Tuesday, September 13, 2011

संवर्धन वन्यप्राण्यांचे. . .

मेळघाटातील सिपना वन्यजीव विभागात वास्तव्यास असलेल्या रानगवे, सांबर, चितळ, निलगाय आदी तृणभक्षी प्राण्यांसाठी सुमारे ५० हेक्टर वनक्षेत्रात विविध प्रजातीच्या गवतांची लागवड केली आहे. प्राण्यांना वनक्षेत्रातच अन्नाची उपलब्धता व्हावी हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.

सिपना वन्यजीव विभागांतर्गत जरिदा, सेमाडोह, रायपूर, हातरु, चौराकुंड हे वनक्षेत्र अत्यंत समृध्द आणि वनाच्छादित असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तृणभक्षी प्राण्यांचा अधिवास या क्षेत्रात आहे. मेळघाटच्या उंचसखल तसेच पर्वत रांगामध्ये खाद्य शोधण्यासाठी या प्राण्यांना सहज सुलभ विविध प्रकारचे गवत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सुमारे ४० ते ५० हेक्टर क्षेत्रात गवतासह बाजरी, बरबटी, तूर आदीची लागवड केली आहे.

वनक्षेत्रामध्ये रायमुनिया या अखाद्य वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने वन्य प्राण्यांना आवश्यक असलेले गवत आदी खाद्यावर त्याचा परिणाम होत आहे. तसेच रायमुनिया या वनस्पतीची वाढही झपाट्याने या क्षेत्रात होत आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पांतर्गत असलेल्या सिपना वन्यजीव विभागाने रायमुनिया या अखाद्य वनस्पतीच्या उच्चाटनाचा महत्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला असून ज्या क्षेत्रात प्राण्यांचे वास्तव आहे, तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्‍धता आहे, अशा भागात गवताची लागवड करण्यात आली आहे.

वन क्षेत्रातील ज्या भागात वृक्ष घनता कमी आहे, अशा भागात ट्रॅक्टरने नांगरणी करुन ही जमिन सुपीक करुन गवताच्या प्रकाराची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दिनानाथ जातीच्या गवताची १० एकर क्षेत्रात, एमपीचारी जातीचे ५ हेक्टरमध्ये हे गवत लावण्यात आले आहे. तसेच स्टायलॉ, हेमॅटॉ हे गवत सुध्दा लावण्यात आले आहे. प्राण्यांना बाजरी, बरबटी, तूर आदी तृणभक्षी प्राण्यांसाठी खाद्य म्हणून लावण्यात आले आहे. अशा प्रकरचा उपक्रम राबविल्यामुळे वन्यप्राण्यांच्या वाढीला सहाय्य होत असल्याचे उपवनसंरक्षक मिलींद बडगे यांनी सांगितले.

वनक्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांसाठी गवताची लागवड करतांना वृक्ष घनता कमी असलेल्या व जेथे पाण्याची उपलब्धता आहे, अशा भागाची निवड करण्यात येत असून या क्षेत्रात २५ x २५ क्षेत्रात ही लागवड केली जाते. तसेच नवीन गवताचीही उगवणूक चांगल्‍या प्रकारे व्हावी, त्यासाठी आवश्यक काळजीही घेण्यात येते.

तृणभक्षी प्राण्यांसाठी समृध्द अधिवास क्षेत्र निर्माण व्हावे तसेच वनक्षेत्रही संरक्षित व्हावे यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एस.के. मिश्रा तसेच उप वनसंरक्षक मिलींद बडगे आणि या विभागातील सर्व वनक्षेत्र अधिकारी, वनपाल आदी कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील राहतात. वनांच्या संवर्धनासाठी स्थानिक जनतेकडून लोकसहभागाने वनांचे संरक्षण व्हावे. वन्यजीवांच्या संख्येतही वाढ व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असत्यामुळेच हे क्षेत्र एक समृध्द वनक्षेत्र म्हणून गणल्या जात आहे.

प्राण्यांच्या संख्येत वाढ 

सिपना वन्यजीव व्याघ्र प्रकल्पांतर्गत जरिदा, सेमाडोह, रायपूर, हातरु, चोराकुंड ही वनपरिक्षेत्र असून हा संपूर्ण भाग तृणभक्षी प्राण्यांसाठी नंदनवन समजला जातो. १ फेब्रुवारी, २०१० च्या प्राणी गणनेनुसार या क्षेत्रात ५ हजार ४५६ तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली. आहे. त्यामुळे या प्राण्यांच्या संवर्धनासाठी तसेच खाद्यान्न उपलब्ध करुन देण्यासाठी व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये प्राण्यांना वर्षभर पुरेल अशा गवताची निर्मिती हा प्रमुख उद्देश आहे.

तृणभक्षी प्राण्यांमध्ये झालेल्या प्रगणनेनुसार चितळ, सांभर, गवे, निलगाय, भेडकी, रानडुक्कर, माकड, वानर, मोर तसेच सशांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. सेमाडोह परिक्षेत्रात पर्यटकांसाठी निसर्ग निर्वाचन संकुलाची निर्मिती केल्यामुळे वन्यजीव अभ्यासक या क्षेत्राला नियमित भेटी देतात. तसेच सेमाडोह येथून वाहणारी सिपना नदी, कोलकास येथून या परिसराचे दिसणारे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. वनविभागातर्फे वन्यजीव तसेच वनांच्या संरक्षणासाठी विशेष परिश्रम घेण्यात येत असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश समृध्द वनक्षेत्र म्हणून गणला जात आहे. 

No comments:

Post a Comment