे बांधले. या डॉ.आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन दि.२-४-१९५८ला व उद्‌घाटन २२-६-१९५८ला झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले.चवदार तळे क्रांतीचे स्मारक म्हणून जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतिस्तंभ उभारण्यासाठीही यशवंतरावांनी पुढाकार घेतला. चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने दि.२०-३- १९५७ रोजी BMS(?)कडे ४० बाय ४० ची जागा मागितली BMS ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भैय्यासाहेबांनी घेतला.अखेर BMS improvement committee ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली. जोपर्यंत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन (शेकाफे) आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (RPI) हे एकसंघ होते तोपर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत फिरफिर फिरले १९६६ साली डॉ. बाबासाहेबांचा ७५ व वाढदिवस येत असल्यामुळे हा जन्मदिवसअमृत महोत्सव’ म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भय्यासाहेबांनी ठरविले. या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतीक म्हणून एक ‘भिमज्योत महु येथून मुंबईकडे आणण्यात आली.ही ज्योत महूहून इंदूर, भोपाळ, हुशंगाबाद, बैतूल, नागपूर, पुलगाव, औरंगाबाद, येवला, नाशिक, हरेगावनगर(?), संगमनेर, देहूरोड, पुणे, सातारा, वणी(?), पाचगणी, महाबळेश्वर, खेड, मंडणगड, दापोली, महाड, पेण, पनवेल, कल्याण, ठाणे, मुलुंड, राजगृहवरून दादरच्या चैत्यभूमीला आली. ह्या भीमज्योतीदरम्यान मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर भय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. ‘भारत बौद्धमय करीन’ हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भय्यासाहेबांनी काम सुरु केले. त्यांनी धम्मदीक्षेचे अनेक कार्यक्रम घेतले, धम्म परिषदा भरविल्या, धम्म मेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरू केला भय्यासाहेब आमदार असतांना त्यांनी विधानपरिषदेत नवबौद्धांच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली.भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रीलंका - थायलंड – म्यानमार – सारनाथ – दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या. खेड्यापाड्यातील बौध्द विहारांचे उद्‌घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्म परिषद भरविण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून दलाई लामा यांना बोलविण्यात आले. ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यात संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. बौद्ध जीवन संस्कार पाठ’ या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११ व्या धम्मचक्र पवर्तदिनी  भय्यासाहेबांनी स्वतः क्षामणेरची घेतली व त्या कालावधीत ते चैत्यभूमीतच राहत होते. त्यांचे नाव ‘महापंडित काश्यप’ असे ठेवण्यात आले होते. १९५९ मध्ये महास्थवीर संघरक्षित लंडनहून होते. त्यांनी भय्यासाहेबांची भेट घेतली होती. महापुरुषाच्या पोटी जन्म घेऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किती कठोर परिस्थितीचा सामना करावा लागतो याचा प्रत्यय भैय्यासाहेब आंबेडकरांना निश्चितच आला होता. नव्हे संपूर्ण आयुष्यात ते ओझे घेऊन जगावे लागले असावे. जगाने ज्या महानावाच्या क्रांतीचा, विचारांचा आणि बुद्धीचा गौरव केला तो महामानव व्यक्तिमत्त्वाच्या पडताळणीचा आधार बनत असेल. अश्या परिस्थितीत स्वतंत्र व्यक्तिमत्त्व कसे उभारायचे याचे दडपण निश्चितच भैय्यासाहेबांना होते. मोठ्या वृक्षाखाली पालव्या कोमेजून जातात तशीच परिस्थिती भैय्यासाहेबांवर ओढवली असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारस म्हणून किती दडपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला. याचा विचार करून भैय्यासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितले गेले नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडताना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्ये निर्माण होत गेली. त्यांचा स्वभाव तापट होता. पण तितकाच तो मृदूही होता. निश्चितच बाबासाहेबांना आपल्या मुलाकडूनही काही अपेक्षा होत्या. त्या लादलेल्या नसल्या तरी व्यावहारिकतेच्या परिप्रेक्षात परीस्थितिजन्य बदलाच्या होत्या. या अपेक्षांच्या दडपणामुळे बाबासाहेबांच्या तापटपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला असेल हे निश्चितच. त्यामुळे भैय्यासाहेबांच्या व्यक्तीमत्त्वावर त्याचाही प्रभाव जाणवायचा. भैय्यासाहेब कधीही प्रखर नव्हते. भैय्यासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक व्याधीमुळेसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करतांना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही. परंतु काही समाजकंटकांनी त्यांच्या या आजाराचे भांडवल करून भैय्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला बदनाम करण्याचा प्रयत्‍न केला.हजारो शोषित-पिडीत-मागास वर्गाच्या उत्थानासाठी जगतांना बाबासाहेबांनी कधी मुलांच्या आजाराकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी समाजासाठी दिलेल्या या बलिदानाचे बळी त्यांची इतर मुलेही ठरली. भैय्यासाहेब हे बाबासाहेबांचे एकमेव वारस होते जे जगले. हे दडपण पेलून धरतांना भैय्यासाहेबांनी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण केले. कदाचित ते असामान्य नसेलही परंतु शांत, चिंतनशील, सहनशील, वैचारिक असे गुणवैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वात निश्चितच होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडतांना त्यांच्या शांत व्यक्तिमत्त्वाचा निश्चितच लाभ झाला. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेचा त्यांच्या कार्यकाळात अनेक राज्यांमध्ये व्याप वाढू लागला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भैय्यासाहेब आंबेडकरांनी यासाठी कधी हट्ट धरला नाही. किंवा कुठलेही पद घेतले नाही. बाबासाहेबांचा राजकीय वारस म्हणून स्वतःला कधी समोर केले नाही. सदैव इतरांना पुढे करून त्यांना समर्थन देऊन स्वतः मात्र आयुष्यभर धम्माचे काम करीत राहिले. धम्म कार्यात स्वतःला वाहून घेतले. आजच्या आधुनिक पिढीला आणि जे स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेतात त्यांच्यासाठी भैय्यासाहेबांचे व्यक्तिमत्व आदर्श ठरावे असेच होते.(क्रमशा😊

No comments:

Post a Comment