या अभियानाला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष कार्यक्रमांतून लेक वाचवा अभियानाचा प्रचार करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जनतेच्या सुरक्षेबरोबरच लेक वाचवाचा प्रचार केल्यामुळे जिल्ह्यात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी स्त्रीभ्रृणहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार केला आहे.
महाराष्ट्रात वाढत्या स्त्रीभ्रृणहत्येमुळे मुलींचा जन्मदर घटत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लेक वाचवा अभियानाच्या माध्यमातून जनजागरण करण्यात येऊन स्त्रीभ्रृणहत्या टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे. यानिमित्त हिंगोली जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत महालक्ष्मीच्या शुभमुहूर्तावर जिल्हाभरात लेक वाचवा अभियान राबविण्यात आले.
यानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र पोस्टर्स लावण्यात आले. तंटामुक्त गाव समित्यांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या. ज्या ठाणे अंमलदाराच्या हद्दीत कन्यारत्न जन्मले, त्यांच्या घरी व जवळपास मिठाईचे वाटप पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले. या अभियानानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात काहीजणांनी हात उंचावून स्त्रीभ्रृणहत्या करणार नाही व तसे कुठे आढळून आल्यास परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प केला.
आता महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाला लेक वाचवा अभियानाची जोड देण्यात आली असून, हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment