दुग्ध व्यवसाय हा आर्थिक प्रगतीसाठी कसा पोषक आहे यांचा प्रत्यय रमाई बचत गटाला आलेला आहे.
रमाई महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या रमाई स्वंयसहाय्य महिला बचत गटातील १२ महिलांनी दिनांक २३ जून२००४ रोजी एकत्रित येवून गटाला सुरुवात केली. प्रत्येक सदस्यांनी ३० रु. महिना याप्रमाणे ३६० रु. महिन्याप्रमाणे नियमित बचत सुरु केली. हळूहळू अल्पबचतीचे भांडवलामध्ये रुपांतर होवू लागले. बॅकेच्या मार्फत प्रथम: गटाचे ग्रेडेशन होवून त्यांना प्रथम कर्जापोटी रुपये ५० हजार उपलब्ध करुन दिले. त्यांनी ठरविल्यानुसार एकूण ७० हजार रुपयांच्या दोन गाई व दोन म्हशी खरेदी केल्या. बचत गटांच्या महिला मेहनती आहेत. या दुधाळू जनावरांची देखभाल ,शेण, काडीकचरा ,गोठा साफसफाई, कामे महिला स्वत:च करतात.
पुढे २००८-२००९ मध्ये भारतीय स्टेट बॅक चिखली द्वारे गटातील महिलांना लाभ देवून त्या गटाला २ लाख ५० हजार कर्ज बचत गटाला मिळाले. त्यामध्ये त्यांनी ८ म्हशी व २ गाई खरेदी केल्या. त्यांनी दुधापासून दही, चक्का,लोणी तयार करुन त्याच्या विक्रीतुनही त्यांना दररोज चारशे ते पाचशे रुपये मिळतात. एकंदरीत दरमहा ३० हजारांची उलाढाल बचत गटात होत असून प्रत्येक सभासदाला तीन हजार रुपयाचे मासीक उत्पन्न मिळू लागले आहे. याशिवाय शेणखताच्या विक्रीतूनही चांगला आर्थिक लाभ होत आहे.
बचत गटातील आर्थिक स्थिती सुधारत असल्यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणाकडेही व्यवस्थित लक्ष पुरविले जात आहे. मुला-मुलींचे विवाह ,घर बांधकाम याकरीता या महिलांचा हातभार लागत आहे. यामुळेच दुग्ध व्यवसायाने या बचत गटाच्या महिलांचे जीवनमान उंचावले आहे.
माविमद्वारा बचत गटाला सदैव मिळणाऱ्या सहाय्याच्या आधारामुळेच सदर बचत गटातील महिला सक्षम झाल्याचे मत महिलांनी जाहीरपणे व्यक्त केले. याकरिता माविमचे शतश: आभार त्यांनी व्यक्त केले. भविष्यामध्ये बचत गट उत्तरोत्तर प्रगती पथावर जाईल असा विश्वास गटातील प्रत्येक सदस्याना वाटतो. या व्यवसायामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असून गावातील अन्य बचत गटांनी सदर गटापासून प्रेरणा घेवून गावातील प्रत्येक महिला सधन व्हावी असा ठाम विश्वास महिलांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment